उगवण क्षमता तपासून  घरातील सोयाबीन बियाणे पेरा 

खरीप हंगामामध्ये सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी स्वतः:कडे उपलब्ध असलेल्या चांगल्या बियाणांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
उगवण क्षमता तपासून  घरातील सोयाबीन बियाणे पेरा  Checking the germination capacity Sow soybean seeds at home
उगवण क्षमता तपासून  घरातील सोयाबीन बियाणे पेरा  Checking the germination capacity Sow soybean seeds at home

कोल्हापूर : खरीप हंगामामध्ये सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी स्वतः:कडे उपलब्ध असलेल्या चांगल्या बियाणांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे. 

वाकुरे म्हणाले, ‘‘सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षांपर्यंत वापरात येते. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासून उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालू वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरू शकतात. तसेच ग्रामबिजोत्पादन, पीक प्रात्याक्षिके योजनांतर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते. 

प्रमाणित बियाण्यांपासून वरीलप्रमाणे आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असून, त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्याची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवताना त्याची थप्पी ७ फुटांपेक्षा जास्त उंच असणार नाही, याची काळजी घ्‍यावी. बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

प्रति हेक्टरी बियाणे दर ७५ किलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. ७५ ते १०० मी. मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.

रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com