चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले

काजू
काजू
चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या फुलोऱ्याच्या ऐन हंगामात सतत थंडी आणि धुक्‍यामुळे उत्पादन सुमारे पन्नास टक्‍क्‍यांनी घटले आहे. याचा फटका शेतकऱ्यांसह काजू प्रक्रिया उद्योजकांनाही बसला आहे. काजू बी उशिरा बाजारपेठेत आणले की दर मिळतो या मानसिकतेमुळे स्थानिक माल बाजारपेठेत येत नसल्याने अजूनही आठवडा बाजारात काजूचा व्यापार थंडच आहे. प्रक्रिया उद्योजकांना अधिक दराने कोकणातून तसेच इंडोनिशिया येथून काजू बी आयात करावे लागत आहेत. 
 
कोकण घाटमाथ्याला लागून असलेल्या आजरा, चंदगड, गडहिंग्लजचा पश्‍चिम भाग तसेच भुदरगड, राधानगरी तालुक्‍यात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. गेल्या काही वर्षात काजूवर प्रक्रिया करणारे उद्योगही मोठ्या प्रमाणात तयार झाले असून या कारखान्यातून हजारो महिलांना बारमाही रोजगार मिळाला आहे.
 
चंदगडसारख्या तालुक्‍यात लहान-मोठे मिळून पन्नासहून अधिक प्रक्रिया उद्योग असून त्यांना वार्षिक सुमारे १५ हजार टन काजूची गरज भासते. मात्र मे महिन्यातच हे बी बाजारपेठेत आणण्याबाबत शेतकऱ्यांची पारंपरिक मानसिकता व्यापारी, प्रक्रिया उद्योजकांना अडचणीची ठरत आहे.
 
या वर्षी मुळातच पन्नास टक्केहून अधिक उत्पादनात घट झाल्याचा परिणाम सध्या बाजारपेठेत दिसून येत आहे. आठवडा बाजारात बी खरेदीसाठी काटे लावून बसणाऱ्या व्यापाऱ्यांना मजुरी आणि वाहनाचे भाडे देण्याएवढेही पैसे मिळत नसल्याची स्थिती आहे. उत्पादनात घट असल्याने सध्या काजू बीचा किलोचा दर १४० रुपयांवर पोचला आहे. तो दीडशे रुपयांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.
 
परंतु उत्पादनात घट असल्याने शेतकऱ्यांना या वर्षी या पिकाकडून फारसा दिलासा मिळणार नाही हे स्पष्ट आहे. काजू कारखानदार आणि शेतकरी हे एकमेकांवर आधारित घटक आहेत. बी अभावी उद्योग बंद ठेवल्यास त्याचा फटका कारखानदार आणि मजुरांना बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी मानसिकता बदलून उपलब्ध माल ज्या-त्या वेळी बाजारपेठेत आणायला हवा, असे मत उद्योजक पांडुरंग काणेकर यांनी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com