दिलासा नाहीच; चिदंबरम तिहारमध्ये
दिलासा नाहीच; चिदंबरम तिहारमध्ये

दिलासा नाहीच; चिदंबरम तिहारमध्ये

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याभोवतीचा कारवाईचा फास आवळत चालला असून गुरुवार(ता. ५)चा दिवसही त्यांच्यासाठी ‘कोर्ट डे’ ठरला. आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले असून, सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ राऊज अव्हेन्यू कोर्टानेही त्यांना दणका देत १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाच्या या आदेशानंतर चिदंबरम यांची रवानगी थेट तिहार कारागृहामध्ये करण्यात आली आहे. चिदंबरम यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे ही बाब लक्षात घेता त्यांना वेगळ्या कारागृहात ठेवले जावे तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य काळजी घेतली जावी असे निर्देशही विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिले आहेत. दरम्यान आयएनएक्‍स मिडिया गैरव्यवहारप्रकरणी चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्यावर खटला भरला आहे. एअरसेल मॅक्‍सिस प्रकरणामध्ये मात्र चिदंबरम आणि त्यांचे पूत्र कार्ती यांना दिल्लीतील न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आयएनएक्‍स मिडिया गैरव्यवहार प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आज चिदंबरम यांची याचिका फेटाळून लावली असून यामध्ये त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. या न्यायालयानेही चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन मंजूर करणे टाळले होते. आर्थिक गुन्ह्यांचा परिणाम हा थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असल्याने हे खटले वेगळ्या पद्धतीने हाताळणे गरजेचे असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. या खटल्यामध्ये चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन मंजूर करणे योग्य होणार नाही कारण यामुळे एकूणच चौकशी प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो असे निरीक्षण न्या. आर. बानुमती आणि न्या. ए.एस बोपन्ना यांनी नोंदविले. पुरावे आहेत आयएनएक्‍स मीडिया खटल्यामध्ये अधिक चौकशी करण्याएवढे सक्षम पुरावे तपास संस्थेकडे आहेत, असे न्यायालयाने नमूद केले तसेच मागे तीन वेळा चिदंबरम यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती या संदर्भातील प्रश्‍नावली न्यायालयामध्ये सादर करण्याचे निर्देश तपासंस्थेला दिले जावेत, अशी मागणी चिदंबरम यांच्याकडून करण्यात आली होती. पण तीदेखील न्यायालयाने फेटाळून लावली. सहकार्य करावे लागणार :   एअरसेल मॅक्‍सिसप्रकरणामध्ये मात्र दिल्लीतील न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ओ.पी.सैनी यांनी चिदंबरम पिता पुत्रांना दिलासा देत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणामध्ये चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करावे असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. चिदंबरम यांना एक लाख रूपयांचा जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेच्या हमीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com