'घट्टी'च्या नावावर एक टन कलिंगड घेतले जातेय फुकट

सौद्यापुर्वी कलिंगडाची प्रत तपासताना व्यापारी
सौद्यापुर्वी कलिंगडाची प्रत तपासताना व्यापारी

अमरावती  ः संत्र्यानंतर आता कलिंगडाच्या खरेदी विक्री व्यवहारातही घट्टीच्या नावावर शेतकऱ्यांना लुटण्याचा गोरखधंदा व्यापाऱ्यांनी चालविला आहे. बांधावर किंवा बाजारामध्ये खरेदी करताना १०० किलोमागे तब्बल पाच किलो जास्त फळे घेतली जात असून २० टनांमागे व्यापाऱ्यांकडून सुमारे १ टन माल फुकटात घेतला जात आहे.  

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील काही भाग, पाण्याची उपलब्धता असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा परिसरात कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच मोठ्या क्षेत्रावर कलिंगडाची लागवड केली आहे. परंतु, या फळपिकाच्या खरेदी विक्री व्यवहारात व्यापाऱ्यांकडून घट्टीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुट केली जात असल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांनी याचा विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडला जातो.  

१०० किलोमागे पाच किलो फळे विनामोबदला अतिरिक्‍त घेतली जातात. या हिशोबाने २० टनांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून सुमारे १ टन फळे फुकटात घेतली जात आहेत. सध्या कलिंगडाच्या एक नंबर दर्जाच्या फळाचे व्यवहार सव्वा नऊ ते साडे नऊ रुपये किलाने होत आहेत. हा दर अपेक्षित धरता २० टनांमागे एक टन फळे फुकटात देणाऱ्या शेतकऱ्याला सुमारे साडेनऊ हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. गाडी भरल्यानंतर देशाच्या इतर भागांत माल पोचविताना त्यातील माल विविध कारणांमुळे खराब होतो. यामुळे होणारे नुकसान अपेक्षित धरून ही घट घेतली जात असल्याचा दावा व्यापारी करतात. परंतु, थेट बांधावरूनच तोड करून चांगल्या प्रतीची फळे घेतली जात असताना त्यानंतर होणाऱ्या नुकसानीस शेतकरी जबाबदार कसे, असा प्रश्‍न कलिंगड उत्पादकांनी केला आहे.

दुकानातून खरेदी केलेल्या काही उत्पादनांच्या बाबतीत असा नियम लागू होत नाही. मग शेतमालालाच असा नियम का ? असाही प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. याच अनुषंगाने अचलपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी यापुढील काळात व्यापाऱ्यांच्या या धोरणाला विरोध करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याला किती यश मिळते हे येता काळच सांगणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com