जनताच मुख्यमंत्री ठरविते ः देवेंद्र फडणवीस

जनताच मुख्यमंत्री ठरविते ः देवेंद्र फडणवीस
जनताच मुख्यमंत्री ठरविते ः देवेंद्र फडणवीस

मुंबई : मी एकट्या भाजपचा नव्हे, तर शिवसेना, रिपाइं आणि रासपचाही मुख्यमंत्री असून, पुन्हा मीच येणार आहे, असे सांगत कोणी काही बोलले, म्हणून मुख्यमंत्रिपद ठरत नसते. जनताच मुख्यमंत्री ठरविते. काही लोकांना बोलायची खुमखुमी असते. आपल्या मित्रपक्षाकडे खुमखुमी असणारे थोडे जास्तच आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या नेत्यांना ठणकावले.

गोरेगाव येथे रविवारी (ता. २१) भाजपच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक झाली. बैठकीचा समारोप फडणवीस यांच्या भाषणाने झाला. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेश प्रभारी सरोज पांडे, राष्ट्रीय सचिव व्ही. सतीश, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासह खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात समसमान जागावाटपाची चर्चा झाली. मुख्यमंत्रिपदाची कारकीर्दही वाटून घेतली जाणार, हे मी स्वत: ऐकले आहे. मुख्यमंत्री फडणवीसही त्या वेळी उपस्थित होते, असे विधान युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नुकतेच केले आहे. शिवाय, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही याचीच री ओढत शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे.

या संदर्भात फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, विधानसभेची निवडणूक युती म्हणूनच लढली जाणार आहे. याबाबत कोणताही संभ्रम बाळगू नका. २२० जागा जिंकणे हे महायुतीचे लक्ष्य आहे. कोणाला किती जागा मिळणार, याचाही निर्णय लवकरच होईल. मात्र, मुख्यमंत्रिपद वगैरे चर्चेत पडू नका. कोणी काही बोलले म्हणून मुख्यमंत्रिपद ठरत नसते. काही लोकांना बोलायची खुमखुमीच असते आणि आपल्या मित्रपक्षाकडे खुमखुमी असणारे थोडे जास्तच आहेत. आपल्याकडेही काही आहेत. याबाबत बोलायची आवश्यकता नाही. पुन्हा मीच मुख्यमंत्री होणार, हे यापूर्वीच मी सांगितले आहे. त्यामुळे कोण, कधी, कसा, अशा चिंता करत बसू नका, सगळे व्यवस्थित होणार, असा विश्वासही फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

गडकरी, मुंडे यांच्या गैरहजेरीची चर्चा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे गैरहजर होत्या, तर वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार उशिरा पोचले. यावरून उलट-सुलट चर्चा होताच, चंद्रकांत पाटील यांना खुलासा करावा लागला. ते म्हणाले, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे गडकरी उपस्थित राहू शकले नाहीत, तर पंकजा मुंडे अमेरिकेत आहेत. आजारी असल्याने मुनगंटीवारांना विलंब झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com