माढ्यात चंद्रकांत पाटील यांची व्यूहरचना

माढ्यात चंद्रकांत पाटील यांची व्यूहरचना
माढ्यात चंद्रकांत पाटील यांची व्यूहरचना

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. मोहिते पाटील यांच्या प्रवेशाने भाजपला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, भाजपचे सहयोगी सदस्य संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पुन्हा वातावरण बदलले आहे. या पार्श्‍वभूमीवर माढा मतदारसंघातील असंतुष्ठांच्या गाठीभेटी घेण्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा भर आहे. भाजपला अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष साह्य करू पाहणाऱ्या काही नेत्यांशी संवाद साधत,  राष्ट्रवादीवर हल्लाबोल करून त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. 

सातारा कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपत प्रवेश देऊन त्यांची माढ्यासाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजप आणि शिवसेना दोन्ही बाजूने जोर लावण्यास सुरवात झाली आहे. त्याच अनुषंगाने महसूलमंत्री पाटील हे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, पंढरपूर, माढा, करमाळा अशा सर्वच विधानसभा मतदारसंघांत फिरले. पहिल्यांदा त्यांनी सांगोल्यात भाजप-शिवसेना युतीचा मेळावा घेतला. त्यानंतर माळशिरसमध्ये मोहिते पाटील गटातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पंढरपुरात आमदार प्रशांत परिचारक यांच्यासमवेत, टेंभुर्णीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मेळावा घेतला. करमाळ्यातही शिवसेना आणि भाजपचा मेळावा घेतला.

दरम्यान, भाजपला साह्य करणारे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील, वेळापूरचे उत्तमराव जानकर यांच्याशीही पाटील यांनी संवाद साधला. करमाळ्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभुराजे जगताप यांना पक्षात प्रवेश देऊन बेरजेचे राजकारण केले. 

कारवाईचा धमकीवजा इशारा महसूलमंत्री पाटील यांनी केवळ संजय शिंदे आणि शरद पवार यांना लक्ष्य केले. पवार यांनी माढा मतदारसंघ आपल्या गणतीतून सोडावा, असा प्रहार केला. संजय शिंदे यांना त्यांच्या साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पावर कारवाई करण्याचा धमकीवजा इशाराही दिला. एकूणच महसूलमंत्री पाटील यांचा हा दौरा भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणणारा अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com