भंडारदरा परिसरात आढळला घोयरा सरडा 

घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन भंडारदरा परिसरात पाहायला मिळाला. हा एक अतिशय शांत आणि बिनविषारी जीव आहे.
Chameleon
Chameleon

अकोले, जि. नगर ः घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन भंडारदरा परिसरात पाहायला मिळाला. हा एक अतिशय शांत आणि बिनविषारी जीव आहे. बरेचसे लोक याचा उच्चार चमेलिओन असाही करतात, तर असा रंग बदलणारा सरडा आपण कधीतरी पाहिलेला असतो, नाहीतर त्याच्याबद्दल वाचलेलं असतं. हा प्राणी अर्थातच सरडा वर्गात मोडतो. संपूर्ण भारतभर सरडे आढळतात. अगदी हिमालयाच्या पाच हजार मीटर उंचीपासून ते राजस्थानच्या ५० अंश सेल्सिअसच्या वाळवंटी तापमानातही सरडे आढळतात. 

आपल्या परसदारात, शेतात जाता-येता सहज दिसणाऱ्या सरड्यांच्या वर्गात मोडणारा हा घोयरा सरडा मात्र मुबलक प्रमाणात मिळत नाही. अख्ख्या भारतात घोयरा सरड्याची फक्त एकच जात मिळते नी तीसुद्धा मुख्यत्वे दक्षिणेकडेच! घोयरा सरड्याचे वेगळेपण अगदी त्याच्या दिसण्यापासूनच सुरू होतं. खडबडीत दिसणारं शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपटं केल्यासारखं दिसतं. एकावर एक तीन शिरस्त्राणं घातल्यासारखं दिसणारं याचं डोकं, कडबोळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शोभणारे लुकडे पाय नी ‘ज्युरासिक पार्क’ पिक्चरमधल्या डायनोसारची आठवण करून देणारा याचा जबडा, असं सुंदर ते ध्यान, राहे फक्त झाडावरीच’! याचे कारण म्हणजे घोयरा क्वचितच जमिनीवर उतरतो. अगदी तहान लागली तरीही घोयरा झाडाच्या पानांवर पडलेले दवबिंदू पितो. शक्यतो जमिनीवर न उतरणाऱ्या या सरड्याची मादी अंडी घालण्यासाठी जमिनीवर उतरते नी चक्क बीळ खोदून त्यात अंडी घालते. हा सरडा कधीच वेगाने धावत नाही. अगदी संशय घेत चाहूल घेत विचार करून हा सरडा प्रत्येक पाऊल टाकतो.  घोयऱ्याची जीभ म्हणजे निसर्गातलं एक आश्चर्यच! त्याची जीभ त्याचे एकमेव अस्त्र आहे. या जिभेच्या जोडीला याचे डोळे निसर्गातलं दुसरं वैशिष्ट्य असते. घोयऱ्याचे डोळे तेल भरायच्या कोन नरसाळ्याप्रमाणे एका शंकूच्या टोकावर बसवलेले असतात. हे डोळ्याचे दोन्ही शंकू स्वतंत्रपणे वेगवेगळ्या दिशांना फिरू शकतात. किडे मकोडे, भुंगे, फुलपाखरं, मोठे मुंगळे याचे मुख्य भक्ष्य.  आता राहिला प्रश्न त्या रंग बदलण्याचा! या साहेबांना काही धावता येत नाही. त्यामुळे स्वत:चा बचाव कसा करणार? मग अर्थातच सरुपता म्हणजेच केमोफ्लेज होऊन सभोवतालच्या रंगानुरुप होणं! ह्याच्या शरीरातल्या रंगपेशी मेंदूकडून आज्ञा आल्यावर शक्यतो हुबेहूब रंग धारण करायचा प्रयत्न करतात. जर ते शक्य होत नसेल नी शत्रू जवळच आला तर घोयरा स्वत:चं अंग आणि गळा फुगवून आपण भयानक असल्याचा ‘ड्रामा’ करतो. याला दात असतातच. त्यामुळे घोयरा चावल्यास लहानशी जखम होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com