Agriculture news in marathi Check for rabies symptoms, take measures | Agrowon

रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करा

डॉ. वर्षा थोरात, डॉ. मनोजकुमार आवारे
मंगळवार, 23 जून 2020

मनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला बाधित करतो. ज्यामुळे मेंदूचे विकार उद्भवतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, अशक्तपणा जाणवतो. लक्षणे तपासून तातडीने उपचार करावेत.

मनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला बाधित करतो. ज्यामुळे मेंदूचे विकार उद्भवतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, अशक्तपणा जाणवतो. लक्षणे तपासून तातडीने उपचार करावेत.

रेबीज हा विषाणूमुळे होणारा झुनोटिक आजार आहे. हा आजार प्राण्यांपासून मानवास होऊ शकतो. रेबीज टाळता येण्यासारखा आजार आहे. रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला संक्रमित करतो. यामुळे मेंदूचे विकार होतात, मृत्यू ओढवतो. संक्रमण झाल्यानंतर सुरुवातीला इतर आजारासारखीच लक्षणे म्हणजेच ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, अस्वस्थता जाणवतो. आजार वाढत गेल्यानंतर विशिष्ट लक्षणे दिसतात. ज्यामध्ये निद्रानाश, चिंता, आंशिक अर्धांगवायू, अन्न गिळण्यामध्ये अडचण येते. मृत्यू हा सहसा लक्षणे दिसायला लागल्यावर काही दिवसामध्ये होतो.

प्रसार 

 • आजाराचा प्रसार संक्रमण झालेला प्राणी, संक्रमण नसलेल्या प्राण्याला किंवा मनुष्याला चावल्यामुळे होतो. फार क्वचितवेळा संक्रमित प्राण्याच्या लाळेचा संपर्क त्वचेच्या जखमेशी आल्यास प्रसार होतो. एका मनुष्यापासून दुसऱ्या मनुष्याला फार कमी वेळा प्रसार होतो, परंतु संक्रमण असलेल्या मनुष्याचा एखादा अवयव संक्रमण नसलेल्या मनुष्यामध्ये प्रत्यारोपणासाठी वापरला गेला तर हा आजार होऊ शकतो.
 • वटवाघूळ, कोल्हे, रॅकुन्स, स्कंक्‍स व जंगली मांजरांमुळे मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. रेबीज पसरविणाऱ्या कमी धोकादायक प्रजातीमध्ये कुत्रा, मांजर, हरीण, अस्वल, घोडे, जनावरे, डुक्कर यांचा समावेश होतो.
 • विषाणू जास्त वेळापर्यंत यजमानाच्या शरीराबाहेर हवेमध्ये राहू शकत नाही. या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्राण्याच्या शरीरामध्ये २४ तासांपेक्षा कमी वेळापर्यंतच हा विषाणू दिसतो. रेबीजचे विषाणू लाळेमध्ये सर्वाधिक दिसतात.
 • रेबीजग्रस्त प्राणी चावला असेल तरी योग्य उपचार घेतल्यास आजार आटोक्‍यात येतो.

लक्षणे 

 • रेबीजच्या विषाणूने एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर तो मज्जातंतूच्या मदतीने मेंदूपर्यंत पसरतो. विषाणू मेंदूपर्यंत पोहचण्यासाठी ३ ते ८ आठवडे कुत्र्यामध्ये, २ ते ६ आठवडे मांजरांमध्ये आणि ३ ते ६ आठवडे मनुष्यामध्ये घेऊ शकतो. तथापि हा कालावधी ६ महिन्यापर्यंत कुत्रा आणि १२ महिन्यांपर्यंत मनुष्यामध्ये वाढत गेल्याचे काही वेळा आढळून आले आहे.
 • विषाणू मेंदूपर्यंत पोहचला की तेथून पुढे तो लाळग्रंथीपर्यंत जातो. लाळेव्दारे इतर प्राण्यांना संक्रमित करायला सुरुवात करतो. विषाणू मेंदूमध्ये पोहचल्यानंतर संक्रमित प्राण्यांमध्ये आजाराचे तीन टप्पे दिसतात. प्राण्यांमध्ये काळजी किंवा भीती, अस्वस्थता, चिंता, एकाकीपणा आणि तापाची लक्षणे दिसतात. शांत प्राणी चिडचिडे होतात. आक्रमक प्राणी शांत होतात. फेफरे येऊन मृत्युमुखी पडतात. प्राण्यांमध्ये पक्षघाती टप्प्यामध्ये तोंडामधील लाळ वाढत जाते. श्‍वास मंद होतो. अखेरीस श्‍वसन क्रियेत बिघाड येऊन मृत्यू ओढावतो.
 • मनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला बाधित करतो. ज्यामुळे मेंदूचे विकार उद्भवतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, अशक्तपणा जाणवतो. चावलेल्या जखमेच्या जागी खाज सुटते, वेदना होतात. ही लक्षणे २ दिवसांपासून ते १ आठवड्यांपर्यंत दिसू शकतात. आजार वाढत जाईल तसा निद्रानाश, अर्धांगवायू, गिळण्याची अडचण, तोंडातील लाळेमध्ये वाढ, पाण्याची भीती दिसते. लक्षणे दिसायला लागल्यानंतर काही दिवसांत मृत्यू संभवतो. हा आजाराचा शेवटचा टप्पा ३ ते ७ आठवड्यांपर्यंत दिसतो. काही वेळा तो ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत वाढतो.

उपचार 

 • रेबीज संक्रमण झालेल्या प्राण्याने चावा घेतल्यानंतर १२ तासांच्या आत उपचार करावा. काही कारणास्तव ते शक्‍य न झाल्यास ४८ तासांच्या आत उपचार होणे गरजेचे असते.
 • रेबीज झालेल्या प्राण्याने चावल्यामुळे झालेली जखम साबण व पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. विषाणूविरोधी द्रव उपलब्ध असेल तर त्याने जखम स्वच्छ धुवून घ्यावी.
 • संक्रमण झाल्यानंतर रेबीज इम्युनोग्लोब्युलीन व रेबीज लसीची इंजेक्‍शन आवश्‍यक आहे. प्राण्याने चावलेल्या दिवशी पहिले इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर ३, ७, १४ आणि काही वेळी २८ व्या दिवशी इंजेक्‍शन दिले जाते.
 • लसीकरणामुळे शरीराची रोगप्रतिशक्ती वाढते. शरीरामधील विषाणू कमी होण्यास मदत होते. योग्य उपचार झाल्यास आजार नियंत्रणात येतो.

संपर्क - डॉ. मनोजकुमार आवारे, ९४२१००७७८५
( डॉ. वर्षा थोरात मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. मनोजकुमार आवारे हे बाएफ, उरूळीकांचन, जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)


इतर कृषिपूरक
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...
जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजारमराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा...
कोंबड्यांतील रोगप्रसार टाळाआजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी...
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गायहरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक...
जनावरांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्षपावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक...
शाश्‍वत दूध उत्पादनासाठी ‘टीएमआर'गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक...
जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण...साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे...
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वेदूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी...
संकरित गाईंची दूध उत्पादन वाढीची सूत्रेसद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या...
रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणामरेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वशेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या...
दुधाळ जनावरांसाठी सॉर्डेड सीमेन...अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स ...
जनावरे, गोठ्याची ठेवा स्वच्छतापावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका...
रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करामनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला...
जनावरांमध्ये होणारा शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
गवळाऊ संगोपनाचे पाऊल पडते पुढेविदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी...
जनावरांच्या आहारात मूरघासाचा वापरमूरघासामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता...