राज्यात 'रसायन-कीडमुक्त क्लस्टर’ निश्‍चित होणार

इंटरनॅशनल स्टॅंडर्ड फॉर फायटोसॅनेटरी मेजर ४ आणि ६ च्या निकषांनुसार जगभरातून आता किडमुक्त शेतमाल क्षेत्राच्या प्रमाणपत्राच्या मागणीची अट घालण्यात येत आहे. भविष्याचा विचार करुन शेतमालाच्या निर्यातवाढीसाठी किडमुक्त शेतमाल उत्पादनाची क्षेत्रे निश्‍चित करणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे कृती आराखड्याचे काम सुरु असून, यामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन, या क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यानंतर हा अहवाल केंद्राला पाठविण्यात येईल. त्यानंतर केंद्र सरकार किडमुक्त शेतमाल उत्पादनाची क्षेत्रे जाहिर करणार आहे. यासाठी राज्यात २१ क्लस्टर प्रस्तावित करण्यात आली आहे. - गोविंद हांडे, राज्यस्तरीय सल्लागार (निर्यात),राष्ट्रीय फलोत्पादन अभियान,कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य
vegetables
vegetables

पुणे : भारतीय शेतमालाची जगभरातून मागणी होत असताना, आयातदार देशांकडून संबधित शेतकऱ्यांचे केवळ पीकच नाही; तर त्या परिसरातील भौगौलिक क्षेत्रच रसायन आणि कीडमुक्त घोषित आणि प्रमाणित करण्याची मागणी होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात फळे भाजीपाल्यांची २१ क्लस्टर उभारण्यात येत असून, यामध्ये केंद्र सरकारचे ६; तर राज्य पणन मंडळाचे १५ अशा एकूण २१ क्लस्टरच्या प्रस्तावांची शिफारस राज्य सरकारने केंद्राला केली आहे.  केंद्र सरकार देशाच्या शेतमालाचे निर्यात धोरण आखत असून, विविध राज्यांचेदेखील स्वतंत्र निर्यात धोरण आखण्यात यावे, असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. महाराष्ट्राचे निर्यात धोरण राज्य पणन मंडळाद्वारे केले जात असून, यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरू आहे.   याबाबत पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार म्हणाले, ‘‘देशातून आणि महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या शेतमालाबाबत विविध देश शेतमाल असणाऱ्या शेतकऱ्यांकडून शेतमालाच्या प्रमाणिकरणासाठी विविध प्रमाणपत्रे बंधनकारक करण्यात आली आहेत. ही प्रमाणपत्रे केवळ त्या शेतीच्या काही एकरापुरतीच असतात. मात्र आता आयातदार देशांकडून संबंधित पिकासाठीची भौगोलिक क्षेत्रेच रसायन आणि कीडमुक्त असावीत अशा प्रमाणपत्रांची मागणी होऊ लागली आहे.’’  भविष्यात आयातदार देशांकडून फळे भाजीपाल्याची वाढणारी मागणी आणि त्यातुलनेत कमी उत्पादन ठरू नये यासाठी केंद्र सरकारनेदेखील शेतमालनिहाय क्लस्टर निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने ६ क्लस्टर प्रस्तावित केले असून, राज्याने त्यामध्ये भर घालत महाराष्ट्रातील कृषी हवामान क्षेत्रनिहाय विविध पिकांसाठी १५ आणखी क्लस्टरची मागणी केली आहे. यामध्ये संत्रा, सीताफळ, कांदा, मिरची आदी पिकांचे क्लस्टर प्रस्तावित केले आहे. यासाठीची नियमावली अमेरिकेच्या अन्न व कृषी संघटना आणि इंटरनॅशनल प्लांट प्रोटेक्शेन कन्व्हेनशनच्या वतीने पाठविण्यात आली आहे. यांच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे राज्यात रसायनमुक्त आणि निर्यातक्षम फळे भाजीपाला उत्पादन क्लस्टर प्रस्तावित करण्यात आली आहेत, असेही पवार यांनी स्पष्ट केले. अशी असतील पीकनिहाय क्लस्टर 

  • केळी ः जळगाव, धुळे नंदुरबार- सबक्लस्टर- कोल्हापूर, सोलापूर, पुणे, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलडाणा, वर्धा 
  • डाळिंब ः नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, सबक्लस्टर- वाशीम,  बुलडाणा 
  • हापूस आंबा ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड 
  • केसर आंबा ः औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नगर, नाशिक
  • संत्रा ः नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला, बुलडाणा, वाशीम.
  • द्राक्ष ः  नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद 
  • कांदा ः धुळे, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सोलापूर
  • काजू ः कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर 
  • फुले ः पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक
  • बेदाणा ः सांगली, नाशिक
  • भाजीपाला ः जळगाव, नाशिक, पुणे, नगर, ठाणे, पालघर, नागपूर 
  • बिगर बासमती तांदूळ ः नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, पालघर ठाणे, रायगड, पुणे 
  • डाळी ः धुळे, जळगाव, नगर, पुणे. सबक्लस्टर- औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर 
  • कडधान्ये ः जळगाव, नाशिक, औरंगाबाद, बीड, नगर, पुणे, सातारा, सांगली सोलापूर, गोंदिया नागपूर 
  • तेलबिया ः बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, सबक्लस्टर- नाशिक, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना, बीड, लातूर नांदेड, परभणी, हिंगोली. 
  • गूळ ः कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर 
  • मसाले (लाल मिरची) ः नागपूर, बुलढाणा, नंदुरबार 
  • मसाले (हळद) ः सांगली, सातारा, वर्धा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी 
  • दुग्धजन्य पदार्थ ः पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर 
  • मत्स्य ः ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 
  • मांसजन्य ः जळगाव, नगर, नाशिक, पुणे, सोलापूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, नागपूर, नांदेड, औरंगाबाद 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com