कडधान्याचे गणित पावसावरच अवलंबून

जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने कडधान्य पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तूर, मूग आणि उडदाचे उत्पादन पर्याप्त न झाल्यास आयातीवरच अवलंबून राहावे लागेल.
कडधान्याचे गणित पावसावरच अवलंबून
कडधान्याचे गणित पावसावरच अवलंबून

मुंबई : देशात यंदा मॅान्सूनची सुरुवात चांगली झाली. मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने कडधान्य पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तूर, मूग आणि उडदाचे उत्पादन पर्याप्त न झाल्यास आयातीवरच अवलंबून राहावे लागेल. आयातीसाठीही वाहतूक खर्च वाढल्याने आयातही महाग होत आहे. त्यामुळे कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे, असे सूर ‘आयपीजीए’च्या वेबिनारमध्ये जाणकारांनी आळवला.  खरीप हंगाम २०२१-२२ मधील कडधान्य पिकांची पेरणी, उत्पादकता, किमतीवर होणार परिणाम आणि आयातीवरील अलंबित्व या विषयांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून इंडिया पल्सेस अॅन्ड ग्रेन्स असोसिएशनने (आयपीजीए) वेबिनारचे आयोजन केले होते. या वेबिनारमध्ये २० देशांतील जवळपास ७०० व्यापारी प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. यंदा देशात वेळेवर मॉन्सून दाखल झाल्याने खरिपाची सुरुवात आशादायक झाली होती. परंतु त्यानंतर जूनच्या मध्यानंतर ते जुलैच्या मध्यापर्यंत प्रतिकूल मॉन्सून अनुभवायला मिळाला. देशातील अनेक भागांत पावसाने मोठी दडी मारल्याने खंड पडला. त्याचा परिणाम खरिपातील पिकांच्या उत्पादकतेवर होण्याची दाट शक्यता आहे. या वेबिनारमध्ये जाणकारांनी कडधान्य पिके, मार्केट, सरकारी धोरणांचा परिणाम, देशातील कडधान्य वापर, कंटेनरची कमतरता आणि वाढलेल्या भाड्यांमुळे निर्यातीवर झालेला परिणाम यावर प्रकाश टाकला. ‘आयपीजीए’चे उपाध्यक्ष बिमल कोठारी म्हणाले, की यंदा मॅान्सूनची सुरुवात चांगली झाली असली तरी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मॅान्सूनच्या प्रगतीला खीळ बसली आणि मध्य भारतातील प्रवास खोळंबला होता. परिणामी, खरिप पेरणीच्या महत्त्वाच्या कामांना तब्बल तीन आठवडे उशीर झाला. या वेबिनारच्या माध्यमातून पेरणी, मॅान्सून आणि त्याचा उत्पादका आणि उत्पादनावरील परिणाम यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.  जीजीएन रिसर्चचे निरव देसाई म्हणाले, की देशात यंदा मॅान्सूनला लवकर प्रारंभ झाला असला तरी १५ जून ते १५ जुलैदरम्यान पावसाने देशातील अनेक भागांत दडी मारल्याने पेरणीही खोळंबली होती. या काळातील पावसाची तूट जवळपास २७.२ टक्के होती. या काळात राजस्थान आणि गुजरातमध्ये मॅान्सून कोरडाच होता. त्यामुळे राजस्थानमधील कडधान्य पिकांची पेरणी जवळपास २५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. जून वगळता कमी पाऊस : डॉ. पै ‘‘जून महिन्यात देशातील पावसाचे प्रमाण समाधानकारक होते. जूनमध्ये देशात सरासरीच्या ११० टक्के पाऊस झाला. जूलै महिन्यात देशाच्या ईशान्य भागात पावसाचे प्रमाण कमी होते. सरासरीच्या जवळपास ७ टक्के कमी पाऊस झाला. तसेच ऑगस्ट महिन्यात परिस्थिती आणखी बिकट झाली. मध्य भारताचा पूर्व भाग तसेच उत्तरेतील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी होते,’’ असे भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख डॉ. डी. एस. पै यांनी सांगितले.

उडदाचे भवितव्य पावसावर अलंबून ः कृष्णमूर्ती ‘‘देशाची उडदाची गरज भागविण्यासाठी मागील काही वर्षांपासून भारतात उडदाखालील क्षेत्रात सातत्याने सुधारणा होत आहे. उदा. देशात २०१० मध्ये उडदाचे उत्पादन १७ लाख टन होते. त्यात वाढ होऊन ते २०१८-१९ मध्ये ३० लाख टनांवर पोहोचले आणि मागणी व पुरवठ्यातील तुटवडा म्यानमारमधून आयात करून पूर्ण करण्यात येतो. २०२० मधील खरिपाची पेरणी सुरू झाली तेव्हा सरकार आणि खरेदी संस्था तसेच खासगी व्यापाऱ्यांकडे ४ लाख टन उडदाचा शिल्लक साठा होता. देशातील उडदाची पेरणी ३७ लाख हेक्टरवर आहे. आतापर्यंत पिकासाठी मॅान्सून चांगलाही म्हणता येणार नाही आणि वाईटही. मॅान्सन पुढील ३३ दिवसांमध्ये कसा राहतो यावर सर्व परिस्थिती अवलंबून आहे. पुढील काळात पाऊस चांगला झाला नाही तर त्याचा परिणाम पिकांवर होऊ शकतो," असे फोर पी इंटरनॅशनलचे बी. कृष्णमुर्ती म्हणाले.

तुरीत आत्मनिर्भरतेशिवाय पर्याय नाही ः कलंत्री कलंत्री फूड प्रॉडक्ट्सचे नितीन कलंत्री म्हणाले, की पावसातील तुटीमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान झाले किंवा कमी उत्पादन झाले आणि परिणामी उत्पादनात तूट आल्यास आयात करूनच गरज भागवावी लागेल. डाळींच्या दरात वाढ झाल्यास आय़ात करावी लागेल. चौथ्या सुधारित अंदाजात सरकारने देशात ४२.८ लाख टन तुरीच्या उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र प्रत्यक्षात ३७ लाख टनांपेक्षा अधिक उत्पादन नसावे. त्यामुळे डाळींच्या दरात वाढ झाली. म्यानमार आणि आफ्रिकेतून साधारण २ लाख टन तूर आयात होण्याची शकयता आहे. परंतु वाढलेल्या वाहतुक खर्चामुळे ही तुरही स्वस्त मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे देश आपल्याच शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. आपण तूर उत्पादनात आत्मनिर्भर झालो तरच आयात करावी लागणार नाही आणि डाळींचे दरही नियंत्रणात राहतील.

कमी पाऊस,आपत्तींचा मुगाला फटका : बच्छावत लाॅकडाउनमध्ये मुगाची मागणी काही प्रमाणात कमी झाली होती. आता पुन्हा मुगाची मागणी वाढली आहे. व्यापारप्रवृत्तीतून असे जाणवते, की येणाऱ्या काळात मुगाची मागणी २५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. देशात केऴल ३० टक्के मुगाचे उत्पादन सिंचनावर होते. मोठे क्षेत्र हे पावसावर अलंबून आहे. यंदा पावसातील तुटीने चिंता वाढविली आहे. यंदा सुरुवातीच्या चांगल्या पावसाने बंपर मुग उत्पादनाचा अंदाज होता. मात्र नैसर्गिक आपत्ती आणि पावसाच्या ओढीने जास्त उत्पादनाची आशा धुळीस मिळाली. राजस्थानमध्ये मुगाच्या उत्पादनात घट झाल्याने दरात वाढ झाल्याचे पाहण्यात येत आहे, प्रकाश अॅग्रो मिल्सचे पुनित बच्छावत यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com