नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
अॅग्रो विशेष
चॉकी व्यवसायाला विदर्भात पसंती
अंडीपुंज ते दुसऱ्या अवस्थेतील मोल्ड प्रकारात रेशीम अळीचे संवर्धन आव्हानात्मक ठरते. यात मर्तुकीचे प्रमाण वाढत असल्याने रेशीम उत्पादकांकडून दहा दिवस संगोपन केलेल्या दुसऱ्या अवस्थेतील मोल्ड म्हणजे चॉकीच्या खरेदीला पसंती दिली जात आहे.
नागपूर ः अंडीपुंज ते दुसऱ्या अवस्थेतील मोल्ड प्रकारात रेशीम अळीचे संवर्धन आव्हानात्मक ठरते. यात मर्तुकीचे प्रमाण वाढत असल्याने रेशीम उत्पादकांकडून दहा दिवस संगोपन केलेल्या दुसऱ्या अवस्थेतील मोल्ड म्हणजे चॉकीच्या खरेदीला पसंती दिली जात आहे. विदर्भातदेखील त्यावर आधारित व्यवसाय वाढीस लागत असून, अमरावती विभागातील सहा जिल्ह्यांत अशाप्रकारचे आठ चॉकी सेंटर कार्यान्वित झाले आहेत. वार्षिक लाखो रुपयांची उलाढाल या माध्यमातून होत असल्याने शेतीपूरक व्यवसाय म्हणून एक नवा पर्याय या भागातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाला आहे.
रेशीम उत्पादकांना कोष निर्मितीसाठी अंडीपुंजाचा पुरवठा केला जातो. २८ दिवस त्याचे संगोपन करावे लागते. यातील पहिले दहा दिवस खूप काळजी घ्यावी लागते. हा दहा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर मात्र पुढील १८ दिवसांतच अळी कोष अवस्थेत पोहोचते. १०० अंडीपुंजांपासून ५५ हजार अळ्या मिळतात. सरासरी ५० हजार (९५) तरी त्या मिळाव्या, असे अपेक्षित राहते किंवा तरच हा व्यवसाय फायदेशीर ठरतो.
परंतु पहिल्या टप्प्यात संगोपनात काही उणिवा राहिल्यास १०० अंडीपुंजांपासून अळ्यांची उपलब्धता कमी मिळते. रेशीम व्यवसायातील ही अडचण लक्षात घेता दहा दिवस संगोपन केलेल्या अळ्यांचा पुरवठा करणारे चॉकी सेंटर विदर्भात पाय रोवू लागले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील सिद्धेश्वर देशमुख यांनी या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. त्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्यात दोन चॉकी सेंटर उभे झाले असून, दुसरे दिग्रसमध्ये अनिकेत चॉकी सेंटर आहे. त्यासोबतच अकोला जिल्ह्यात शंकर जाधव आणि डाखोरे या शेतकऱ्यांचे प्रत्येकी एक, बुलडाणा जिल्ह्यात गुळवे यांचे एक, अमरावती जिल्ह्यात दोन आणि वाशीम जिल्ह्यात महादेव बोरकर यांचे एक याप्रमाणे आठ चॉकी सेंटर उभे झाले आहेत. नागपूर विभागात टसर रेशीम उत्पादन अधिक होते. परिणामी, या विभागातील सहा जिल्ह्यांत मात्र सध्या एकही चॉकी सेंटर नाही. येत्या काळात नागपूर येथे एका शेतकऱ्याकडून याची उभारणी प्रस्तावित असल्याची माहिती रेशीम संचलनालयाच्या अधिकारी दिली.
असे आहेत अंडीपुंजाचे दर
१०० अंडीपुंजांचा महाराष्ट्रात पुरवठा ७०० रुपयांना होतो. तर केंद्र सरकारच्या संस्थांकडून घेतल्यास त्याकरिता ८०० रुपये मोजावे लागतात. दोन्ही स्तरांवर खरेदी केलेल्या अंडीपुंजांसाठी ७५ टक्के अनुदान दिले जाते.
प्रतिक्रिया
आठ वर्षांपूर्वी मी चॉकी सेंटरची सुरुवात केली. त्याकरिता २०१५ मध्ये केंद्रीय रेशीम बोर्ड (मैसूर) येथे सात दिवसांचे व त्यानंतर तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. तांत्रिक माहितीनंतर या व्यवसायात उतरल्याने उत्तम प्रतीच्या चॉकीचा पुरवठा करणे शक्य होते. १०० अंडीपुंजांसह दोन हजार रुपयांना याची विक्री होते. वर्षभरात दीड लाख अंडीपुंजांपासून निर्मित चॉकीचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जातो. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांतून मागणी राहते. चॉकी सेंटर उभारणीसाठी वीस लाख रुपये इतका खर्च होतो.
- सिद्धेश्वर बिचेवार, सिद्धेश्वर चॉकी सेंटर, विडूळ, यवतमाळ
अंडीपुंजांचे पहिल्या टप्प्यातील संगोपन आव्हानात्मक राहते. या काळात विशेष काळजी घ्यावी लागते. तांत्रिक माहितीचा अभाव असल्यास अंडीपुंजांपासून अळ्या मिळण्याचे प्रमाण कमी होते. त्यातून मग अपेक्षित कोष उत्पादकता उत्पन्न होत नाही. परिणामी, विदर्भात चॉकी पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. रेशीम उत्पादकांची मागणी वाढल्याने चॉकी सेंटरच्या संख्येतही वाढ होत आहे.
- महेंद्र ढवळे, सहायक संचालक, रेशीम संचलनालय, नागपूर