कर्जमाफीचा शब्द पाळू ः मुख्यमंत्री

chief minister
chief minister

इस्लामपूर, जि. सांगली ः कर्जमाफीचा आम्ही दिलेला शब्द खरा करू. दोन लाखांपर्यंत माफी आहेच; परंतु नियमित कर्जदारांसह दोन लाखांच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देऊ. जे जास्त अडचणीत आहेत अगोदर त्यांना दिलासा देऊन मग इतर शेतकऱ्यांबाबत निर्णय घेऊ. ही फक्त घोषणा नाही, आमचा शब्द आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. १७) इस्लामपूर (ता. वाळवा) येथे दिली.  इस्लामपूर येथील १४ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या नूतन तहसील कार्यालयाच्या इमारत उद्‌घाटन सोहळ्यात ते बोलत होते. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, परिवहन व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील, अनिल बाबर, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आनंदराव पवार प्रमुख उपस्थित होते. राजारामबापूंची दुर्मीळ छायाचित्रे असलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.  मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘शेतकरी मर मर मरतो, कष्ट करतो; पण तरीही त्याला दाम मिळत नसेल, तर त्याने काय करावे? महापुराच्या सुनामीत आभाळ फाटले, घरे वाहून गेली. प्रचंड नुकसान झाले. सरकार तेव्हाही होते आणि आताही आहे. सरकारची पालकत्वाची भूमिका असते. केंद्र सरकार मात्र पालकत्वाची भूमिका पाळताना दिसत नाही. जनतेसाठी आम्ही मदत मागत असताना केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुजाभाव करीत आहे. पूरक म्हणून पशुधन जगवणे महत्त्वाचे आहे. पशुधन शेतकऱ्याचे कुटुंब आहे. ते टिकवण्यासाठी महाराष्ट्रात आम्ही फिरते पशुचिकित्सालय सुरू करू.’’ जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘‘राज्यातील उद्योजकांना एकत्र करून काहीही झाले तरी गुंतवणूक महाराष्ट्रातच करा, आम्ही सगळी ताकद देऊ असा दिलासा दिला आहे. राज्यातील बेकारीच्या गंभीर प्रश्‍नावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, राजारामबापू बॅंकेचे अध्यक्ष प्रा. श्‍यामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सभापती शुभांगी पाटील, कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, संग्राम पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी स्वागत केले. प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी आभार मानले. कडकनाथप्रकरणी निवेदन कडकनाथ घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आज कडकनाथ कोंबडीपालक संघर्ष समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. दिग्विजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते, तर उमेश कुरळपकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन देत मराठा आरक्षण कायद्यात अडसर ठरतील, अशा त्रुटी दूर करून त्याची कायदेशीर बाजू मांडावी व प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com