खानदेशात उन्हाळ कांदा लागवड कमी होण्याची शक्यता

खानदेशात उन्हाळ कांदा लागवड कमी होण्याची शक्यता
खानदेशात उन्हाळ कांदा लागवड कमी होण्याची शक्यता

जळगाव : उन्हाळ कांदा लागवडीसाठी खानदेशात तापी व इतर नद्यांनजीकच्या गावांमध्ये नियोजन सुरू आहे; परंतु सध्याचे कमी दर व पाण्याच्या अभावामुळे कांदा लागवड मागील हंगामाच्या तुलनेत कमी राहील, असे चित्र आहे. सध्या रोपवाटिकांमध्ये कांदा रोपे उपलब्ध आहेत. त्यांची विक्री सध्या अनेक भागात सुरू आहे. 

खानदेशात उन्हाळ कांदा लागवडीसाठी धुळे, शिरपूर, शहादा, एरंडोल, चोपडा, यावल, चाळीसगाव हे तालुके आघाडीवर आहेत. गिरणा काठावरील अनेक गावांत कांदा लागवड केली जाते. चाळीसगाव, पाचोरा व एरंडोल भागात लागवड सुरू आहे. धुळ्यातही पुढील आठवड्यात ती सुरू होईल. 

पाण्याचा अभाव आणि कमी दरांमुळे खानदेशातील उन्हाळ कांद्याचे क्षेत्र सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टरने कमी होईल, अशी स्थिती आहे. हे क्षेत्र शिंदखेडामधील चिचवार, आरावे भागात घटेल. भडगाव, पाचोरामधील गिरणा नदीपासून लांब अंतरावरील गावांमध्येही क्षेत्र कमी होईल. चोपडा तालुक्‍यातील खर्डी, लोणी, वर्डी, धानोरा व सातपुडा लगतच्या भागात पाणीटंचाई आहे. तेथेही लागवड क्षेत्र कमी होईल. सुमारे सहा ते सात हजार हेक्‍टरवर उन्हाळ कांदा लागवड होऊ शकते. 

सध्या जळगावसह अडावद (ता. चोपडा), धुळे, पिंपळनेर (ता. साक्री) येथील बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक आहे. जळगाव बाजार समितीत प्रतिदिन २५०० क्विंटल लाल कांद्याची, ४०० क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक आहे. दर ३०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान आहेत. नजीकच्या औरंगाबाद जिल्ह्यातील काही गावांतूनही कांद्याची आवक होते. त्यामुळे कांदा लागवडीवर परिणाम होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

यावल व चोपडामधील तापीकाठानजीकच्या भागात कांदा लागवड बऱ्यापैकी होईल. धुळे तालुक्‍यातील नेर, कुसुंबा, कापडणे, न्याहळोद भागातही ठिबक व इतर सिंचन यंत्रणांच्या माध्यमातून शेतकरी कांदा लागवड करतील, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com