agriculture news in marathi, central government team inspects drought situation, pune, maharashtra | Agrowon

`यंदा देव कामी आला नाही, तुम्ही तरी काही करा`
संतोष मुंढे
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

सहा एकर जमीन टेंभापुरी प्रकल्पात गेल्याने भूमिहीन झालो. शासनाने जमीन देऊ केली, पण अजून दिलेली नाही. मुलांचे शिक्षण कसे करावे, हा प्रश्न आहे.
- दिनकर ढोले, प्रकल्पग्रस्त, टेंभापुरी.

औरंगाबाद : पहिले बी एकदा पथक आले होते. चौकशी करून दोन महिने झाले, पण काही झालं नाही. आता तुम्ही आलात, यंदा देव कामी आला नाही; तुम्ही तरी काही करा. गावात प्यायला पाणी नाही, शासन एका व्यक्‍तीला २० लिटर पाणी देतं. गाव हागणदारीमुक्‍त झालयं, पण पाणी नाही. त्यामुळे एका व्यक्‍तीला किमान ४० लिटर पाणी मिळायला हवं. चार वर्षांपासून टॅंकरने पाणी पुरवलं जातेय. सरकारचे लोक म्हणतात चारा उपलब्ध आहे; पण खरंच चारा उपलब्ध नाही, पाणीही नाही. म्हणून विनंती करतो, जसं प्यायला माणसी पाणी देता, तसं रेशनकार्डाचा कोणताही भेदभाव न करता धान्य द्या. गंगापूर तालुक्‍यातील मुरमीचे सरपंच विक्रम राऊत पोटतिडकीनं गावातील दुष्काळाची व्यथा, त्यावर होत असलेले उपाय, नेमकी गरज कशाची, हे केंद्रीय पथकासमोर मांडत होते.

राज्य शासनाने दुष्काळासाठी सुमारे सात हजार कोटी रुपयांची मागणी केल्यानंतर केंद्राचे पथक मंगळवारी (ता.४) राज्यात दाखल झाले. दहा सदस्यीय पथकाचे तीन गट केल्यानंतर ते बुधवारी (ता.५) राज्यातील विविध भागांत दुष्काळ पाहणीसाठी पाठविण्यात आले. विदर्भ, मराठवाडा व खानदेशात पाहणी करणाऱ्या दोन पथकांनी औरंगाबाद येथून दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. पहिले पथक केंद्रीय सहसचिव छवी झा यांच्या नेतृत्वात औरंगाबाद व जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी, तर दुसरे पथक जालना व बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. तत्पूर्वी औरंगाबाद विभागीय आयुक्‍तालयात केंद्राच्या पथकाने आढावा बैठक घेतली.

या वेळी कृषी सचिव एकनाथ डवले यांनी राज्यातील दुष्काळी स्थितीचे सादरीकरण केले. त्यानंतर  पुणे, औरंगाबाद व नाशिक विभागीय आयुक्‍तांनी आपल्या विभागातील दुष्काळी स्थितीचे सादरीकरण केले. त्यानंतर केंद्रीय सहसचिव छवी झा, सीडब्ल्यूसीचे श्री. देशपांडे, भोपाळच्या कडधान्य विभागाचे संचालक ए. के. तिवारी, एमएनसीएफसीच्या डॉ. शालिनी सक्‍सेना आदींनी औरंगाबाद जिल्ह्यातील टेंभापुरी प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकूण घेत, त्यांच्या दुष्काळाच्या अनुषंगाने मागण्या व त्यानुसार उपाययोजनांविषयीची मते जाणून घेतली.

या वेळी कृषी सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह कदम, औरंगाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे, गंगापूर तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्‍के आदी उपस्थित होते. टेंभापुरी प्रकल्पग्रस्तांनी ११ मागण्यांचे निवेदन केंद्रीय पथकाला सादर केले.

त्यानंतर पथकाने मुरमी येथील शेतकरी यदो पुंजाराम निळ यांच्या कपाशीच्या शेताला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. एकरात कपाशी लावली, पण केवळ एक क्‍विंटल कापूस झाल्याचे श्री. निळ यांनी सांगितले. त्यानंतर सुलतानपूर व जिकठाण शिवारातील शे. युनूस शे. चांद व शे. बाबुलाल शे. अहमद यांच्याशीही पथकाच्या सदस्यांनी संवाद साधला. पाहणी झाल्यावर आम्ही केंद्र सरकारला अहवाल सादर करणार असल्याचे सहसचिव झा यांनी सांगितले. सकाळी ११ ते १.३० वाजेदरम्यान अत्यंत जलदगतीने पथकाने निवडक शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन माहिती संकलन केले.

‘दूषित पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही’
टेंभापुरीचा प्रकल्प निर्मितीनंतर आजपर्यंत फक्‍त दोन वेळा भरला. कोट्यवधी रुपये खर्च झालेल्या जवळपास २९ गावांच्या पाणीपुरवठा योजना गत आठ वर्षांपासून बंद आहेत. शिवाय आम्हाला प्यायला पाणी नाही. पैसे असणारे विकत घेतात, ज्यांच्याकडे नाहीत त्यांना अधिग्रहीत विहिरीतून मिळणारे खारे, दूषित पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही, असे टेंभापुरीचे विलास खवले, रामनाथ ढोले, अशोक ढोले यांनी सांगितले.
 
‘आम्हाला सांभाळा; जनावरांना सांभाळा’
प्यायला पाणीच नाही, जारचं पाणी प्यायला घ्यावं लागतं. १९७९ पासून टेंभापुरी प्रकल्प फक्‍त दोन वेळा भरला. पावसाअभावी, मका जळून गेला. कपाशीला फक्त दोन, तीन कैऱ्या आल्या. नागझरी नदीवरील टेंभापुरी प्रकल्पाच्या वरच्या भागात भरपूर कोल्हापुरी बंधारे झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पात गंगेतून वा इतर ठिकाणाहून पाणी वळतं केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी आंदोलनं केली, पण आजवर उपयोग झाला नाही. त्यामुळं आता केंद्राच्या पथकाला ''आम्हाला सांभाळा, जनावरांना सांभाळा'', एवढी विनंती करण्याशिवाय पर्याय नसल्याचे बद्रिनाथ ढोले, कल्याणराव ढोले, दिनकर ढोले, रामनाथ ढोले, अशोक ढोले, विलास खवले, शेषराव गुंजाळ यांनी सांगितले.
 

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...