चीनने कापसासाठी भारताचे ठोठावले दार

यंदा देशात कापूस उत्पादन ३६० लाख गाठी येईल. आता कापसाचा दर्जा चांगला दिसत आहे. चीनमध्ये कापूस उत्पादन घटणार आहे. त्यांचे अमेरिकेशी संबंध चांगले नसल्याने ते भारताकडे कापसासाठी येऊ लागले आहेत. यामुळे बाजार स्थिर आहे. - अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
cotton
cotton

जळगाव : कापूस उत्पादनात मागील हंगामात जगात आघाडीवर राहिलेल्या चीनचे उत्पादन यंदा सुमारे ६० ते ७० लाख गाठींनी (एक गाठ १७० किलो रुई) घटणार आहे. चीनचे आपला प्रमुख कापूस पुरवठादार असलेल्या अमेरिकेशी व्यापार युद्धामुळे संबंध ताणलेलेच असल्याने तेथून होणारी कापूस आयात महाग पडत आहे. यामुळे चीन आपली कापसाची गरज पूर्ण करण्यासाठी भारताकडे आल्याची माहिती आहे.  चीन जगात कापूस उत्पादनात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहतो. तेथे मागील हंगामात सुमारे ३५ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. उत्पादन सुमारे ३५५ लाख गाठी आले. चीनला दरवर्षी ५५० ते ६०० लाख गाठींची गरज (कंझमशन) असते. चीनचा वस्त्रोद्योग जगात सर्वाधिक मोठा आहे. चीन सुताचे सात हजार कोटी किलोग्राम उत्पादन घेतो. चीन दरवर्षी १०० ते १५० लाख गाठी कापूस आयात करतो. अमेरिका चीनचा मोठा कापूस पुरवठादार राहिला आहे. तेथून २९ व ३५ मिलिमीटर लांब धाग्याच्या मिळून ५५ ते ६० लाख गाठी कापूस चीन आयात करायचा. पण, अमेरिका व चीन यांच्यात मागील दीड वर्षांपासून व्यापारयुद्ध सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांच्या आयात-निर्यातीच्या वस्तूंवर मोठे शुल्क आकारत आहेत. यामुळे अमेरिकेतील कापूस आयात चीनला महाग पडत आहे.  अमेरिकेची कापूस खंडी (३७० किलो रुई) चीनला शुल्कासह ४२ ते ४३ हजार रुपयांत पडत आहे. तर डॉलर रुपयाच्या तुलनेत महाग होत असल्याने भारतीय खंडी चीनला ४० हजार रुपयांत पडत आहे. चीन भारतातील कमी दर्जाच्या कापसापासूनही अपल्याकडील आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दर्जेदार कापड उत्पादन करू शकतो. यामुळे चीन कापसासाठी भारताकडे निर्यातदारांशी संपर्क साधत आहे, अशी माहिती मिळाली.  चीनमध्ये मागील हंगामाच्या तुलनेत सात टक्के कापूस लागवड कमी आहे. शिवाय तेथील कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्या जिझियंग व इतर भागात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसला आहे. तेथे मागील हंगामाच्या तुलनेत कापूस उत्पादन १४ ते १६ टक्क्यांनी हमखास कमी येणार आहे. यामुळे आपली कापसाची गरज पूर्ण करण्यासाठी चीन भारताकडे येईल, असे जाणकारांनी सांगितले.  सीसीआयच्या खरेदीमुळे बाजार वधारला भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) कापूस खरेदी सध्या वेगात करीत आहे. सीसीआय यंदा मागील वर्षाच्या तुलनेत १० ते १२ लाख गाठींचा कापूस देशात विविध भागांतील केंद्रात अधिक खरेदी करील, असे संकेत आहेत. यामुळे कापूस बाजार काहीसा वधारला आहे, असे सांगण्यात आले.  दरात वाढ देशात वातावरण निरभ्र आहे. दर्जेदार कापूस येत आहे. उत्तरेकडील कापूस हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अतिपावसाने गुजरात, महाराष्ट्र आदी भागांत पूर्वहंगामी कापूस पीक हातचे गेले आहे. राज्यात कापूस उत्पादन मागील वर्षाएव्हढेच म्हणजेच ८५ लाख गाठी येईल. त्यातच गुलाबी बोंड अळी कोरडवाहू पिकातही दिसत आहे. यामुळे उत्पादन आणखी कमी होऊ शकते. सरकीचे दर स्थिर असून, या सर्व स्थितीत महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात येथे कापूसदर ५१०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. त्यात मागील आठ दिवसांत क्विंटलमागे १०० ते २०० रुपये सुधारणा झाली आहे, आशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com