...अशी तपासा बियाणांची उगवणक्षमता

बीजोत्पादित केलेल्या बियाणांची उगवण क्षमता प्रमाणाकापेक्षा कमी असल्यास बीजोत्पादन नापास होऊ शकते. प्रमाणकापेक्षा जास्त उगवण असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरावे.
paper method
paper method

बीजोत्पादित केलेल्या बियाणांची उगवण क्षमता प्रमाणाकापेक्षा कमी असल्यास बीजोत्पादन नापास होऊ शकते. प्रमाणकापेक्षा जास्त उगवण असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरावे. येत्या हंगामात पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाणांची उगवणक्षमता, आनुवंशिकता आणि भौतिक शुद्धता याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. बियाणांची उगवणक्षमता व शुद्धता न तपासता बियाणे पेरणीसाठी वापरल्यास त्यांची उगवण चांगली होत नाही. काही शेतकरी त्यांच्याकडील मागील हंगामातील धान्य पेरणीसाठी वापरतात. धान्य आणि बियाणे यातील मुख्य फरक म्हणजे बियाणे शुद्ध आणि उगवणक्षम असते तर धान्य म्हणून वापरलेले बियाणे शुद्ध आणि उगवणक्षम असतेच असे नाही. पेरणीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे वापरल्यास अपेक्षित मिळते.

बियाण्याचे परीक्षण आणि उगवण बियाणे पेरणीसाठी वापरताना त्याची उगवण क्षमता, शुद्धता, इतर जातींच्या पिकांची भेसळ, रोगट किंवा फुटके बियाणे याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा बियाणांचा पेरणीसाठी वापर केल्यामुळे उगवण चांगली होत नाही, त्यामुळे पेरणीचा हंगाम वाया जाण्याची शक्यता असते. बियाणे उगवण क्षमता तपासणी

  • बियाणांची उगवण क्षमता तपासण्यासाठी त्यांच्या प्रतिकात्मक नमुन्यातील किमान ४०० बियांची तपासणी करावी. ज्या बियाणांची उगवण क्षमतेची तपासणी करायची आहे, त्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी. तपासणीसाठीचे बियाणे शुद्ध बियाण्यातून घ्यावे.
  • प्रयोगशाळेत बियाणांची उगवण क्षमता तपासणीसाठी उगवण कक्ष (जर्मीनेटर) या उपकरणाची आवश्‍यकता असते. यामध्ये बियाणांच्या उगवणीसाठी आवश्‍यक असलेले तापमान आणि आर्द्रता राखता येते. बियाणे उगवणीस ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कागदाचा (टॉवेल पेपर) वापर केला जातो. या कागदामध्ये ओलावा राखला जाऊन बियाणांची उगवण व वाढ होण्यास मदत होते.
  • उगवणक्षमता तपासण्याच्या पद्धती  शोष कागदाचा वापर लहान आकाराच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्यासाठी याचा वापर केला जातो. एका काचेच्या प्लेटमध्ये खाली कापसाचा पातळ थर ठेवून त्यावर शोष कागद ठेवला जातो. त्यावर पाणी टाकून ओले केले जाते. पाणी जास्त झाल्यास ते निथळून घ्यावे. अशा प्लेटमध्ये बी मोजून ठेवावे. त्यावर झाकण ठेवून ओलावा टिकून राहिल याची काळजी घ्यावी. या प्लेट उगवण कक्षामध्ये (जर्मीनेटर) ठेवाव्यात किंवा चांगल्या प्रकारे आद्रता (७० टक्के पेक्षा जास्त) असलेल्या बंद खोलीत ठेवल्या तरी चालते.

    कागदामध्ये बियाणे ठेवून तपासणी  उगवणक्षमता तपासण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या ओल्या केलेल्या कागदामध्ये (टॉवेल पेपर) बी मोजून ठेवावे. कागद गोल गुंडाळी करून त्यावर मेणकागद (वॅक्स पेपर) खालील ३/४ भागास गुंडाळावा. त्यास उगवणीसाठी आवश्यक असणाऱ्या तापमान आणि आद्रता असलेल्या जर्मीनेटरमध्ये ठेवावे. ओले कागद बोटाने दाबले असता बोटाभोवती पाणी दिसणार नाही इतकाच कागद ओला असावा. वाळूचा वापर  कुंडी किंवा ट्रेमध्ये ओली वाळू घेऊन त्यात १ ते २ सेंमी खोलीवर समान अंतरावर मोजून बी ठेवावे. बियांच्या आकारमानावर वाळूचा ओलेपणा ठरवावा. या कुंड्या जर्मीनेटरमध्ये उगवणीसाठी ठेवाव्यात. उगवणीसाठी बियाणे एक समान अंतरावर ठेवावे. ओलाव्याचे प्रमाण योग्य राहील याची काळजी घ्यावी. उगवणीसाठी आवश्यक असणारे तापमान आणि आद्रता राखण्याचा प्रयत्न करावा. साधारणपणे ८ ते १० दिवसांत बियाण्याची उगवण होते.

    उगविलेल्या रोपांचे वर्गीकरण  साधारण किंवा चांगली रोपे

  • चांगली वाढ झालेल्या आणि अनुकूल परिस्थितीत चांगल्या झाडांमध्ये रूपांतर होण्याची क्षमता असलेल्या रोपांना साधारण किंवा चांगली रोपे म्हटले जाते. या रोपांच्या सर्व भागांची वाढ व्यवस्थित झालेली असते. मुळांची वाढ चांगली होऊन त्यावर तंतूमुळे वाढलेली असतात.
  • चांगली वाढलेली परंतु थोडी मुळांची खुरटलेली वाढ असलेली रोपे सुद्धा साधारण किंवा चांगल्या प्रकारात मोडतात. तसेच व्यवस्थित वाढलेली परंतु बाहेरील बुरशीचा संसर्ग झाला असलेली रोपेदेखील या प्रकारात येतात.
  • विकृत रोपे  ही रोपे अनुकूल परिस्थितीत सुद्धा व्यवस्थित वाढू शकत नाहीत. पूर्ण झाडांमध्ये वाढ होण्याची क्षमता त्यांच्यात नसते. त्यांच्या कोंब आणि मुळांना इजा पोचलेली असते. तसेच बियाणांशी निगडीत असलेल्या बुरशीमुळे रोपे कुजण्याच्या अवस्थेत असतात. कठीण बी या प्रकारांत उगवण न झालेल्या बियांचा समावेश होतो. उगवणीला ठेवल्यानंतर ८ ते १० दिवसांत या बियांची उगवण होत नाही. यातील काही बिया पाणी न शोषल्यामुळे उगवत नाहीत. काही बी हे त्याच्या सुप्त अवस्थेत तर काही बियाणे मेलेले असल्यामुळे उगवत नाहीत. पोकळ, किडलेले, गर्भ नसलेले बियाणे हे सर्व याच प्रकारात मोडतात. तपासणीचे निष्कर्ष 

  • प्रत्येक पिकांमध्ये प्रमाणीकरण यंत्रणेने उगवणीची टक्केवारी प्रमाणित केलेली आहे. बीजोत्पादित केलेल्या बियाणांची उगवण क्षमता प्रमाणकापेक्षा कमी असल्यास बीजोत्पादन नापास होऊ शकते. प्रमाणकापेक्षा जास्त उगवण असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरावे.
  • उगवणीच्या टक्केवारीमध्ये १० टक्के पर्यंत कमी उगवण असल्यास, एकरी ठरवून दिलेल्या बियाण्यापेक्षा १० टक्के जास्त बियाणे वापरावे. परंतु त्यापेक्षा कमी उगवण क्षमता असल्यास असे बियाणे वापरू नये.
  • पेरणीसाठी वापरायच्या बियाणांचे परीक्षण करून घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी जवळील बीज प्रयोगशाळा, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र यांच्याशी संपर्क साधून वापरण्यात येणाऱ्या बियाण्याची उगवणक्षमता तपासून घ्यावी.
  • घरच्या घरी ओल्या पोत्यामध्ये वाळू (बारीक रेती), शोष कागदामध्ये उगवणक्षमता चाचणी करून बियाण्यांची उगवणक्षमता तपासता येईल.
  • संपर्क - डॉ. दिपाली कांबळे, ९४२०२१२२७१ (कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर,जि.जालना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com