‘शेतकरी सन्मान भवन’ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल ः पाटील

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: जिल्ह्यातील कृषी सन्मान भवन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. याच्या माध्यमातून कृषी प्रशिक्षणासारख्या सुविधा शेतकऱ्याला एका ठिकाणी मिळू शकतील, असे मत कृषी व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता. १३) येथे व्यक्त केले. येथील शेंडा पार्क येथे नियोजित असलेल्या कृषी विभागाच्या शेतकरी सन्मान भवन या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.  श्री. पाटील म्हणाले, की कृषी विभागाची विविध खाती विविध इमारतीमध्ये असतात. त्यामुळे शेतीच्या कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांची अनेकदा ओढाताण होते. हे टाळण्यासाठी कृषीची विविध कार्यालये एकाच इमारतीत करण्याचा अनेक दिवस प्रयत्न सुरू होता. या प्रशासकीय इमारतीसाठी कृषी महाविद्यालयाने तीन एकर जागा दिल्याने शेतकरी सन्मान भवन उभारता येत आहे. वर्ष-दीड वर्षात या ठिकाणी काही कार्यालये सुरू होतील. या इमारतीत शेतकऱ्यांसाठी ट्रेनिंग सेंटर असेल. राहुरी कृषी विद्यापीठाप्रमाणेच या ठिकाणी एक असे सेंटर असेल, ज्यामध्ये नव नवीन बियाणांचे संशोधन, खते, बियाणे यांची माहिती मिळेल व विक्रीही होईल. वर्षभरात ६०० शेतकऱ्यांना स्टॉल उपलब्ध करून त्यांना त्यांचे उत्पादन विक्रीची संधी देता येईल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकरी सन्मान भवन अत्यंत उपयुक्त ठरेल, असे श्री. पाटील यांनी सांगितले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे, अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, छ. रा. शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता गजानन खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, आत्मा सांगलीचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.  हे भवन उभारण्यासाठी २९ कोटी ८० लाख रुपये शासन मान्यताप्राप्त झालेले आहे. शहरातील कृषी विभागाची सुमारे अकरा कार्यालये या इमारतीत एकत्र येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com