मोहाडीची मिरची निघाली दुबईला

chili export
chili export

भंडारा ः शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकारातून प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पूर्व विदर्भातून मिरचीचा पहिला कंटेनर दुबईकडे रवाना करण्यात आला. २ फेब्रुवारीला पूर्व विदर्भातील दुर्गम आणि मागास समजल्या जाणाऱ्या भागातील मिरची थेट दुबईच्या बाजारात उपलब्ध होणार आहे. निर्यातक्षम माल असला तरी माहितीच्या अभावामुळे विदर्भातून निर्यात होत नव्हती. संत्रा निर्यातही शासकीय अनुदानातूनच यापूर्वी कशीबशी झाली. परंतु, शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून थेट दुबईला मिरची निर्यातीचा हा पहिलाच प्रयत्न म्हणावा लागेल.  मित्राय फार्मस प्रोड्युसर कंपनी, नागपूरचे डॉ. रुपण बांते, श्रीकांत शिरस्कार, प्रफुल्ल बांडबुचे, प्रतीक खैरनार, युनिटी असोसिएट पुणेचे मयुर मस्के,  अधिक धोपटे यांनी त्यासाठी पुढाकार घेत निर्यातीचा हा प्रयोग यशस्वी केला. सहा शेतकऱ्यांची मिळून १३ टन मिरची बाजारदरापेक्षा दोन रुपये जादा देत खरेदी करण्यात आली. मोहाडी येथील पणन मंडळाच्या आधुनिक भाजीपाला निर्यात सुविधा केंद्राचा पॅकिंग व साठवणुकीकामी वापर करण्यात आला. तीन दिवस ही प्रक्रिया पार पडल्यानंतर गणराज्य दिनाच्या मुहूर्ताला मिरचीचा पहिला कंटेनर मोहाडीवरुन थेट दुबईकडे रवाना करण्यात आला.  मिरची १०४१, राशी प्राईड २ असे दोन वाण मिरचीचे आहेत. २ फेब्रुवारीला दुबईतील पोर्टला पोचल्यानंतर क्‍लिअरिंग व इतर सारी प्रक्रिया पूर्ण होऊन तीन फेब्रुवारीला दुबईच्या बाजारात मोहाडीची मिरची विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कृषी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी दुबईला जाणाऱ्या मिरचीच्या कंटेनरला हिरवी झेंडी दाखविली. या वेळी आमदार आशिष जयस्वाल, आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, बाजार समितीचे संचालक व शेतकरी उपस्थित होते.  शेतकऱ्यांचा पहिलाच प्रयत्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून मिरची निर्यातीचा हा पहिलावहिलाच प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास येत्या काळात भाजीपाला निर्यातीला पूर्व विदर्भातून चालना मिळेल, असा आशावाद व्यक्‍त केला जात आहे. मित्राय कंपनीचे संचालक प्रफुल्ल बांडबुचे यांचे त्यामागील प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com