सोलापुरात नुकसानीच्या पाहणीची औपचारिकता

दोन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे पथक मराठवाड्यावरुन मंगळवारी (ता.२२) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले.
solapur
solapur

सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे पथक मराठवाड्यावरुन मंगळवारी (ता.२२) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी, कोळेगाव आणि पेनूर, पंढरपुरातील भंडीशेगावसह अन्य काही गावांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीची औपचारिकता एकदाची पूर्ण केली. पण पुढे काय? हा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र कायम राहिला. 

केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव यशपाल आणि रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यासह अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. लांबोटी येथील शेतकरी तात्या चंदनशिवे यांच्या उसाची पथकाने पाहणी केली. कोळेगाव येथील देशमुख वस्तीवरील बंधाऱ्याची, शेतीची, विजेच्या खांब, पडझड झालेल्या घरांची पाहणी करून माहिती घेतली. याठिकाणी अतिपावसाने भोगावती, सीना आणि नागझिरा नद्यांचे पाणी रात्री अचानक आले. यामुळे कुंडलिक देशमुख, निखिल देशमुख यांचे घर वाहून गेले. आणखी चार-पाच घरांची पडझड झाली आहे. जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी पथकाला माहिती दिली.  पेनूर येथील श्रीमती फुलाबाई माने आणि श्रीमती विजयाताई चव्हाण यांच्या मका पिकाचे नुकसान झाले आहे. येथे अजून शेतात चिखल असल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून दिले. पिकाचा पंचनामा झाला असून मदत त्वरित मिळेल, अशी माहिती पथकाला देण्यात आली. भारत सलगर यांच्या दीड एकर केळीच्या बागेचे नुकसान झाले आहे. पथकाने प्रत्यक्ष केळीच्या बागेत जाऊन माहिती घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांनी केळीची प्रक्रिया समजावून सांगितली. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी लॉकडाऊनमुळे पश्‍चिम बंगाल येथील केळीचे काम करणारे मजूर गेल्याने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले. केंद्रीय पथकातील श्री. व्यास यांनी शेतातील माती वाहून गेलेल्या ठिकाणी कृषी विद्यापीठाची मदत घेऊन काम करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर हे पथक पंढरपुरातील भंडीशेगाव आणि अन्य गावांकडे रवाना झाले.  अधिकाऱ्यांनी घेतला आढावा  तत्पूर्वी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे श्री. यशपाल आणि श्री. व्यास यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, श्री. शेलार यांनी शेती, वीज, रस्ते यांच्या नुकसानीची माहिती दिली. तसेच आतापर्यंत झालेले एकूण नुकसान, राज्य शासनाकडून वाटप झालेली मदत याबाबतची माहितीही या अधिकाऱ्यांना दिली.  शेतकऱ्यांचा प्रश्‍न, पथकाची औपचारिकता  तब्बल दोन महिन्यानंतर थेट बांधावर आलेल्या केंद्रीय पथकाच्या दौऱ्यामागचे गणित शेतकऱ्यांना कळले नाही. त्यावेळी झालेल्या नुकसानीची परिस्थिती आता काय दिसणार? आपण त्यांना काय आणि किती सांगणार, हा एक प्रश्‍नच होता. नव्हे, या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तोच भाव होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजही जिल्ह्यातील अनेक गावांत मदत पोचलेली नाही. निम्म्या शेतकऱ्यांनाच मदत मिळाली आहे. त्याचं काय? हा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला होता. तर या पथकाला मात्र औपचारिकता पार पाडायची होती, हे चित्र मात्र ठळकपणे दिसत होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com