जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी परिस्थिती ः अजित पवार

Central government threatens communal harmony
Central government threatens communal harmony

जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारीसारख्या ज्वलंत प्रश्नांऐवजी सीएए, एनआरसीसारखे मुद्दे पुढे येत असल्याने देशातील जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने जुन्नर येथे आयोजित शिवप्रेमींच्या मेळाव्यात ते बुधवारी (ता. १९) बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील होते. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री आदिती तटकारे, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, सत्यशील शेरकर, संजय काळे, जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद पंचायत समितीचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

पवार म्हणाले, महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेत दोन लाखापेक्षा अधिक व नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल. शिवनेरी विकास आराखड्याच्या २३ कोटींच्या मागणीला पुरवणी मागणीत मंजुरी दिली जाईल. शिवसंस्कार सृष्टीसाठी निधी दिला जाईल. त्याचबरोबर महिलांवरील अत्याचारावर आळा घालण्यासाठी सरकारकडून कठोर कायदा करण्यात येईल. दर्जेदार आरोग्य व शिक्षण मिळावे यासाठी निधी उभारण्याचे धोरण आहे.

यावेळी राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक आशुतोष डुंबरे यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्काराने, तर दहशतवाद विरोधी पथकात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त वसंत ताजणे यांना ‘शिवनेरी भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नव्हते. मात्र, जातीयवादी शक्ती तसे भासवून दंगली घडवीत असल्याचे दिसत आहे. छत्रपतींच्या गड-किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून दिले पाहिजे.

यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी शिवनेरीवर रोप-वे आणि शिवसंस्कार सृष्टीची मागणी केली. आमदार अतुल बेनके यांनी प्रास्तविक आणि स्वागत केले. पांडुरंग पवार यांनी सूत्रसंचलन केले. अशोक घोलप यांनी आभार मानले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com