केंद्राचे पथक पोचले थेट बांधावर

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात दाखल झालेल्या केंद्राच्या पथकातील सहा सदस्यांनी आपली विभागणी करत एकाच वेळी तीन जिल्ह्यांत सोमवारी (ता. २१) पाहणी दौरा केला.
central team
central team

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात दाखल झालेल्या केंद्राच्या पथकातील सहा सदस्यांनी आपली विभागणी करत एकाच वेळी तीन जिल्ह्यांत सोमवारी (ता. २१) पाहणी दौरा केला. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर उस्मानाबाद जिल्ह्यात एका सदस्याने पाहणी केली. प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत पथकातील सदस्यांनी नुकसानीची तीव्रता जाणून घेतली. पथकाच्या रिपोर्टवर केंद्राच्या मदतीचा निर्णय अवलंबून असणार आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथक रविवारी (ता. २०) औरंगाबादेत दाखल झाले. रविवारी सहा पैकी पाच सदस्यच औरंगाबादेत आले. विमान चुकल्याने एक सदस्य सोमवारी पथकात सहभागी होणार होते. रविवारी आलेल्या सदस्यात केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे सहसचिव रमेशकुमार गंथा, केंद्रीय अर्थ व नियोजन विभागाचे सल्लागार आर.बी. कौल, केंद्रीय कृषी विभागाचे कृषी संचालक आर.पी. सिंह, रस्ते व दळणवळण विभाग, प्रादे‍शिक कार्यालय, मुंबईचे मुख्य अभियंता तुषार व्यास, जलशक्ती विभागाचे अधीक्षक अभियंता एम.एस. सहारे यांचा समावेश होता. दाखल पथकाने रविवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यात अतिवृष्टी व पूर परिस्थीतीमुळे झालेल्या शेतातील पिके व इतर नुकसानीची यावेळी सविस्तर माहिती सादरीकरणाव्दारे दिली.   नियोजनानुसार आधी औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यात पथक पाहणी करणार होते. परंतु रविवारी रात्री उशिरा पथकाच्या सल्ल्यानुसार जालन्याचा पाहणी दौऱ्यात समावेश करण्यात आला. त्यामुळे पथक तीन भागात विभागले गेले. जालन्यात पथकाचे सदस्य श्री. सिंह व श्री. सहारे, उस्मानाबाद जिल्ह्यात श्री. व्यास तर औरंगाबाद जिल्ह्यात स्वतः पथक प्रमुख श्री. गंथा आणि श्री. कौल सोमवारी (ता. २१) सकाळी ९ च्या सुमारास पाहणीसाठी रवाना झाले. औरंगाबादच्या पथकासोबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महसूल उपायुक्त पराग सोमन, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव, ‘एनएआरपी’चे डॉ. एस. बी. पवार, ‘केव्हीके’चे प्रमुख डॉ. किशोर झाडे आदी होते.  औरंगाबाद जिल्ह्यातील पाहणीची सुरुवात औरंगाबाद तालुक्यातील निपाणी पासून झाली. नंदू भालेकर यांच्या शेतातील बाजरी व कपाशीच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर पथक त्याच शिवारातील सखाराम पुंगळे यांच्या शेतात दाखल झाले. त्यानंतर पिंपळगाव पांढरी शिवारातील विठ्ठल बहुरे यांच्या शेतातील कपाशीची पाहणी केली. त्यानंतर पथक पैठण तालुक्याकडे रवाना झाले. त्यानंतर गाजीपूर, निलजगाव, शेकटा, गंगापूर तालुक्यातील ढोरगाव, मुरमी, वरखेड आदी ठिकाणी कपाशी, बाजरी, कांदा, मोसंबी, तूर आदी पिकाच्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.  जालना जिल्ह्यातील वाकुळणी, बाजार वाहेगव, रोषणगाव, नंदापूर आदी गावांत कापूस, द्राक्ष, मोसंबी आदी पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. यावेळी कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांची उपस्थिती होती. चार गावांतील पाहणी नंतर पथक जालना बाजार समिती व ‘सीसीआय’ कापूस खरेदी केंद्राला भेट देणार होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव, पातोडा लोहारा तालुक्यातील सास्तुर, राजेगाव आणि तुळजापूर तालुक्यातील ककरंबा, आपसिंगा व कातरी या गावांची पाहणी करणार होते.

प्रतिक्रिया एकच पीक घेता आलं. त्यातही हाती काहीच नाही लागलं. जमीन हलकी त्यामुळं ओलं नाही. त्यामुळं आता दुसऱ्या पिकाची आशा नाय. मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही. - विठ्ठल बहुरे, शेतकरी, पांढरी पिंपळगाव    औंदा पाऊस खूप झाला. पण नुकसान पण खूप झालंय. त्यामुळं आमच्या पीक विम्याचा तेवढं बघा. लई बिकट परिस्थिती हाय. - सुनील कसाळे, शेतकरी, मांजरी, ता. गंगापूर.

यंदा हाती काहीच लागलं नाही. कापूस कवडी झाला. त्याला कीड लागली. मकाच बी लई नुकसान झालं. - भागीनाथ उबाळे, वरखेड, ता. गंगापूर

मोसंबीचा ना मृग बहार हाती लागला ना आंब्या. मोठं नुकसान झालं अति पावसानं. आता पुढच्या वर्षी निसर्गाने साथ दिली त बरं. - मच्छीन्द्र मोगल, निलाजगाव, ता. पैठण

ठोक्यान केलेल्या शेतीत ना कापूस हाती लागला ना बाजरी. झालेलं नुकसान भरून निघायची सोय नाही. रब्बीसाठी जमीन जास्त पावसामुळं तयार करता आली नाही. त्यामुळं पाणी असून उपेग नाय. - नंदू भालेकर, निपाणी, ता. औरंगाबाद

साहेब, पाहणी करायला आल्याबद्दल धन्यवाद. पण थोडं आधी आला असता तर आजच्यापेक्षा जास्त नुकसानीची तीव्रता जाणवली असती. - सखाराम पुंगळे, शेतकरी, पांढरी पिंपळगाव  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com