भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
अॅग्रोमनी
बांगलादेशच्या वस्त्रोद्योगात चीनची मोठी गुंतवणूक
भारतीय कापसाचा सर्वांत मोठा खरेदीदार म्हणून बांगलादेश समोर आला आहे. यंदा बांगलादेशात सुमारे ३० लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्यात होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
जळगाव ः भारतीय कापसाचा सर्वांत मोठा खरेदीदार म्हणून बांगलादेश समोर आला आहे. यंदा बांगलादेशात सुमारे ३० लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्यात होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. याशिवाय गेल्या पाच ते सात वर्षांत चीनने बांगलादेशातील वस्त्रोद्योगात गुंतवणूक वाढविल्याची माहितीदेखील मिळाली आहे.
चीननंतर बांगलादेशातील कापड उद्योग मोठा आहे. जगात उत्पादित होणाऱ्या कापडात ५२ टक्के कापड पॉलिस्टरचे असते. पॉलिस्टर व इतर कापडाचे उत्पादनही बांगलादेशात घेतले जाते.
चीनमध्ये दरवर्षी सात हजार कोटी किलोग्रॅम सुताचे उत्पादन घेतले जाते. यानंतर भारतात सुमारे पाच ते साडेपाच हजार कोटी किलोग्रॅम सूत उत्पादन घेतले जाते. चीन जगातला क्रमांक एकचा कापड, सूत उत्पादक देश आहे. यानंतर भारत, व्हीएतनाम, बांगलादेश या देशांचे काम वस्त्रोद्योगात आघाडीवर आहे.
कापसाची लागवडच नाही
बांगलादेश वस्त्रोद्योगात आघाडीवर आहे. परंतु बांगलादेशात कापसाची कुठलीही लागवड होत नाही. बांगलादेशला दरवर्षी १०० लाख गाठींची आयात करावी लागते. तर यासोबत सुताचीदेखील बांगलादेश आयात करतो. भारतीय सुताचा सर्वांत मोठा खरेदीदार चीन आहे. यानंतर व्हिएतनाम व बांगलादेशात भारतीय सुताची निर्यात केली जाते. बांगलादेशात सूतगिरण्यांची संख्या गेल्या सात ते आठ वर्षांत झपाट्याने वाढली आहे. तेथे ढाका वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असून, ढाकानजीक नारायणगंज भागात सूतगिरण्यांची मोठी संख्या आहे, अशी माहिती मिळाली. बांगलादेशातील वस्त्रोद्योग तेथील नागरिकांसाठी रोजगाराचे मोठे साधनही बनला आहे. तेथे सुमारे सव्वा कोटी नागरिक वस्त्रोद्योग व त्याच्याशी संबंधित रोजगारावर अवलंबून आहेत.
भारतातून जेवढ्या गाठींची निर्यात गेल्या दोन वर्षात झाली आहे, त्यातील ४० ते ५० टक्के गाठींची आयात बांगलादेशने केली आहे. बांगलादेशला भारतीय कापूस जगात गेले दोन वर्षे स्वस्त पडला आहे. शिवाय भारतातून बांगलादेशात कापसाची पाठवणूक सुकर झाली आहे. जहाज, रस्ते व रेल्वे मार्गे तेथे पाठवणूक केली जाते. पाच दिवसांत भारतातून बांगलादेशात कापसाची निर्यात करणे शक्य होते. बांगलादेशला अमेरिका, ब्राझील, आफ्रिकन देशांमधून कापसाची आयात करताना अधिक दिवस लागतात. त्यात २० ते ३० दिवस लागतात. शिवाय अनेकदा अमेरिकन कापूस भारताच्या तुलनेत महाग पडतो. बांगलादेश भारतासोबत अमेरिका, ब्राझील, आफ्रिकन देशांमधून कापसाची आयात करतो, अशी माहिती मिळाली. बांगलादेशनजीक चीन हा कापसाचा मोठा उत्पादक देश आहे. परंतु चीनला आपल्या वस्त्रोद्योगासाठी कापसाची आयात करावी लागते. यामुळे चीनकडून बांगलादेशला कापूस मिळत नाही.
बांगलादेशात देशातून सर्वाधिक कापूस गाठींची आयात गेले दोन - तीन वर्षे झाली आहे. यंदाही निर्यात चांगली होईल. बांगलादेशातील वस्त्रोद्योग आघाडीवर आहे. तेथे कापसाची लागवड होत नाही. दरवर्षी १०० लाख गाठींची गरज असते.
- अतुल गणात्रा, अध्यक्ष, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया