चारा छावण्यांतील जनावरांच्या अनुदानात १० रुपये वाढ ः पाटील

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

मुंबई: चारा छावण्यांतील जनावरांच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून, प्रतिजनावर आता ९० रुपयांऐवजी १०० रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता. १५) दिली. दुष्काळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी आतापर्यंत राज्यातील ६७ लाख शेतकऱ्यांना ४ हजार ४१२ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.  चारा छावण्यांतील जनावरांसाठी लागणारी वैरण खरेदी, वाहतुकीचा खर्च तसेच मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिवस १८ किलो हिरवा चारा व आठवड्यातून तीन दिवस १ किलो पशुखाद्य दिले जाते. तसेच, लहान जनावरांसाठी ९ किलो हिरवा चारा व लहान जनावरांसाठी १ किलो पशुखाद्य देण्यात येते, त्यामुळे अनुदानामध्ये प्रतिजनावर १० रुपयांची वाढ करून आता मोठ्या जनावरांसाठी १०० रुपये तर लहान जनावरांसाठी ५० रुपये दर देण्यात येणार आहे.  मंत्रालयात दुष्काळ निवारणासंबंधीच्या उपसमितीची बैठक झाली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, चारा छावणी, पाणीपुरवठा, रोहयो आदींचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. या वेळी समितीचे सदस्य वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पर्यटन व रोहयोमंत्री जयकुमार रावल, पदुममंत्री महादेव जानकर आदी उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, सध्या राज्यात १४१७ चारा छावण्या सुरू असून त्यामध्ये ९ लाख ३९ हजार ३७२ पशुधन आहे. या पशुधनांसाठी मोठ्या जनावरांना प्रतिदिवस १८ किलो हिरवा चारा व आठवड्यातून तीन दिवस १ किलो पशुखाद्य आणि लहान जनावरांना ९ किलो हिरवा चारा व १ किलो पशुखाद्य देण्यात येते. पशुधनासाठी पाणी आणणे, लांब अंतरावरून चारा आणणे यासाठी वाहतूक खर्च वाढत असल्यामुळे चारा छावणीचालकांना देण्यात येणाऱ्या अनुदानात दहा रुपये वाढ करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे मोठ्या जनावरांना ७० रुपये तर लहान जनावरांना ३० रुपये अनुदान आहे. मात्र, राज्यातील परिस्थिती पाहून वाढीव अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागासाठी १११ कोटी, पुणे विभागासाठी ४ कोटी व नाशिक विभागासाठी ४७ कोटी निधी वितरित करण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com