राज्याचे वृक्ष जोपासण्याचे धोरण केंद्र सरकार स्वीकारणार ः सुधीर मुनगंटीवार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे  : वनक्षेत्रावर लागवड केलेल्या वृक्षांच्या जगण्याची शास्त्रोक्त टक्केवारी ही ६० ते ६५ टक्के आहे. मात्र वनविभागाने सुरू केलेली ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेतील वृक्षांची जगण्याची टक्केवारी ८६ टक्क्यांपर्यंत असल्याचे उपग्रहावरील छायाचित्रांवरून सिद्ध झाले आहे. या योजनेची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. लवकरच वृक्ष जोपासण्याचे हे धोरण केंद्र सरकार स्वीकारणार असून, यासाठी केंद्रीय वन सचिवांनी राज्यात येऊन या योजनेच्या यशस्वीतेचा आढावा घेतला आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (ता.३) पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

सोमवारी वन विभागाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेच्या पुणे महसूल विभागाच्या बैठकीनंतर मंत्री मुनगंटीवार बोलत होते. या वेळी पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित होते.

या वेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले, की पुणे विभागाची वृक्षआच्छादनाची टक्केवारी १०.७८ असून, ही टक्केवारी ३३ टक्क्यांपर्यंत करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. वन विभागाच्या वृक्ष लागवड अभियानामुळे वनेतर क्षेत्राच्या वृक्षाच्छादनामध्ये २७३ चौरस किलोमीटरने वाढ झाल्याचे फॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडियाच्या २०१७ च्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये कांदळवन ८२ चौरस किलोमीटर तर बांबूचे क्षेत्र ४ हजार ४६२ चौरस किलोमीटरने वाढले आहे. वनक्षेत्रातील जलसाठयांचे क्षेत्र ४३२ चौरस किलोमीटरने वाढले आहेत.’’पुणे विभागासाठी यंदा वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ५ कोटी ४७ लाख ५१ हजार ठेवण्यात आले आहे. वृक्षलागवड चळवळ निर्माण व्हावी, यासाठी तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात येणार असून, याबाबतचा शासन निर्णय आजपर्यंत (ता.४) प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच वृक्षलागवडीमध्ये सर्वसामान्य जनतेचा सहभाग वाढावा म्हणून ग्रीन आर्मी स्थापन करण्यात आली आहे. 

रस्ते विकास करताना होणाऱ्या वृक्षतोडीनंतर झाडांची पुनर्लागवड करण्यासाठी अटी, शर्ती, नियम आहेत. मात्र हे पाळले जात नाहीत. परिणामी रस्त्यांलगत झाडांची संख्या कमी होत चालली आहे. महामार्गांवरील वृक्षलागवड वाढीसाठी कडक कायदा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com