समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळविणार ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई  : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्यातून पूर्व आणि पश्चिम विदर्भाला देऊन मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवारी (ता. १५) मंत्रालयातील ध्वजवंदन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.  ते म्हणाले, की राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून राज्याला जल परिपूर्ण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षांत केला. गेल्या तीन ते चार वर्षांत कमी पावसामुळे महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळाचे संकट कायम राहिले. त्यावर मात करण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल. तसेच वैनगंगा नदीचे तेलंगणात जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा योजनेत ४८० किमीचा बोगदा तयार करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील सर्व अपूर्ण सिंचन प्रकल्प केंद्र सरकारच्या निधीतून गतिमानतेने पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाने गेल्या पाच वर्षांत शेती क्षेत्रात सुमारे १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.    `सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी` राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीतून सावरण्यासाठी तिन्ही सैन्य दले, एनडीआरएफ, एसडीआरएफ, तटरक्षक दल आदींनी प्रचंड मेहनत घेतली. पूरग्रस्त नागरिकांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी राज्य शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. पुनर्वसनासाठी ६८०० कोटींचे पॅकेज तयार केले असून, विक्रमी वेळेत पुनर्वसन केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com