शिवसेना-भाजप युतीची चर्चा अंतिम टप्प्यात : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

मुंबई  ः शिवसेना-भाजप युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

मुंबईत मंगळवारी (ता. २४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, की युतीची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. लवकरच आम्ही युतीची घोषणा करू. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासंबंधी विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये यासंबंधी चर्चा असून त्यानुसार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

भाजप-शिवसेना युतीमध्ये केवळ जागा वाटपाचाच तिढा नसून निम्म्या जागा, मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समान वाटपाचाही शिवसेनेचा आग्रह कायम आहे. भाजप मात्र मुख्यमंत्रीपद सोडाच तर उपमुख्यमंत्रीपद किंवा महत्त्वाची खातीही देण्यास तयार नाही. मुख्यमंत्रीपदासह सत्तेच्या समान वाटपाच्या मुद्द्याचा निवडणूक निकालानंतर विचार होईल. ते कसे करायचे, यावर नंतर निर्णय होईल. आधी जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल, त्याबाबत अजून सहमती झालेली नाही, असेही श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीआधी भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाली. तेव्हा विधानसभेतही युती होईल आणि उभयपक्षी सत्तेचे समान वाटप होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यामुळे निम्म्या जागांसह अडीच वर्षे मुख्यमंत्री पद, महत्त्वाच्या खात्यांसह निम्मी खाती मिळावीत आणि सत्तावाटपाचा निर्णयही विधानसभेसाठी युतीची घोषणा करताना व्हावा, असा शिवसेनेचा आग्रह आहे. मात्र, राज्यात ताकद वाढल्याने भाजप आक्रमक असून युतीमध्ये पूर्वी शिवसेनेकडे १७१ व भाजपकडे ११७ जागा हे जुने सूत्र उलट करण्याच्या तयारीत आहे. भाजपने तसाच प्रस्ताव शिवसेनेकडे दिला आहे. मुख्यमंत्रिपदासह नगरविकास, अर्थ, गृह व महसूल खात्याचा आग्रह शिवसेनेने सोडला, तर युती होऊ शकेल, असे भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com