व्ही गिरिराज यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
व्ही गिरिराज यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून घेतली कोरडवाहू शेतीची स्थिती

औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही. गिरिराज यांनी नुकताच देवगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी कोरडवाहू शेतीची स्थिती, तिच्या शाश्वततेसाठी व कोरडवाहू शेतकरी सक्षम व्हावेत, यासाठी नेमके काय करायला हवे याची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली.

राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही. गिरिराज औरंगाबाद दौऱ्यावर आले असता त्यांनी देवगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी शेतकरी दीपक जोशी, भास्कर पालवे, शहादेव ढाकणे, रामेश्वर गिते, गहिनीनाथ थोरे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, उपविभागीय कृषी अधिकारी हदगावकर, तालुका कृषी अधिकारी भूते, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. किशोर झाडे उपस्थित होते. 

यावेळी श्री. गिरीराज म्हणाले, की कोरडवाहू शेतीत जेवढा शेतमाल उत्पादित होतो तो थेट विक्रीला जातो. हा विक्रीला जाणारा माल गरजेपुरताच विकावा वा किमान ७० टक्‍के शेतीमाल विक्री करून ३० टक्‍के शेतीमाल गावपातळीवरच एकमेकांच्या गरजा भागविण्यासाठी उपयोगात आणला तर बरेच प्रश्न सुटू शकतील. पाऊसकाळ, वातावरण, जमिनीचा दर्जा यानुसार पीक पद्धतीत बदल करण्याची आवश्‍यकता असून कपाशीचे क्षेत्र घटविण्याशिवाय पर्याय नाही. तसे झाल्यास चाऱ्याचा प्रश्न मिटण्यास मदत होईल. नामशेष होत असल्या पिकांना पुन्हा उभारी देण्याची गरज आहे.

आंतरपीक पद्धतीचा विस्तारही तितकाच आवश्‍यक आहे. पैशांवरील ताण कमी करण्यासाठी पूर्वीच्या पद्धतीनुसार मजुरीच्या बदल्यात पूर्णत: वा काही प्रमाणात धान्य देण्याची पद्धत सुरू करता येईल का याचाही विचार होण्याची गरज आहे. दळणवळणाची साधन नसताना आपल्या गरजांची पूर्ती करण्यासाठी विविध भागांतील लोक काय पर्याय अवलंबत होते याचाही विचार होण्याची गरज असल्याचे श्री. गिरीराज यांनी सांगितल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

`तेलबियांचा हमीभाव वाढवा` शेतकरी त्यांना ज्या शेतीमालास खर्चाच्या तुलनेत परवडणारा दर मिळतो त्याची पेरणी वा लागवड करतात. शासनाने घटत्या तेलबियांच्या क्षेत्र वाढीसाठी त्याच्या हमीभावात भरघोस वाढ करावी म्हणजे शेतकरी त्याकडे वळतील असे मत शेतकऱ्यांनी व्यक्‍त केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com