कांदा दरस्थिती आढाव्यासाठी केंद्राचे शिष्टमंडळ लासलगावी

कांदा
कांदा

नाशिक : कांदा दर, आवक स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. २०) बैठक घेतली. या बैठकीविषयी शेतकऱ्यांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, जेव्हा बाजारभाव पडतो तेव्हा असे शिष्टमंडळ का येत नाही? सरकारने सध्याच्या बाजार दरात कोणताही हस्तक्षेप करू नये, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.  गेल्या सप्ताहापासून कांदादरात वाढ होत असल्याने नेमके कारण काय असावे? प्रमुख बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी किती कांदा येतो? शिल्लक कांदा किती आहे? याचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय शेतकरी कल्याण मंत्रालय व ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या शिष्टमंडळाने भेट देऊन बैठक घेतली.  या शिष्टमंडळामध्ये अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे ग्राहक व्यवहार विभागाचे संचालक अभय कुमार, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे साहाय्यक संचालक पंकज कुमार, एमआईडीएचचे मुख्य संचालक आर. पी. गुप्ता, महाराष्ट्र राज्याच्या फलोत्पादन विभागाचे सहसंचालक शिरीष जमधडे, राज्य पणन महामंडळाचे प्रभारी उपसरव्यवस्थापक बहाद्दूर देशमुख, जिल्हा पणन अधिकारी श्री. जगताप यांच्यासह जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी यांचा सहभाग होता.  देशभरात कांदा भाववाढीचे चित्र जरी रंगविले जात असले, तरी उपलब्ध कांद्याच्या तुलनेत बाजारभाव हा संयुक्तिक नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, त्यामुळे मोठा आर्थिक लाभ होतोय हा समज चुकीचा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सरकारने ग्राहकांचा विचार करताना चुकीचा निर्णय घेऊ नये व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणू नये अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे.  कांदा दरावर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने २००० मेट्रिक टन कांदा आयात करणे आणि निर्यातीवर प्रतिमेट्रिक टन ८५० डॉलर किमान निर्यात मूल्य दर केले, मात्र त्याचा बाजारावर परिणाम झाला नाही. यानंतर कांदा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे शिष्टमंडळ येथे आले.  कांदा खाणाऱ्यांचा नाही, तर पिकवणाऱ्यांचासुद्धा सरकारने विचार करावा, जेव्हा कांदा मातीमोल होतो तेव्हा हे शिष्टमंडळ कोठे भूमिगत झाले होते, अशा संतप्त प्रतिक्रिया लासलगाव बाजारातील कांदा उत्पादकांनी व्यक्त केल्या. ...हे होते भेटीतील प्रमुख विषय : 

  •     कांदा बाजारभावात झालेली अचानक दरवाढ
  •     भविष्यातील कांद्याच्या बाजारभावाची स्थिती
  •     शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला कांदा 
  •     नवीन कांदा बाजारात कधी येणार 
  •     नवीन कांदा लागवडीची स्थिती
  •     बाजार समितीमध्ये होणारी कांद्याची आवक
  •     देशांतर्गत वाढलेली कांद्याची मागणी
  •     किमान निर्यात मूल्य वाढल्यानंतर कांदा दराची स्थिती 
  •     नवीन कांदा बाजारात येईपर्यंत जुन्या कांद्याने मागणी पूर्ण होऊ शकेल का? 
  •     नाफेडची कांदा खरेदी
  •     नाफेडमार्फत होणारा कांदा वितरण व पुरवठा
  •     लासलगाव येथील कांद्याची लिलाव पद्धत
  • तारीख आवक किमान  कमाल    सरासरी
    १९ सप्टेंबर १२११७   १५००      ५१००    ४००१
    २० सप्टेंबर  १०५००  १५००    ४५०० ४०००
    २१ सप्टेंबर २३००   १२०० ४३६०      ४१००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com