‘मान्सून फर्टिलायझर्स’ला मुख्य गुणवत्ता नियंत्रकांचीच शिफारस

‘मान्सून फर्टिलायझर्स’ला मुख्य गुणवत्ता नियंत्रकांचीच शिफारस

पुणे : ‘मान्सून फर्टिलायझर्स’ला परवाना देण्याची शिफारस कृषी विभागाच्या दक्षता पथकाचे प्रमुख व राज्याचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी केशवराव मुळे यांनीच केल्याचे आता उघड झाले आहे. या गंभीर प्रकरणाची माहिती कृषी सचिव व आयुक्तांना देण्याऐवजी मुळे यांनी स्वतःच ‘मान्सून’ प्रस्तावावर स्वाक्षऱ्या ठोकून गैरकारभाराला चालना दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली. ''मान्सून फर्टिलायझर्स'' नावाने २० हजार टनी बोगस रासायनिक खताचा कारखाना आस्तित्वात असल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर कृषी आयुक्तालयात वादळ तयार झाले आहे. या कथित कंपनीला परवाना देण्यात इंगळे व कोलते यांच्यापेक्षाही गंभीर चूक मुळे यांनी केली आहे. २९ जानेवारी २०१९ रोजी मुळे यांच्याकडेच ‘मान्सून’ कंपनीने अर्ज केला होता. मात्र, बोगस कागदपत्रे सादर केल्याबद्दल मुळे यांनी आक्षेप घेतला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्याचे मुख्य सांख्यिकी आणि तत्कालीन गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उदय देशमुख यांचे व मुळे यांची कार्यालये शेजारीच आहेत. देशमुख यांनी विरोध केलेला असतानाही मुळे यांनी त्यांचा सल्ला घेतला नाही. मान्सून कंपनी एकीकडे मंत्रालयात जळगावची कागदपत्रे सादर करते आणि दुसरीकडे कृषी आयुक्तालयात पुण्याचा पत्ता सादर करते, यावरून मुळे हे कोणाच्या दबावाखाली ही भूमिका घेत होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  खत विभागाचे प्रमुख उपसंचालक कोलते हे मुख्यतः मुळे यांच्याच अखत्यारित काम करतात. मुळे व कोलते हे दोघेही इंगळे यांना ''रिपोर्ट'' करतात. कोलते यांना निरीक्षकांचे अधिकार नसताना ते जळगावला जावून मान्सूनचा खोटा अहवाल घेऊन आले. त्याला आक्षेप घेण्याऐवजी मुळेंनी मान्यतेच्या प्रस्तावावर सही केलीच कशी, असा प्रश्न उद्भवतो. कोलतेंनी अहवाल प्रथमतः मुळे यांना दाखविला होता व सदर फाइल स्वतः मुळे यांनीच गुणनियंत्रण संचालकांकडे मान्यतेसाठी नेली. बिंग फुटल्यानंतर मात्र मुळेंची धावपळ झाली, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. ‘मान्सूनच्या प्रकरणात इंगळे किंवा कोलते यांची भूमिका चुकीची आहेच. मात्र, मुळे आपली जबाबदारी ढकलत आहेत. गुणनियंत्रण कामकाजात ते केवळ राज्याचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी नसून राज्याच्या दक्षता पथकाचे प्रमुख या नात्याने देखील ते काम करीत आहेत. कृषी खात्याचा भ्रष्टाचार शोधून काढण्याची जबाबदारी दक्षता पथकाकडे दिली गेली आहे. या पथकाचे प्रमुख या नात्याने मुळे यांनी ‘मान्सून’चा पर्दाफाश करण्याऐवजी स्वतःची सही ठोकून परवान्याचा मार्ग मोकळा केला,’ असेही सूत्रांचे म्हणणे आहे. इंगळे यांनी रासायनिक कारखान्याचा परवाना मुळे यांच्याच शिफारशीवरून दिला आहे. २६ मार्च २०१९ रोजी जळगावला गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी मान्सूनवर धाड टाकली. तेथे कंपनी नसून पत्र्याचे शेड असल्याचे उघड झाल्यावर ही बाब मुळे यांच्या निदर्शनास लेखी आणून देण्यात आली होती. त्यानंतर दक्षता विभागाचे प्रमुख व मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी या नात्याने मुळेंनी ही गंभीर बाब तातडीने राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना लेखी कळविण्याची आवश्यकता होती. मात्र, मुळे यांनी ३ एप्रिलपर्यंत कागदपत्रे दाबून ठेवली, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com