दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकार तयार ः मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आणि पुढील एक दीड महिन्यातील संभाव्य टंचाईचा सर्वंकष आढावा घेऊन दुष्काळ निवारणासाठी ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, चारा छावण्यांसोबतच शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीचे किती वाटप झाले आहे, याचा आढावा घेण्यात आला. तसेच सर्व पालकमंत्र्यांना दुष्काळी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्यावा, आचारसंहितेची अडचण नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २) सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते.    यासंदर्भात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, की मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यात आला. १२,११६ गावांमधे ४,७७४ टॅंकर्स देण्यात आले आहेत. १,२६४ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. यात ७ लाख ४४ हजार मोठी जनावरे आणि जवळपास १ लाख लहान जनावरे म्हणजे सुमारे साडेआठ लाख जनावरे आहेत. मोठ्या जनावरांना ९० आणि लहान जनावरांना ४५ रुपये अनुदान देण्यात आले आहे. छावण्यांमधील जनावरांसाठी एनडीआरएफने ठरवून दिलेल्या दरापेक्षाही अधिकचा दर दिला जात आहे. ५८ हजार हेक्टर जमिनीवर चाऱ्याची उपलब्धता आहे.  ‘‘सध्या मराठवाड्यात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याचे टॅंकर्स आहेत. पाण्यासाठी सध्या जायकवाडी धरणातील मृतसाठा वापरला जात आहे. जायकवाडी धरणाचा मृतसाठा मोठा आहे, त्यामुळे ते पाणी आता वापरता येईल अशी परिस्थिती आहे. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आचारसंहितेची कोणतीही अडचण नाही. सर्व पालकमंत्र्यांना निर्देश दिले आहेत, की त्यांनी आपपल्या जिल्ह्यांचा आढावा घ्यावा. चारा छावण्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्याचाही आढावा घ्यावा, पाण्याच्या टॅंकर्सना जीपीएस लावण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांनी त्याचीही पडताळणी करावी. २०११ चा लोकसंख्येचा निकष न लावता २०१८ च्या लोकसंख्येनुसार दहा ते वीस टक्के जास्त लोकसंख्या पकडून पाण्याचे टॅंकर्स पुरवण्यात यावेत, आवश्यक तेथे टँकर्स वाढवण्यात यावेत असेही आदेश देण्यात आले आहेत,’’ असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की राज्यात २ लाख ७२ हजार मजूर मनरेगावर काम करीत आहेत. ९१ टक्के मजुरी वेळेत दिली जात आहे. स्थलांतरण रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहोत, शासनाने तशा सूचना दिल्या आहेत. अतिरिक्त अन्नधान्य आणि शालेय पोषण आहार दिला जात आहे. राज्यातील दुष्काळाचा संपूर्ण आढावा घेऊन पुढील एक-सव्वा महिना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यंदा अल निनोमुळे पाऊस थोडासा उशिरा येईल ही शक्यता शासनाची चिंता वाढवणारी आहे. पूर्व किनारपट्टीवर येणाऱ्या चक्रीवादळामुळे तापमान कमी होईल आणि पाण्याची समस्या थोडी कमी होईल अशी अपेक्षा आहे. ‘‘मधल्या काळात उष्णतेच्या लाटेमध्ये टँकर्स वाढले होते, दुष्काळ निवारणासाठी अधिकची जी कामे करावी लागतात त्यासाठी भारत निवडणूक आयोगाची परवानगी मागितली आहे. आयोगाला सांगितले आहे, की राज्यातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले आहे, त्यामुळे शासनाला दैनंदिन काम करू देऊ नका, पण दुष्काळ निवारणासाठी काही अधिकची कामे करावी लागतील, टेंडर्स काढावी लागतील त्यासाठी शासनाला परवानगी द्यावी अशी विनंती आयोगाकडे केली आहे. येत्या एक ते दोन दिवसांत आयोगाची परवानगी मिळेल. पण तोपर्यंत आम्ही दुष्काळ आढाव्याचे काम सुरू करीत आहोत, त्यासाठी आयोगाच्या परवानगी गरज भासत नाही,’’ असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. दुष्काळी मदत ६८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत ८२ लाख शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी मदत जमा केली आहे. एकूण ४,४१२ कोटी रुपये त्यातून देण्यात आले आहेत. पीकविम्याचे ३,२०० कोटी रुपये विम्याचे देण्यात येणार आहेत, त्यातले १,१०० कोटी आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत. पीकविम्याचे उर्वरित पैसेही गतीने दिले जाणार आहेत, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची छाननी पूर्ण झालेली नाही, ती झाली की शिल्लक रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, जिल्हाधिकाऱ्यांकडे विम्याचे सगळे पैसे वितरीत करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले...

  •   १२,११६ गावांमध्ये ४,७७४ टॅंकर्स देण्यात आले 
  •   १,२६४ चारा छावण्यांमध्ये लहान, मोठी सुमारे साडेआठ लाख जनावरे
  •   मोठ्या जनावरांना ९० आणि लहान जनावरांना ४५ रुपये अनुदान 
  •   ५८ हजार हेक्टर जमिनीवर चाऱ्याची उपलब्धता
  •   टॅंकर्स देताना २०१८ च्या लोकसंख्येनुसार दहा ते वीस टक्के जास्त संख्या पकडावी
  •   मनरेगावर कामांवर २ लाख ७२ हजार मजूर 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com