हरभरा बाजारात सुधाराची चिन्हे 

बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे. त्याचबरोबर दरात वाढ झाली. मागील आठवडाभरात दर हे ४२०० रुपयांपासून ४७०० रुपयांपर्यंत गेले आहेत. दर वायद्यांत तीनच दिवसांत ३०० रुपयांची वाढ पाहायला मिळाली.
gram
gram

पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे. त्याचबरोबर दरात वाढ झाली. मागील आठवडाभरात दर हे ४२०० रुपयांपासून ४७०० रुपयांपर्यंत गेले आहेत. दर वायद्यांत तीनच दिवसांत ३०० रुपयांची वाढ पाहायला मिळाली. बाजारात मालाची आवक सुरू झाल्यानंतर सामान्यपणे त्या काळातील वायद्यांतील सौदे कमी दराने होतात. मात्र यंदा सौदे चढ्या दराने होत आहेत. त्यामुळे हरभरा बाजार यंदा चांगला राहील असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले. 

देशात हरभरा पेरणी वाढल्यानंतर यंदा उत्पादनातही वाढ होईल, असा अंदाज सुरुवातीच्या काळात वर्तविण्यात येत होता. मात्र प्रतिकूल हवामान, अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाल्याने उत्पादकतेला फटका बसला. परिणामी, उत्पादनात घट झाली. वाढलेली मागणी, कमी साठा आणि अल्प पुरवठा यामुळे बाजारात हरभरा दर वाढलेले आहेत. सामान्यपणे नवीन मालाची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर दर काही प्रमाणात तुटतात. मात्र यंदा आवक सुरू होऊनही दर वाढतच आहेत. त्यामुळे यंदा हरभराही चांगला भाव खाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

व्यापाऱ्यांचा निम्म्याच उत्पादनाचा अंदाज  केंद्र सरकारने नुकताच देशातील २०२०-२१ मधील अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज जाहीर केला आहे. यात सरकारने यंदा ११६.२ लाख टन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला आहे. गेल्या हंगामातील ११०.८ दशलक्ष टनांपेक्षा हा अंदाज जास्त आहे. मात्र व्यापारी सूत्रांनी यंदा हरभरा उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांनी बाजारात खरेदी सुरू केली आहे. व्यापारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘‘यंदा देशात ६५ ते ७० लाख टनच उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तर काही व्यापाऱ्यांच्या मते एकूण पुरवठा ८५ ते ९५ लाख टनांपर्यंत होईल. त्यामुळे बाजारात दर वाढलेले आहेत.’’ सरकारच्या अंदाजापेक्षा व्यापारी सूत्रांनी वर्तविलेला अंदाज हा जवळ जवळ निम्माच्या थोडा अधिक आहे. त्यामुळे सरकार आणि व्यापाऱ्यांच्या अंदाजामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र बाजारातील स्थिती पाहता व्यापाऱ्यांचा अंदाज खरा निघेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.  उत्पादन घटीमुळे दरात सुधारणा ः सोमाणी  शेतीमाल बाजार विश्‍लेषक दिनेश सोमाणी म्हणाले, की देशात यंदा हरभरा उत्पादकता प्रभावित झाली आहे. त्यामुळे उत्पादनात अपेक्षेपेक्षा जास्त घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन बाजारात साठेबाज सक्रिय झाले आहेत. त्यामुळे मागील आठवड्यांपासून हरभरा दर वाढले आहेत. ‘एनसीडीईएक्स’वर हरभरा दर केवळ मागील तीन दिवसांत ४५८० रुपयांवरून ४८८० रुपयांवर गेले आहेत. महाराष्ट्रात एकरी उत्पादकता सरासरी ७ ते ८ क्विंटल असते. मात्र यंदा एकरी उत्पादकतेत मोठी घट होऊन ४ ते ५ क्विंटल येत असल्याची माहिती आहे. त्यातच शेतकरीही बाजाराचा कानोसा घेऊन माल विकत आहेत. हमीभावाने विक्रीसाठी शेतकऱ्यांनी माल बाजारात आणला नाही. त्यामुळे पुरवठा प्रभावित झाला आहे. त्याच्या परिणामी दरवाढ झाली आहे. पुढील काही दिवसांत दर ५००० रुपयांचा टप्पा गाठतील, असा अंदाज आहे. 

पूरक घटक  

  • उत्पादकतेत घट हा महत्त्वाचा घटक 
  • मागील वर्षातील शिल्लक साठा कमी 
  • सध्या दर हमीभावापेक्षा कमी 
  • बाजारात साठेबाजांची खरेदी सुरू 
  • शेतकरी माल राखून ठेवण्याचे प्रमाण वाढले 
  • दरवाढीचे संकेत  बाजारात हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. मात्र मोठ्या आवकेचा हंगाम अद्याप सुरू झाला नाही. मागील वर्षी पीक बाजारात दाखल होत असतानाच जसजशी आवक वाढत गेली दर कमी होत गेले होते. वायद्यांतही सौदे कमी दराने झाले. मात्र यंदा बाजारात जसजशी आवक वाढत आहे त्यासोबत दरही वाढताना दिसत आहे. वायदे बाजारातही सौदे चढ्या दराने होत आहेत. वायद्यांमध्ये केवळ तीन दिवसांत ३०० रुपयांची वाढ झाली आहे. आवक एकदम वाढल्यानंतर १०० ते २०० रुपयांनी दर तुटण्याचा अंदाज आहे. मात्र वायद्यांत दर वाढल्यानंतर बाजारातही दर वाढतील, असे जाणकारांनी सांगितले. मोठ्या आवकेचा कालावधी सोडल्यास दर वाढतच राहतील. पुढील काळात हरभरा हमीभावाचा टप्पा गाठेल, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.  शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घ्यावा  बाजारात सध्या हरभरा दर वाढत आहेत. मात्र आवक वाढल्यास आणि देशातील सर्वच बाजारांत आवक सुरू झाल्यास दर २०० ते ३०० रुपयांनी तुटतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. यंदाच्या हंगामात दर ४४०० रुपयांच्या कमी राहणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा योग्य अंदाज घेऊन विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले आहे.  वर्षनिहाय हरभरा उत्पादन (लाख टनांत)  वर्ष : उत्पादन  २०१५-१६ : ७०.६  २०१६-१७ : ९३.८  २०१७-१८ : ११३.८  १०१८-१९ : ९९.४  २०१९-२० : ११०.८  २०२०-२१* : ११६.२  (स्रोत ः कृषी मंत्रालय)  (*दुसरा सुधारित अंदाज) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com