नीरेतून बारामतीचे पाणी बंद होण्याची शक्यता

नीरेतून बारामतीचे पाणी बंद होण्याची शक्यता
नीरेतून बारामतीचे पाणी बंद होण्याची शक्यता

सोलापूर : नीरा देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याचे समजते. तसेच याबाबतचा शासकीय अध्यादेश येत्या दोन दिवसांत काढला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली. 

वीर भाटघर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे ५७ टक्के, तर डाव्या कालव्याद्वारे ४३ टक्के पाणीवाटपाचे धोरण १९५४ च्या पाणीवाटप कायद्यानुसार ठरले होते. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्‍यांना पाणी मिळत होते.

डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्‍याला पाणी मिळत होते. मात्र राज्याच्या तत्कालीन मंत्रिमंडळ बैठकीत ४ एप्रिल २००७ मध्ये पाणीवाटपाचा करार बदलला. त्यामध्ये नीरा देवघर धरणातून ६०  टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्‍याला, ४० टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्‍याला देण्याचा निर्णय घेतला. 

या कराराला ठराविक मर्यादा देण्यात आली होती. पण नंतर त्यात कोणताच बदल करण्यात आला नाही. विधान परिषदेचे सभापतिपद मिळाल्याने आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनीही या कराराला विरोध न करता सहमती दिली होती. हा करार संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे हे पाणी बारामती तालुक्‍याला दिले जात होते. हे बेकायदा जाणारे पाणी बंद करून ते पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपुर तालुक्‍यांना मिळावे, अशी मागणी नूतन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. 

याबाबत त्यांनी सोमवारी (ता. ३) पुन्हा महाजन यांची भेट घेतली. त्या वेळी महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारे पाणी कायमचे बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्याचे सांगण्यात आले. याबाबतचा आदेश येत्या दोन दिवसांत काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले. हा अध्यादेश निघाल्यास सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर या धरणांतून बारामती व इंदापूर तालुक्‍यांना नियमबाह्य जाणारे पाणी कायमस्वरूपी बंद होऊन त्याचा फायदा फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्‍यांना होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com