टंचाईग्रस्त एक हजार गावांमध्ये पाण्यासाठी टाक्या बसविणारः चंद्रकांत पाटील

चंद्रकांतदादा पाटील
चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : पाणी टंचाई असलेल्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवताना नागरिकांना विशेषतः महिलांना होणारा त्रास वाचावा आणि टँकरच्या पाण्याचे योग्य वितरण व्हावे, यासाठी राज्यातील दुष्काळी भागातील एक हजार गावांमध्ये दहा हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या प्लॅस्टिक टाक्या बसविण्याचे निर्देश नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल (ता.८) दिले. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत श्री. पाटील यांनी ही माहिती दिली. या वेळी पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जून खोतकर, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, कृषी व रोहयो सचिव एकनाथ डवले आदी या वेळी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, पाणी टंचाई असलेल्या १६८८ गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी टँकर सुरू आहेत. गावात टँकर आले की, पाणी भरण्यासाठी नागरिकांची घाई उडते. विशेषतः महिलांची होणारी तारांबळ लक्षात घेऊन टँकर सुरू असलेल्या गावांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दहा हजार लिटर क्षमतेच्या एक हजार टाक्या बसविण्यात येणार आहेत. यासाठी कार्पोरेट कंपन्यांसमवेत बोलणे झाले असून काही कंपन्या यासाठी मदत करणार आहेत. दहा नळ जोडलेल्या या टाक्यांमध्ये टँकरचे पाणी भरून ठेवण्यात येईल. यामुळे पाणी घेण्यासाठी होणारी झुंबड व गडबड टळून सर्वांना व्यवस्थित पाणीपुरवठा होईल. राज्य शासनाने यापूर्वीच दुष्काळी भागासाठी निधी वितरित केला आहे. ही मदत शेतकऱ्यांना देण्याची कार्यवाही सुरू असून त्यावर रोजच्या रोज लक्ष ठेवले जात आहे. दुष्काळी कालावधीत राज्यातील दुष्काळी भागातील जनावरांसाठी १४४.४२ लाख मेट्रिक टन वाळलेल्या चाऱ्याची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय कृषी योजनेच्या वैरण विकास कार्यक्रमाअंतर्गत ९.६२ लाख मेट्रिक टन हिरव्या वैरणीचे उत्पादन करण्यात येत आहे. तसेच ८५ हजार ३३८ हेक्टर गाळपेर क्षेत्रात वैरण उत्पादनासाठी १९ हजार ८७८ जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यांना आतापर्यंत १४ हजार ९०६ क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. आतापर्यंत पेरणी झालेल्या १८ हजार ४५० हेक्टर गाळपेर जमिनीतून १४.३३ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com