कडधान्ये ः प्रथिने, ऊर्जेचा उत्तम स्रोत

कडधान्ये पोषणातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहेत. कडधान्ये प्रथिने, शारीरिक ऊर्जा, शरीरासाठी पोषक आणि महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरवितात. प्रथिने शरीराच्या बांधणीचे काम करतात.
Cereals
Cereals

कडधान्ये पोषणातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहेत. कडधान्ये प्रथिने, शारीरिक ऊर्जा, शरीरासाठी पोषक आणि महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरवितात. प्रथिने शरीराच्या बांधणीचे काम करतात. आपल्या आहारात तृणधान्यानंतर कडधान्याला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. पोळी, भाकरी, भातानंतर जेवणात वरण, आमटी किंवा डाळीचे पदार्थ असतात. कडधान्येही द्विदल धान्ये आहेत.   कडधान्यामध्ये रभरा, तूर, मूग, उडीद, वाटाणा, मसूर, कुळीथ, मटकी, चवळी, इत्यादी पिकांचा समावेश होतो. भारतातील एकूण कडधान्य उत्पादनामध्ये सर्वाधिक उत्पादन हरभऱ्याचे घेतले जाते, त्या खालोखाल तूर, उडीद व मूग आणि इतर कडधान्यांचे होते. कडधान्ये पोषणातील सर्वात महत्त्वाची घटक आहे. कडधान्ये प्रथिने, शारीरिक ऊर्जा, शरीरासाठी पोषक आणि महत्त्वाची जीवनसत्वे आणि खनिजे पुरवितात. प्रथिने शरीराच्या बांधणीचे काम करतात. 

आहारातील महत्त्व 

  • प्रथिने मानवी शरीरामध्ये उती व स्नायूंची बांधणी करतात. प्रथिने ऊर्जेचा स्रोत म्हणून देखील कार्य करतात. हाडांची वाढ व संप्रेरके निर्माण करण्याचे कार्य प्रथिनांमुळे होते. 
  • शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणे व शरीराची झीज भरून काढण्याचे कार्य प्रथिने करतात.म्हणूनच  डाळवर्गीय पिकांचे विशेष महत्त्व शाकाहारी लोकांसाठी आहे. 
  • भारतीय लोकांच्या आहारात सुमारे १० ते १५ टक्के प्रथिने आणि २० टक्के कार्बनयुक्त ऊर्जा ही कडधान्यांद्वारे मिळते. 
  • कडधान्यांमध्ये प्रथिनाशिवाय कर्बोदके, खनिजे आणि जीवनसत्त्वाचे प्रमाणसुद्धा चांगले आहे. शरीरास पचण्यास सुलभ असणारे प्रथिने, लायसिन आणि रायबॉफ्लेवीन कडधान्यात उपलब्ध असतात. 
  • तूर व मसुरातील प्रथिने लहान मुलांना व वृद्धांना पचण्यास हलकी असतात. आहारात अमायनो आम्ले ही मूलभूत व अत्यंत आवश्यक असतात. त्यांची उपलब्धता कडधान्यांतून मिळते. 
  • कडधान्यांच्या कोवळ्या हिरव्या शेंगाचा उपयोग भाजी म्हणून केला जातो. जनावरांचा आहार म्हणूनही कडधान्य पिके उपयुक्त आहेत. 
  • प्रथिनांची दैनंदिन गरज आणि कमतरतेमुळे होणारे आजार 

  • प्रत्येक व्यक्तीसाठी प्रथिनांची गरज ही व्यक्तीच्या वजनानुसार व शारीरिक अवस्थेनुसार निश्‍चित केली जाते. सर्वसाधारणपणे १ ग्रॅम प्रति किलो वजन प्रति दिवस प्रथिने प्रत्येक व्यक्तीसाठी लागतात. म्हणजेच व्यक्तीचे वजन ५० किलो असेल तर त्या व्यक्तीला दिवसभरात ५० ग्रॅम प्रथिनांची गरज असते. 
  • लहान मुले, गर्भवती स्त्रिया व स्तनदा मातांना यांना अधिक मात्रेत प्रथिनांची गरज असते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे अनेक आजार संभवतात. कमतरतेमुळे मुलांची शारीरिक, मानसिक वाढ खुंटते. अतिकृशता हा आजार संभवतो. या मध्ये लहान बालकांच्या हातापायांच्या काड्या झाल्यासारखे दिसून येते. 
  • कमी वजनाचे बालक जन्माला येणे, रक्तक्षय होणे, तर प्रौढामध्ये जंतू संसर्ग, यकृत वृद्धी, जलोदर, कृशता असे आजार संभवतात. 
  • कडधान्याची पचन क्षमता 

  • सर्वच प्रकारची कडधान्य पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वांत हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग, चवळी, उडीद आणि हरभरा. कडू वाल आणि पावटा हे पचायला सर्वांत कठीण असते. 
  • कडधान्यात भरपूर पोषक तत्त्वे असतात. १०० ग्रॅम कडधान्यामध्ये १७ ते २५ टक्यांपर्यंत प्रथिने असतात याला अपवाद सोयाबीन आहे. १०० ग्रॅम सोयाबीनमध्ये ४० ते ४२ टक्के प्रथिने असतात. शाकाहारी आहारामध्ये प्रथिनांची पूर्तता प्रामुख्याने कडधान्यातूनच होते. 
  • इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी दिलेल्या संकेताप्रमाणे ७० ते ८० ग्रॅम कडधान्य प्रतिदिन प्रति माणसी आहारात घेणे आवश्यक असते. 
  • संपर्क ः डॉ. साधना उमरीकर, ९४२०५३००६७  (कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर, जि.जालना)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com