कमी बोलून जास्त काम करायचे आम्ही ठरविले आहे : उद्धव ठाकरे

uddhav thakarey
uddhav thakarey

नागपूर ः राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आमच्या सरकारची मार्गदर्शिका असून, कमी बोलून जास्त काम करायचे आम्ही ठरविले आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील ‘संताचा तो प्रचार अमर, अजूनही लोक-मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरितो’ या ओव्यांनी सरकारची पुढील वाटचाल स्पष्ट केली. तसेच, आम्ही शब्द पाळणारे आहोत. शेतकऱ्यांचा कळवळा सर्वांनाच आहे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री गुरुवारी (ता. १९) बोलत होते. आमदार सुनील प्रभू यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचा अभिनंदनपर ठराव मांडला होता. त्यावर ५१ सदस्यांनी आपली मते मांडली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, संत गाडगेबाबांनी साध्या भाषेत जीवनाचे सार सांगितले आहे. त्याप्रमाणे भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे, वस्त्र देणे, निवारा देणे, खचलेल्यांना जगण्याची हिंमत देणे अशा पद्धतीचे काम सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही कामांना स्थगिती दिली नसून, विकासकामांच्या आदेशांमधील त्रुटी दूर करून कामे सुरू केली जातील. देशातील वैभवशाली आणि संपन्न राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा गोवर्धन पेलण्याकरिता सगळ्यांनीच एकत्र आले पाहिजे, असे आवाहन करतानाच हे सरकार राज्यातील जनतेला चिंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. महाराष्ट्र कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. नवा महाराष्ट्र घडवतानाच आपले राज्य अधिक महान होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोरगरिबांना बुलेट ट्रेन परवडणारी नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांत आम्ही सुधारणा करण्यावर भर देणार आहोत. शेतकरी, महिला यांच्या समस्या आमच्या दृष्टीने प्राधान्याच्या राहतील. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करणार आहोत. त्याचप्रमाणे राज्याची खरी आर्थिक स्थितीदेखील जनतेसमोर आणणार आहोत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात संत गाडगेबाबा यांच्या वचनांचा उल्लेख केला. गाडगेबाबांना अभिप्रेत असलेल्या धर्माच्या संकल्पनेनुसार राज्यकारभाराची दिशा ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. भाषणात मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत विरोधी पक्षनेत्यांचा समाचार घेतला. हे तीन पक्षांचे सरकार असून, ते किमान समान कार्यक्रमावर पूर्ण पाच वर्षे टिकणार, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. तो कार्यक्रमच राज्यपालांच्या अभिभाषणातून दिसत असून, त्या आधारे हे सरकार काम करील. आम्ही कमी बोलायचे व अधिक काम करून दाखवायचे, असे ठरविले आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अति बोलण्याच्या सवयीवर टीका केली.  मी बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कोणत्याही टोकाला गेलो व शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला, हे सांगतानाच ठाकरे असेही म्हणाले की, कायम भाजपची पालखी वाहणार नाही, असाही शब्द मी बाळासाहेबांना दिला होता. त्याचीही पूर्तता मी केली आहे. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे़’ या ‘सामना’ सिनेमातील गाण्याची आठवण करून देत इतकी वर्षे वाहिलेले तुमचे ओझे आता आम्ही फेकून दिले आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपाला सुनावले. आपल्या भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. नागरिकत्व कायदा आणि त्यावरून देशभर उसळलेल्या आगडोंबाचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले की, शेजारी देशातल्या हिंदूंना सामावून घेण्याची भाषा बोलणाऱ्या केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत कायम कर्नाटकची बाजू घेतली आहे आणि त्या वेळी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राच्या सीमाभागातल्या हिंदूंचा आक्रोश मात्र त्यांना दिसलेला नाही. एकीकडे सावरकरांच्या प्रेमाची भाषा करतात; पण गायीबद्दलची सावरकरांची भूमिका मान्य आहे काय, हेही स्पष्ट करायला हवे. ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात गोमाता म्हणता आणि शेजारी राज्यात जाऊन खाता, अशी टीकाही त्यांनी केली.  मोदींचा फोटो लावून शिवसेनेला मते मिळाली, असे म्हणणाऱ्या अमित शहांनी सेनाप्रमुखांचा फोटो लावून भाजपला मते मिळाली नाहीत, हेही सांगावे, असा प्रतिटोलाही ठाकरे यांनी हाणला. संत तुडोजी महाराजांच्या शब्दात आपले भाषण संपवताना ठाकरे यांनी ‘लाखो जीवांना उद्धारितो,’ हा शब्द आपण पाळू आणि राज्याचे कल्याण करू, असा शब्द दिला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली नाही, असा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू झाली आहे.  अच्छे दिन येईचि ना! त्याआधी बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्रिशंकू सरकार, अशी टीका करीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भारुडाचा उल्लेख केला होता. या त्रिशंकू सरकारचे तीन पाय तीन दिशांना हे सांगताना भारुडातील यमक ‘दिसेचि ना, शिजेचि ना, होईचि ना, भाजेचि ना...’ याचा वापर केला होता. नेमकी तीच लय पकडत ठाकरे यांनी ‘अच्छे दिन आता येईचि ना’, ‘१५ लाख रुपये खात्यात जमा होईचि ना’, ‘२ कोटी लोकांना रोजगार मिळेचि ना’, ‘नोटबंदीनंतरचे ५० दिवस संपेचि ना’, ‘आर्थिक मंदी हटेचि ना’ असे प्रत्युत्तर दिले. या वेळी सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांनी बाके वाजवून त्यांना दाद दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com