अमेरिकन लष्करी अळीचा कपाशीलाही धोकाः सीआयसीआर

कपाशीवर लष्करी अळी
कपाशीवर लष्करी अळी

पुणे : नगर जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या कापूस पिकात आढळलेला अमेरिकन लष्करी अळीचा (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) प्रादुर्भाव दुर्लक्षून चालणार नाही. प्रारंभी येथे मका पिकात या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने त्याच्या लगतच्या कपाशीत ही अळी स्थलांतरित होण्यास मदत झाली व पिकाचे नुकसान झाले आहे, असे निरीक्षण नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (सीआयसीआर)आपल्या अहवालात नोंदविले आहे. कपाशीचे नुकसान करण्याची तिची तीव्र क्षमता पाहता वेळीच दक्षता न घेतल्यास मका क्षेत्र परिसरातील कापूस पिकावर पुढेही या किडीचे आक्रमण होऊ शकते, असा इशारा ‘सीआयसीआर’च्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. सुसरे (ता. पाथर्डी, जि. नगर) गावातील अर्जुन उदागे यांच्या कापूस पिकात मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’ने नुकतेच प्रसिद्ध केले. राज्यातील कपाशी पिकावरील या अळीच्या प्रादुर्भावाची ही पहिलीच नोंद होती. घटनेचे गांभीर्य वेळीच लक्षात घेऊन सीआयसीआरचे कीटकशास्त्रज्ञ बाबासाहेब फंड आणि चिन्ना बाबू नाईक यांनीही तत्परतेने उदागे यांच्या संबंधित क्षेत्राला २१ सप्टेंबरला भेट दिली. किडीच्या प्रादुर्भावाची कारणे जाणून घेत आपली निरीक्षणे नोंदवत त्याचा अहवालही सादर केला आहे. अहवालात नोंदवलेली निरीक्षणे... 

  •  शेतकऱ्याकडील मका पिकात लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव होता. त्यामुळे रोटाव्हेटरचा वापर करून त्याने मका पीक काढून टाकले. मात्र पिकाचे अवशेष व्यवस्थित बारीक न झाल्याने शेतात तसेच पडून राहिले. त्यावर अळ्या व मातीत काही प्रमाणांत कोष आढळून आले. 
  •  हे अवशेष जसजसे सुकू लागले तसतशी लष्करी अळीची मका खाद्याची पसंती कमी होत जाऊन लगतच्या किंवा बांधाशेजारील कपाशी पिकावर तिचे स्थलांतर झाले.
  •  वाढीच्या मध्यावस्थेतील (चौथी अवस्था) अळी फुले व बोंडे लागलेल्या कपाशीवर संक्रमित झाल्याने अधाशीपणे तिने फुले व बोंडांचे नुकसान केले. 
  •  प्रादुर्भावग्रस्त कपाशीच्या शेताभोवती अवघ्या २० ते ३० मीटर अंतरावर चोहोबाजूंनी कपाशी व्यतिरिक्त मका, ज्वारी, बाजरी व उसाचेही पीक होते. सुसरे गाव परिसरात कमी अधिक प्रमाणात ही सर्वच पिके घेतली जात असल्याने लष्करी अळीच्या खाद्यपिकांची जैव-विविधता भागात आढळून आली.
  •  भोवतालच्या पीक परिस्थितीकीचे बारकाईने निरीक्षण केले असताना, हा प्रादुर्भाव म्हणजे पीक परिस्थितीकीय बदलाचा (Ecological succession) परिणाम असल्याचे आढळले. 
  •  कपाशी पिकावर कोठेही लष्करी अळीचे अंडीपुंज अथवा सुरवातीच्या अवस्थेतील अळ्या दिसून आल्या नाहीत.
  •  मक्याच्या शेतालगत बांधानजीकच्या सुमारे १५ ते २० मीटरपर्यंतच्या कपाशीवर प्रादुर्भावाची तीव्रता अधिक होती. शेताच्या विरुद्ध दिशेने जसजसे चालत जाऊ तसतसे हे प्रमाण कमी होत गेले.
  •  शेताच्या ज्या बाजूने कपाशीवर प्रादुर्भावास सुरुवात झाली त्या बाजूने सरासरी १० टक्क्यांपर्यंत तर उर्वरित भागात दोन टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव दिसून आला.
  •  अळीची विष्ठा, बोंडावर पडलेल्या छिद्रातून पावसाचे पाणी, जिवाणू व बुरशीचे झालेले संक्रमण यामुळे प्रादुर्भावग्रस्त बोंडे सडण्यास सुरुवात झालेली आढळली.
  • नियंत्रण पद्धती विकसित नाही... कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ आपल्या निरीक्षण अहवालात पुढे म्हणतात, की अमेरिकन लष्करी अळी सुमारे दीड वर्षापूर्वी भारतात आढळली. मक्यासह ऊस, ज्वारी, बाजरी व नुकतीच ती कपाशीवर आढळली आहे. परभणी व जळगावातही नुकतीच या किडीच्या प्रादुर्भावाची कपाशीवर नोंद झाली आहे. भारतीय हवामानातील कृषी परिसंस्थेत तिचे जीवनचक्र, सक्रियतेचा कार्यकाळ, सुप्तावस्था, हंगाम वा वर्षभरात तयार होणाऱ्या पिढ्या, जैविक घटकांद्वारा होणाऱ्या नियंत्रणाचे मूल्यांकन, कीटकनाशकांची कार्यक्षमता व किडीतील प्रतिकारक्षमता आदी बाबींचा पुरेसा सखोल अभ्यास झालेला नाही. त्यामुळे स्थानिक पर्यावरणीय परिसंस्थेच्या अनुषंगाने एकात्मिक नियंत्रण पद्धती विकसित झालेली नाही. अन्य देशांतील प्रचलित नियंत्रण पद्धतीच्या उपलब्ध माहितीवरच आपली नियंत्रण पद्धती अवलंबून आहे.  संभाव्य धोके  आपली निरीक्षणे नोंदवताना शास्त्रज्ञांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा ऊहापोह केला आहे. त्यानुसार लष्करी अळीची जगभरातील सुमारे २३ कुळांतील ८० विविध वनस्पती प्रजातींवर नोंद झाली असून, मका हे तिचे अधिक पसंतीचे पीक आहे. अर्थात ती आपल्या खाद्यनिवडीबाबत खूपच चोखंदळ आहे. किडीचे उगमस्थान असलेल्या उत्तर अमेरिकी देशात झालेल्या संशोधनातून ‘ही कीड कापूस व सोयाबीन यांच्या तुलनेत सर्वांत आधी मका, त्यानंतर ज्वारी, बर्मुडा गवत यांसारख्या तृणधान्यवर्गीय पिकांना पसंती देते’ असे निरीक्षण समोर आले आहे. त्यामुळे मका पीक खाण्यायोग्य स्थितीत असल्यास ही कीड आजूबाजूच्या कपाशी व अन्य पिकांवर स्थलांतरित होऊन नुकसान करण्याची शक्यता तुलनात्मकदृष्ट्या कमी असते. मुख्य खाद्य पीक शेतातून काढून टाकल्यास किंवा वाढीच्या शेवटच्या टप्प्यात असल्यास खाद्याबाबत पसंती कमी होऊन ही कीड आजूबाजूच्या पर्यायी पिकांवर स्थलांतरित होण्याचा धोका असतो. बहुतांशी मका चाऱ्यासाठी घेतला जात असल्याने कपाशीच्या तुलनेत त्याची कापणी लवकर होते. धान्य उत्पादनासाठीचा मकाही कपाशीच्या तुलनेत लवकर पक्व होत असल्याने त्याची काढणी अगोदर होते. या दोन्ही गोष्टींमुळे मुख्य खाद्य पीक नष्ट झाल्याने लष्करी अळी आपला मोर्चा परिसरातील कपाशी व अन्य पर्यायी पिकांकडे वळवण्याचा धोका असतो. नेमके हेच सुसरे येथे घडल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.  त्यामुळे जसजसे मका पीक काढले जाईल, तसतशी ही कीड कपाशीवर येण्याची शक्यताही त्यांनी  वर्तवली आहे.   लष्करी अळीचे प्रकार  जगभरात आढळणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीच्या दोन प्रमुख उपप्रजाती आहेत. यात भातावर प्रादुर्भाव करणारी Rice Strain (R-strain) व मक्यावर प्रादुर्भाव करणारी Corn strain (C-strain) या नावाने ओळखली जाते. आर स्ट्रेन भात, बर्मुडा गवत व अन्य तृणधान्यवर्गीय वनस्पतींवर तर ‘सी स्ट्रेन’ मुख्यत्वे मका व त्यानंतर कापूस पिकावर आढळते. भारतात आढळणारी लष्करी अळी ही ‘सी स्ट्रेन’ प्रजातीची असल्याची नोंद आहे. त्यामुळे मक्यावर आढळणारी ही कीड मका पीक उपलब्ध नसताना कपाशीवर येऊ शकते. लष्करी अळीच्या वाढीच्या पहिल्या तीन अवस्था पानांवरच गुजराण करतात व प्रादुर्भावग्रस्त पाने जाळीदार दिसतात. परंतु मध्यावस्थेपासून पुढील अळ्या पात्या, फुले व बोंडांना छिद्रे पाडून आतील भाग फस्त करतात. प्रादुर्भावग्रस्त बोंडावर अळीची विष्ठा आढळून येते. या अळीमुळे झालेले नुकसान हे बोंड अळीच्या नुकसानीशी मिळतेजुळते असते. सहाव्या अवस्थेतील अळ्यांची भक्षण क्षमता आधीच्या पाच अवस्थांतील अळ्यांच्या एकत्रित भक्षण क्षमतेपेक्षा जास्त असते. ही अळी आपल्या जीवनकाळात जेवढे नुकसान करते त्यापैकी ८० टक्के नुकसान केवळ सहाव्या अवस्थेतील अळीमुळे होते.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com