यंदाची चैत्री वारी रद्द, पंढरपुरात येऊ नका

पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची चैत्री वारी ४ एप्रिलला भरणार आहे. पण कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाची ही वारी रद्द करण्यात आली आहे.
यंदाची चैत्री वारी रद्द, पंढरपुरात येऊ नका
यंदाची चैत्री वारी रद्द, पंढरपुरात येऊ नका

सोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची चैत्री वारी ४ एप्रिलला भरणार आहे. पण कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाची ही वारी रद्द करण्यात आली आहे. भाविकांनी या यात्रेला येऊ नये, असे आवाहन मंदिर समिती आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

दरम्यान, मंदिर समितीने मुख्यमंत्री साह्यता निधीसाठी एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

देशात सध्या कोरोनाचे संकट अधिक गडद झाले आहे. संसर्गजन्य असा विषाणू असल्याने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय सर्वच पातळ्यांवर करण्यात येत आहे. पंढरपुरातही दरवर्षी या वारीसाठी लाखो वारकरी येत असतात. किमान ४ ते ५ लाखांच्याही पुढे वारकरी या वारीसाठी येतात. भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन आता मंदिर समितीने यात्राच रद्द केली आहे. या आधीच १७ मार्चपासून मंदिर समितीने विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन बंद केले आहे. आता वारीच रद्द केली आहे, आतापर्यंतच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे. तसेच येत्या १४ एप्रिलपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात यावे, असा निर्णयही मंदिर समितीने घेतल्याचे श्री. औसेकर यांनी सांगितले. दर्शन बंद असले, तरी मंदिरातील नित्योपचार सुरु आहेत आणि सुरुच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  मेडिकल किट, निराधारांना अन्नाची पाकिटे सामाजिक दायित्व म्हणून मंदिर समितीने या आधीच प्रशासनास मेडिकल किट उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पंढरपूर व परिसरातील निराधार, भिकारी यांच्यासाठी अन्नाची पाकिटे पुरवली जात आहेत. तसेच अशा संकटाच्या काळात राज्य शासनाला मदत व्हावी, या भूमिकेतून मंदिर समितीने मुख्यमंत्री साह्यता निधीसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णयही घेतल्याचे औसेकर महाराज यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com