कृषिपदवीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

 पुणे  ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषिपदवीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून कोकण, पश्चिम, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कृषिपदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता अडचणी येत आहेत. यामुळे कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने पूर्वीच्या वेळापत्रकात बदल करून सुधारित वेळापत्रक तयार केले आहे. विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीअंतर्गत येत्या १३ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार आहे, अशी माहिती कृषी परिषदेच्या सूत्रांनी दिली. 

कृषिपदवीसाठी राज्यात २९ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. आत्तापर्यंत प्रवेशाची पहिली फेरी पार पडली असून दुसरी फेरी बुधवार (ता. ७) ते शुक्रवार (ता. ९) या कालावधीत होणार होती. मात्र, राज्यामध्ये विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश फेरीच्या पूर्वीच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी परिषदेकडे केली होती.

त्यानुसार परिषदेने शासनाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर कृषिमंत्री कार्यालयाचे कक्ष अधिकारी प्रताप गिते यांनी गुरुवारी (ता. ८) त्यास मंजुरी दिली. कृषी परिषदेने दुसऱ्या फेरीत सुधारित पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी १३ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली. तसेच, त्यापुढील सर्व प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे. बदललेल्या वेळापत्रकाची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशवाटप झालेल्या विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे सुलभ होणार आहे.  

कृषी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली असली तरी अजून तीन फेऱ्या बाकी आहेत. प्रवेशासाठी एकूण चार फेऱ्या होणार आहे. चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर जागेवरील प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांच्या तपशीलाची यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. रिक्त जागांकरिता जागेवर प्रवेश फेरी ३ ते ६ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यानंतर संस्थास्तरीय कोटा प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे.    कृषिपदवीचे सुधारित वेळापत्रक 

  • दुसऱ्या प्रवेश फेरीचा रिपोर्टिंगचा कालावधी - ७ ते १३ ऑगस्ट, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत. 
  • दुसऱ्या प्रवेश फेरीअखेर रिक्त असलेल्या जागांची प्रसिद्धी - १४ ऑगस्ट. 
  • तिसऱ्या प्रवेश फेरीच्या यादीची प्रसिद्धी - १६ ऑगस्ट, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत. 
  • रिपोर्टिंगचा कालावधी - १७ ते २० ऑगस्ट सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत. 
  • तिसऱ्या प्रवेश फेरीअखेर रिक्त असलेल्या जागांची प्रसिद्धी - २१ ऑगस्ट. 
  • चौथ्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी (रूपांतरासह) -- २४ ऑगस्ट, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत. 
  • रिपोर्टिंगचा कालावधी २५ ते २८ ऑगस्ट -- सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • उमेदवारांनी संबधित महाविद्यालयात उपस्थित राहून मूळ कागदपत्रे व आवश्यक ते शुल्क भरण्याचा कालावधी -- २५ ते २९ ऑगस्ट, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत.   
  • जागेवरील प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांच्या तपशीलाची प्रसिद्धी -- ३१ ऑगस्ट. 
  • रिक्त जागाकरिता जागेवर प्रवेश फेरी -- ३ ते ९ सप्टेंबर. 
  •  संस्थास्तरीय कोट्यातील जागा भरण्याचे वेळापत्रक  संकेतस्थळावर महाविद्यालयनिहाय उपलब्ध जागांची प्रसिद्धी -- ६ सप्टेंबर. 
  • संबंधित संस्था, महाविद्यालयाकडे, व्यक्तीशः प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्याचा कालावधी -- ७ ते ८ सप्टेंबर. 
  • संबंधित संस्थेच्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर व सूचना फलकावर गुणवत्ता यादी, निवड यादीची प्रसिद्धी -- १० सप्टेंबर, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत. 
  • निवड यादीतील उमेदवारांनी प्रवेश घेण्यासाठी, संबंधित संस्था महाविद्यालयाकडे मूळ कागदपत्रे व आवश्यक त्या शुल्काच्या धनाकर्षासह उपस्थित राहण्याचा कालावधी - ११ ते १३ सप्टेंबर, सायंकाळी ५.३०. 
  • निवड यादीतील उमेदवार विहीत कालावधीमध्ये उपस्थित नसल्यास रिक्त असणाऱ्या जागा गुणवत्तेने भरण्याचा कालावधी -- १६ ते १७ सप्टेंबर, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत. 
  • वर्ग सुरू होण्याचा कालावधी -- २६ सप्टेंबर. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com