खरीपासाठी निवडा दर्जेदार बियाणे...

लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला असला तरी शासनाने शेतीकामावर कोणतीही बंदी घातलेली नाही. तसेच उत्पादित शेतीमालाची वाहतूकसुद्धा थांबवलेली नाही. परिणामी शेतकरी आणि शेतमजूरांनी घाबरून न जाता योग्य प्रकारे मुखपट्टी लावणे, सोशल डिस्टंन्सिंग (दोघांमध्ये किमान २ मीटर अंतर) पाळणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे करून घ्यावीत.
check the germination quality of seeds
check the germination quality of seeds

लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला असला तरी शासनाने शेतीकामावर कोणतीही बंदी घातलेली नाही. तसेच उत्पादित शेतीमालाची वाहतूकसुद्धा थांबवलेली नाही. परिणामी शेतकरी आणि शेतमजूरांनी घाबरून न जाता योग्य प्रकारे मुखपट्टी लावणे, सोशल डिस्टंन्सिंग (दोघांमध्ये किमान २ मीटर अंतर) पाळणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे करून घ्यावीत.

जमीन मशागत व सुधारण्याची कामे प्राधान्याने हाती घ्यावी. शेतीची नांगरणी त्वरित आटोपावी. जमीन उन्हामुळे चांगली तापून, त्यातील किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. मशागत उताराला आडवी किंवा शेतात समतल रेषेला (कंटूर) समांतर करावी. त्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी शेतात मुरण्यास मदत होईल. तसेच मातीची धूप होणार नाही. (जलमृद संधारण). त्याच प्रमाणे विहीर पुनर्भरण, शेततळे दुरुस्ती, बांधबंदिस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत.

  • खतांच्या नियोजनाकरिता माती तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. अजूनही तपासणीसाठी मातीचे नमुने काढलेले नसल्यास त्वरीत काढून घ्यावेत. आपल्या शेतातील मातीचा प्रकार, पीक नियोजन, जमिनीचा उतार व रंग या प्रमाणे वेगळे नमुने घेऊन त्यावर नाव टाकून कृषी खाते, कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठाच्या माती परीक्षण शाळेत तपासणीसाठी पाठवावे. पिशवीवर शेतकऱ्याचे नाव, पत्ता, शेत क्रमांक, मागील वर्षाचे पीक व पुढील नियोजित पिकाचे नाव जरून टाकावे.
  • सद्यपरिस्थितीत शेतकामासाठी मजूर उपलब्ध कमी असल्यास शेतकामात यंत्रांचा वापर वाढवावा. यंत्राच्या वापरामुळे मनुष्य संपर्क कमी करता येतो. उदा. मशागतीसाठी ट्रॅक्टर ,ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र, आंतरमशागतीसाठी लहान ट्रॅक्टर किंवा एका माणसाने चालणारे यंत्र, ट्रॅक्टर चलित बूम स्प्रेअर, पीक काढणी / कापणी यंत्रे. यामुळे वेळ व खर्च वाचू शकतो.
  • खरीप पिकांचे नियोजन करत असाल तर आंतरपीक पद्धतीला प्राधान्य द्या. पिकांची फेरपालट केल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी होऊन जमिनीचा कस टिकवण्यासाठी मदत होते. आंतरपिकात विशेषतः मूग, उडीद, सोयाबीन या कडधान्याचा वापर अधिक वाढवावा. कापूस पिकात या पिकांचा अंतर्भाव केल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • हंगामाच्या अगोदरच बियाणांचे नियोजन करावे. खरीप शेतीमध्ये कडधान्य उदा. तूर, उडीद, मूग व सोयाबीन या पिकांसाठी घरचे बियाणे वापरू शकता. वाण निवडताना कमी ते मध्यम कालावधीच्या वाणांना प्राधान्य द्यावे. घरचे बियाणे वापरतांना चांगल्या प्रतीचे दाणे निवडून साफ करून घ्यावेत.
  • घरच्या बियाणांचा वापर करण्यापूर्वी बियाण्यांची उगवणक्षमता तपासून पाहावी. किमान शंभर बियाण्यांची चार लॉटमध्ये उगवणक्षमता तपासणी करावी. त्यासाठी कुंडी, प्लॅस्टिक ट्रे, गोणपाट किंवा कापडी तुकड्यांचा वापर करतो. बियांना कोंब आल्यावर सरासरी काढून घ्यावी. विशेषत: सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के असल्यास, एकरी ३० किलो बियाणे वापरावे. उगवण क्षमता ६९ टक्के असेल तर एकरी ३०.५ किलो बियाणे वापरावे. या प्रमाणे प्रत्येक घटत्या टक्क्यासाठी सरासरी अर्धा किलो बियाणे वाढवावे. त्यामुळे झाडांची संख्या योग्य राहून अपेक्षित उत्पादन मिळेल.
  • बियाणे खरेदी करताना पाकिटावरील कंपनीचे नाव, वाणाचे नाव, बॅच नंबर, लेबल, उगवण क्षमता, वापरण्याची मुदत व पाकीट सीलबंद असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच बिलावर कंपनीचे व वाणाचे नाव, बियाण्याचा दर, किंमत, लॉट क्रमांक, बिलाची तारीख याची नोंद करून घेण्यास विसरू नये. तसेच पीक शेतातून निघेपर्यंत बिल, पाकीट व त्यातील काही बियाणे जपून ठेवावेत.
  • चांगले उत्पादन मिळण्यासाठी शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर करताना ते चांगले कुजलेले काळेभोर खत वापरावे. अर्धवट कुजलेल्या शेणखताच्या वापरामुळे शेतात तण, उधळी किंवा हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्याकरिता मेटारायझीम बुरशी मातीत ओलावा असताना दोन किलो प्रति एकरी या प्रमाणात शेणखतातून शेतात मिसळून द्यावी.
  • पेरणीची पद्धत, वेळ, पिकातील अंतर, बियाण्याचे प्रमाण, पेरणीची खोली इ. बाबी झाडांची संख्या योग्य प्रमाणात राखण्यास व पिकांच्या वाढीस कारणीभूत असतात. त्याकडे शेतकरी बांधवांनी विशेष काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
  • पेरणी रुंद वरंबा-सरी पद्धतीने करण्यासाठी बीबीएफ यंत्राचा वापर करावा. यंत्राची जुळवाजुळव किंवा दुरुस्ती अगोदरच करून ठेवावी. बीबीएफ तंत्राने पेरणी केल्यास जास्त पाऊस झाल्यास जमिनीत मूलस्थानी पाणी मुरवता येते. याउलट पावसाच्या खंडात पीक अधिक काळ टिकून राहू शकते. पिकांमध्ये हवा खेळती राहिल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होऊन अधिक शेंगा / फळधारणा होते.
  • कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने पिकाचे मोठे नुकसान होते. या किडीचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत पिकांचे अवशेष नष्ट करून कंपोस्ट खत तयार करावे. पूर्वहंगामी लागवड करू नये. कपाशी लागवड जून महिन्यांमध्ये ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच करावी. यामुळे पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीचे संकट टाळता येते.
  • पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करण्यासाठी जीवाणू खताची उपलब्धता तपासावी. बीजप्रक्रिया करतांना बियाण्यास रासायनिक बुरशीनाशके प्रथम चोळावीत, त्यानंतर जीवाणू संवर्धके वापरावी. कडधान्यास रायझोबियम व पीएसबी प्रत्येकी २५० ग्रॅम ट्रायकोडर्मा ५० ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास चोळावे. कापूस व ज्वारी यासारख्या पिकाच्या बियाण्यास अॅझेटोबॅक्टर वापरावे. जिवाणू खतासाठी जवळच्या कृषी विज्ञान केंद्राकडे किंवा विद्यापीठाकडे आगाऊ व एकत्रित मागणी नोंदवावी. आजकाल जिवाणू खते द्रवरूपात व एकत्रित मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. खरेदी करतांना ते खात्रीलायक, ताजे असल्याची व त्यातील जिवाणूंची संख्या मानकाप्रमाणे असल्याची खात्री करावी.
  • जैविक कीडनियंत्रणाअंतर्गत पीक निहाय कामगंध सापळे व ट्रायकोकार्ड एकरी आठ या प्रमाणे तीन वेळा लागणार आहेत. त्याची तजवीज करावी. त्यातील ल्युअर ताज्या व वेळच्या वेळी खरेदी कराव्यात. पिकामध्ये एकरी आठ ते दहा पक्षीथांबे तयार करून ठेवावेत. सोबतच परिसरातील वनस्पतींपासून दशपर्णी अर्क तयार करून ठेवावा.
  • फळझाडांच्या झाडास व्यवस्थित आळे करून खोडास माती लावून बुंध्यास एक मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. (१ किलो मोरचुद + १ किलो कळीचा चुना + दहा लिटर पाणी.
  • या हंगामात नवीन फळझाडांची लागवड करावयाची असल्यास आवश्यक रोपांसाठी खात्रीलायक शासकीय नर्सरी, कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेत नोंदणी करावी. फळझाडांच्या लागवडीसाठी शिफारशीत अंतरावर ५० x ५० x ५० सें.मी. चे खड्डे करून त्यात ५ किलो शेणखत, ५ किलो गाळाची माती, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २५ ग्रँम ॲझेटोबॅक्ट र, पीएसबी प्रत्येकी आणि ट्रायकोडर्मा १० ग्रॅम मातीत मिसळून व्यवस्थित भरून ठेवावेत.
  • या उन्हाळ्याच्या सरतेशेवटी किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक शेतकऱ्याने पिकलेल्या व जमिनीवर पडलेल्या निंबोळ्या जमा करून चांगल्या वाळवून कोरड्या जागी साठवाव्यात. या वर्षी कमीतकमी १०० किलो निंबोळ्या गोळा कराव्यात. याचा उपयोग पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्यासाठी होतो. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद सारख्या सर्व खरीप आणि रब्बी पिकावर दोन फवारण्या केल्यास रासायनिक किटकनाशकांच्या खर्चात बचत होते. किडींचा प्रादुर्भाव वीस टक्क्यांपर्यंत कमी होतो. उरलेल्या निंबोळी बारीक करून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत म्हणून वापरता येते.
  • संपर्क- डॉ. विनोद खडसे, ९८५००८५९६६ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com