चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखल

changdev yatra
changdev yatra

चांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव महाराजांच्या तपोभूमीत श्रीक्षेत्र चांगदेवला शुक्रवारी (ता. २१) यात्रोत्सव सुरू झाला आहे. हा उत्सव आणखी दोन दिवस सुरू राहणार आहे. या यात्रोत्सवास महाशिवरात्रीपासून प्रारंभ होतो. आदिशक्ती मुक्ताईच्या यात्रोत्सवास आलेल्या वारकरी दिंड्या व असंख्य भाविक एकादशीचा उपवास सोडून चांगदेवला दाखल झाले असून, भक्तीमय वातावरण झाले आहे.  मंदिरात पहाटे पाचला चांगदेव महाराजांच्या मूर्तीला मंगलस्नान घालण्यात आले. मूर्तीचा रुद्राभिषेक आणि महापूजा आमदार चंद्रकांत पाटील, विनोद तराळ, ईश्वर रहाणे, राजू वानखेडे, ॲड. राजेंद्र चौधरी, रवींद्र पाटील, चांगदेवच्या सरपंच संजिवनी पाटील, पंकज कोळी, पल्लवी चौधरी यांच्या हस्ते झाला. येथील भाग्यश्री भोई व किशोर भोई या वारकरी दाम्पत्याला रुद्राभिषेक व महापूजेचा विशेष मान मिळाला.  अशी आहे आख्यायिका  संत चांगदेव महाराजांनी येथे चौदाशे वर्षे तपश्‍चर्या केली आहे. तपश्‍चर्येमुळे पूर्वीचे भिन्नापूर आज चांगदेव म्हणून ओळखले जाते. चांगदेव महाराजांच्या नावाने हे गाव आता प्रसिद्ध आहे. चांगदेव महाराज भगवान शंकराची आराधना करणारे महान तपस्वी होते. तपश्‍चर्येच्या काळात यमाला चौदा वेळा त्यांनी परत पाठविले होते. चांगदेवांनी तापी-पूर्णा संगमातीरी वाळूपासून शिवलिंगाची स्थापना केली. याला वटेश्वर महादेव नाव देण्यात आले आहे.  महाशिवरात्रीच्या दिवशी सिद्धेश्वर योगिराज चांगदेव महाराजांना प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भगवान शिव व पार्वतीमाता यांनी दर्शन दिले. नंतर चांगदेव महाराजांनी आपले अवतार कार्य पूर्ण करून माघ वद्य त्रयोदशीला म्हणजेच महाशिवरात्रीच्या पर्वावर समाधी घेतली आहे. यामुळेच या महान तपस्वी शिवभक्ताच्या स्मरणार्थ चांगदेवला महाशिवरात्रीच्या पर्वावर समाधी सोहळ्यानिमित्त यात्रोत्सव साजरा केला जातो.  पहाटे महापूजेनंतर भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. हे मंदिर पुरातन हेमाडापंथी आहे. भक्तांना दर्शन व्यवस्थित घेता यावे, यासाठी मंदिराच्या बाजूला बॅरिकेटस्‌ उभारण्यात आले आहे. यात्रेसाठी आलेल्या दिंड्यांचे स्वागत चांगदेव देवस्थानाचे पुजारी समस्त गुरव परिवारातर्फे श्रीफळ देऊन करण्यात येणार आले.  नावाडी संघटनेकडून दक्षता  तापी-पूर्णा संगमातिरी भाविकांच्या स्नानाच्या सोयीसाठी नावाडी संघटनेने उपाययोजना केल्या आहेत. नदीत खोल डोहाजवळ कोणीही स्नानाला जाऊ नये व अपघात घडू नये याकरिता नावाडी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आवाहन करण्यात येत आहे. नावाडी चालकमालक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र म्हैसरे यांचे सहकार्य लाभत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com