आयातीमुळे कडधान्य दर दबावात

तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल. तर हरभरा लागवड सुरू आहे. मात्र, आवकेचा हंगाम नसतानाही केवळ सरकारच्या आयातीच्या धोरणामुळे तूर आणि हरभरा दर दबावात आहेत.
Cereals under pressure due to imports
Cereals under pressure due to imports

पुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल. तर हरभरा लागवड सुरू आहे. मात्र, आवकेचा हंगाम नसतानाही केवळ सरकारच्या आयातीच्या धोरणामुळे तूर आणि हरभरा दर दबावात आहेत. परिणामी तेलबिया आणि अन्नधान्यात असलेली तेजी कडधान्यांत आली नाही. परिणामी देशभरात तुरीला सध्या सहा हजार ते ६ हजार १०० रुपयांचा दर मिळत आहे. तर हरभऱ्याला ४८०० ते ५ हजार १०० रुपये दर मिळतोय. तूर आणि हरभऱ्याचे दर हमीभावाच्या खालीच असल्याने शेतकऱ्यांचा माल बाजारात दाखल झाल्यानंतर दरांवर आणखी दबाव वाढण्याची शक्यता, जाणकारांनी व्यक्त केली आहे. 

एरव्ही हंगाम सुरू होण्याआधी बाजारात त्या पिकाचा दर हमीभाव पातळीच्या वर असतो. मात्र, यंदा सरकारने कडधान्य आयातीसाठी घातलेल्या पायघड्यांमुळे तूर आणि हरभऱ्याचे दर हमीभावाच्या कमीच आहेत. बाजारात आवकेचा हंगाम नसतानाही आयातीमुळे पुरवठा वाढत असल्याने मागणी सामान्य राहत आहे. त्याचा परिणाम बाजार दरांवर होत आहे. त्यामुळे पुढे बाजारात आवक होणाऱ्या तुरीच्या दराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. 

यंदा तुरीसाठी केंद्र सरकारने ६ हजार ३०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. त्यातच देशात आतापर्यंत किती तूर आयात झाली याचा निश्चित आकडा उपलब्ध नाही. विविध संस्था आणि जाणकारांनी वेगवेगळे आकडे जाहीर केले. जाणकारांच्या मते आतापर्यंत दोन ते अडीच लाख टन तुरीची आयात झालेली असू शकते. मात्र, काही जणांच्या मते हा आकडा जास्त आहे. परंतु या आयातीमुळे देशांतर्गत तुरीचे दर दबावात आले. नवीन पीक बाजारात येण्याच्या आधीच आवक नगण्य असतानाही तुरीचे दर हमीभावाच्या खालीच आहेत. नवीन माल बाजारात येण्याच्या आधी स्टाॅकिस्ट मागील हंगामातील माल बाहेर काढत आहेत. त्यातच मागणी सामान्य असल्याने दर दबावात आहेत. 

तुरीसोबतच हरभरा दरही सध्या दबावात आहेत. आयातीचा परिणाम देशांतर्गत हरभरा बाजारावर होत आहे. मागणी सामान्य राहिल्याने हरभरा दर हमीभावापेक्षा कमीच आहे. यंदा केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी ५ हजार २३० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, बाजार समित्यांत सध्या आवक नगण्य असूनही दर हमीभावाच्या खालीच आहे.

हरभरा दरही दबावात मागील आठवडाभर महाराष्ट्रात हरभऱ्याला सरासरी ५ हजार १२५ रुपये दर मिळाला. अकोला बाजार समितीत हरभऱ्याला सरासरी ४ हजार ९५० रुपये ते ५ हजार २५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर नागपूर बाजारात ५ हजार ते ५ हजार ५० रुपये सरासरी दर मिळाला. जळगाव बाजार समितीत हरभरा दर ४ हजार ९०० ते ५ हजार रुपये राहिला. राजस्थानमध्ये जयपूर येथे ५ हजार ५० रुपये ते ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर जोधपूर येथे ४ हजार ७०० रुपये आणि बिकानेर येथे ४ हजार ९५० रुपये सरासरी दर मिळाला. तर मध्य प्रदेशातील बाजार समित्यांमध्ये ५ हजार २०० रुपये दर मिळाला. इंदूर येथे मागील आठवडाभर हरभऱ्याला सरासरी ५ हजार ५० रुपये दर मिळाला. तर अशोकनगर बाजारात ४ हजार ६०० रुपये तर ४ हजार ८०० रुपये दर मिळाला. कटनी येथे ४ हजार ९५० ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सध्या स्टाॅकिस्ट आणि आयातदारांचा माल मोठ्या प्रमाणात आहे. तर शेतकऱ्यांकडील मालाची एकदम कमी आवक होत आहे. 

असे राहिले तुरीचे दर मागील आठवड्याचा विचार करता तुरीला महाराष्ट्रात सरासरी ६ हजार ते ६ हजार १०० रुपये दर मिळाला. तर अकोला बाजार समितीत सरासरी ६ हजार १५० रुपये, नागपूर बाजार समितीत सरासरी ६ हजार ३०० रुपये, लातूर बाजार समितीत ६ हजार २०० ते ६ हजार ३०० रुपये दर मिळाला. कर्नाटकातील बाजार समित्यांत तुरीला सरासरी ५ हजार ८०० ते ६ हजार १५० रुपये सरासरी दर मिळाला. गुलबर्गा येथे ५ हजार ९०० ते ६ हजार २५० रुपये सरासरी दर मिळाला. तर बीदर येथे ५ हजार ५०० ते ५ हजार ८०० रुपये दर मिळाला.

हमीभावाने खरेदी आवश्यक जागतिक पातळीवर यंदा मागणी आणि पुरवठ्यामध्ये असंतुलन आल्याने कडधान्य सोडून इतर शेतीपिकांमध्ये विशेषतः तेलबिया आणि कापसामध्ये तेजी आली. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारही तेजीत असल्याने स्थानिक बाजारात दर वाढले. त्यामुळे सरकारला सोयाबीन आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्याची गरज पडली नाही. मात्र सरकारने मोठ्या प्रमाणात तूर आणि हरभऱ्याची आयात केल्याने दर दबावात आहेत. तुरीची बाजारात आवक सुरू झाल्यास दर आणखी दबावात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्याची आवश्यकता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com