सिंचनापूर्वी तपासा पाणी

सिंचनासाठी जास्त प्रमाणात क्षारयुक्त पाणी वापरल्याने त्याचे दुष्परिणाम वनस्पतीच्या वाढीवर, जमिनीच्या गुणधर्मावर तसेच उत्पादन क्षमतेवर होतात. यासाठी पाणी तपासणी महत्त्वाची आहे. ------------------- डॉ. अतिश पाटील, डॉ. दिनेश नांद्रे, जगदीश काथेपुरी -------------------
Check the water quality in laboratory before irrigation
Check the water quality in laboratory before irrigation

सिंचनासाठी जास्त प्रमाणात क्षारयुक्त पाणी वापरल्याने त्याचे दुष्परिणाम वनस्पतीच्या वाढीवर, जमिनीच्या गुणधर्मावर तसेच उत्पादन क्षमतेवर होतात. यासाठी पाणी तपासणी महत्त्वाची आहे. सिंचनाच्या पाण्यात अनेक विद्राव्य क्षार आढळतात. पाणी ज्या भागातून वाहते तिथल्या खडकातून हे क्षार पाण्यात मिसळतात. या पाण्यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडियम, क्लोरीन, बायकार्बोनेट, तसेच बोरॉन आणि लिथियम इत्यादी क्षार कमी अधिक प्रमाणात आढळतात. या क्षारांचा पिकांवर आणि जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची प्रत प्रयोगशाळेतून तपासावी. सिंचनासाठी जास्त प्रमाणात क्षारयुक्त पाणी वापरल्याने त्याचे दुष्परिणाम वनस्पतीची वाढ, जमिनीचे गुणधर्म तसेच उत्पादन क्षमतेवर होतो. पाणी क्षारयुक्त होण्याची कारणे

  • नगदी पिकांसाठी पाण्याचा होणारा अतिरिक्त वापर.
  • सिंचन क्षेत्रात आढळणाऱ्या खडकाचा प्रकार.
  • चिकणमातीच्या जमिनीत निचऱ्याचा असलेला अभाव.
  • एकाच पिकाची सातत्याने लागवड.
  • रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर.
  • क्षारयुक्त विविध पाण्याचे स्रोत.
  • सिंचनाचे पाणी क्षारयुक्त होण्यामागे विविध पाण्यांचे स्रोतदेखील कारणीभूत असतात. उदा. पावसाच्या पाण्याची क्षारता ०.०१ ते ०.०५ डेसीसायमन प्रती मीटर, नदीचे पाणी ०.०५ ते ०.३० डेसीसायमन प्रती मीटर, विहिरीचे पाणी ०.५० ते १२.०० डेसीसायमन प्रती मीटर आणि कूपनलिकेच्या पाण्याची क्षारता ही ०.५० ते १२.०० डेसीसायमन प्रती मीटर एवढी असते. सिंचनासाठी जास्त क्षारतेच्या पाण्याचा वापर केल्यामुळे जमिनीची क्षारता आपोआप वाढते. सिंचनाच्या पाण्याची प्रत ठरविणाऱ्या प्रमाणकामध्ये प्रामुख्याने सामू, विद्राव्य क्षार किंवा क्षारता, सोडियम स्थिरीकरणाचे गुणोत्तर, रिसिड्युअल सोडियम कार्बोनेट, मॅग्नेशिअम कॅल्शिअम गुणांक, सल्फेट, कार्बोनेट, बायकार्बोनेट, बोरॉन, क्लोराईड, नायट्रेट आणि लिथियमचे प्रमाण इत्यादींचा समावेश असतो. विहिरीतील किंवा कूपनलिकेतील पाणी पिण्यास मचूळ लागत असल्यास, त्यात विद्राव्य क्षारांचे प्रमाण वाढलेले असते. पाण्याचे बाष्पीभवन होऊन विद्राव्य पांढरे क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर साठतात. या पांढऱ्या क्षारांचा एक पातळ थर जमिनीच्या पृष्ठभागावर तयार होतो. यालाच जमिनीला मीठ फुटले असे म्हणतात. तपासणीसाठी पाणी नमुना घेण्याची पद्धत

  • शेतकरी सिंचनासाठी नदी, ओढे, तलाव, विहीर, कूपनलिका इत्यादी पाण्याच्या स्रोतांचा वापर करीत असतो. नदी आणि ओढ्यातून पाण्याचे नमुना घेताना, काठापासून थोड्या आतमध्ये वाहत्या पाण्यातून नमुना घ्यावा.
  • विहीर आणि कूपनलिकेतील पाण्याचा नमुना घ्यायचा झाल्यास, प्रथम विद्युतपंप २० ते २५ मिनिटे चालू ठेवावा. जेणेकरून पंपामध्ये साचलेले पाणी निघून जाईल. पाण्यावर तरंगणारी घाण, काडीकचरा आणि शेवाळ बाजूला करावे. पाण्याचा नमुन्यामध्ये कोणतीही घाण न येऊ देण्यासाठी पाणी स्वच्छ कापडातून गाळून घ्यावे.
  • पाण्याचा नमुना घेण्यासाठी स्वच्छ बाटलीचा वापर करावा. प्रथम बाटली त्याच पाण्याने ३ ते ४ वेळा धुवून घ्यावी.
  • प्रयोगशाळेत तपासणीसाठी एक लिटर पाणी पुरेसे होते. पाणी नमुना बाटलीवर शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, पाण्याचा स्रोत, नमुना घेतल्याची तारीख इत्यादी माहिती लिहिणे आवश्‍यक आहे. पाण्याचा नमुना घेतल्यापासून ४८ तासांच्या आत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा.
  • सिंचनासाठी योग्य प्रतीच्या पाण्यामध्ये प्रामुख्याने सामू (६.५ ते ७.५), क्षारता (०.२५ डेसीसायमन/मी पेक्षा कमी), बायकार्बोनेट (१.५ मी.ई/लिटर पेक्षा कमी), क्लोराइड (४.० मी.ई/लिटर पेक्षा कमी), सल्फेट (२.० मी.ई/लि पेक्षा कमी), रिसिड्युअल सोडियम कार्बोनेट (१.२५ मी.ई/लि पेक्षा कमी), सोडियम शोषण गुणांक (१० पेक्षा कमी), मॅग्नेशिअम कॅल्शिअम गुणांक (१.५ पेक्षा कमी) आणि बोरॉन (१.० पीपीम पेक्षा कमी) इत्यादी प्रमाणकांचा समावेश असतो. जमिनी क्षारयुक्त होऊ नये यासाठी उपाययोजना

  • जमिनीमध्ये सेंद्रिय आणि हिरवळीच्या खतांचा वापर वाढवावा.
  • शेतात पाणी साठून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.
  • अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराला अनुसरून योग्य अंतरावर चर काढावेत.
  • जमिनीमध्ये नेहमी पाण्याची पातळी २ मीटरच्या खाली ठेवावी. जेणेकरून क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर येणार नाहीत.
  • नगदी पिकांना योग्य प्रमाणात पाणी द्यावे.
  • जास्त क्षार असलेल्या पाण्याचा सिंचनासाठी नियमित वापर करू नये.
  • आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करावा.
  • क्षार संवेदनशीलतेवर पिकांची निवड करावी.
  • क्षार संवेदनशील मध्यम संवेदनशील जास्त संवेदनशील
    तूर, मूग, हरभरा, चवळी, आंबा, लिंबूवर्गीय फळझाडे इ मका, गहू, सोयाबीन, कांदा, टोमॅटो, चिकू, पेरू, द्राक्षे इ भात, ऊस, कापूस, पालक, शुगरबीट, नारळ, आवळा,इ.

    संपर्क- डॉ. दिनेश नांद्रे, ८२०८१७१११९ (कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, धुळे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com