संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पश्‍चिम महाराष्ट्रातील सव्वा लाख नागरिकांचे स्थलांतर

पुणे  : पूरस्थितीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सव्वा लाख नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले असून, १६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर व सांगलीची स्थिती गंभीर व अभूतपूर्व आहे. कितीही बोटी आणल्या तरी अडकलेल्या सर्व नागरिकांना पुरातून बाहेर काढणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी वार्ताहरांशी बोलताना पूरग्रस्तांसाठी सुरू असलेल्या मदतकार्याची माहिती दिली. सरकारी यंत्रणेने पूरस्थिती हाताळण्यात कुठेही चूक केलेली नाही. आमच्यादृष्टीने सध्या कोल्हापूर व सांगली भागात गंभीर स्थिती आहे. सर्व नागरिकांना रेस्क्यू करता येणार नाही. मात्र, या नागरिकांना उंच भागाकडे नेणे; त्यांना अन्न, औषध पुरवठा करणे हाच पर्याय उपलब्ध आहे, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

आवश्यकता भासल्यास ‘एनडीआरएफ’च्या आणखी टीम आणण्यास प्राधान्य दिले जात आहे. पूरस्थितीमुळे सांगलीत ५३ हजार, पुण्यात १३ हजार, सातारा भागात सहा हजार, सांगली भागात ५३ हजार, तर कोल्हापूर भागात आतापर्यंत ५१ हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेले आहे. कोल्हापुरात मदतीसाठी ४१ खासगी बोटी, एनडीआरएफच्या टीम, स्थानिक मदत पथके आहेत.  

डॉ. म्हैसेकर म्हणाले, की पूर नियंत्रणात कुठेही प्रशासनाने हयगय केलेली नाही. कृष्णा व भीमेच्या खोऱ्यात सातत्याने धरणांचे विसर्ग नियंत्रित केले जात होते. दोन मुख्य अभियंते धरणांच्या विसर्गावर लक्ष ठेवून आहेत. अलमट्टीचे मुख्य अभियंतादेखील संपर्कात आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अपडेट्‍स दिले जात होते. मात्र, अनेक भागांत ४०० ते ५०० मिलिमीटर पाऊस सहा ते आठ तासांत झाला, त्यामुळे ही स्थिती तयार झाली. २००५ मध्ये कोल्हापूरला समस्या उद्‍भवली होती. कोल्हापूर भागातील नद्यांची रचना आणि धरणांची स्थितीच अशी आहे, की त्या पूरस्थिती तयार करतात.

धरणांमधून पाणी सोडण्यात, तसेच अलमट्टीतून वेळेत पाणी न सोडल्याने समस्या आल्या का, असे विचारले असता डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘अलमट्टीचा विसर्ग आता तीन लाखांवरून चार लाख क्युसेक करण्यात आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले. कर्नाटक प्रशासन अलमट्टीचा विसर्ग पाच लाख २० हजार क्युसेकपर्यंत नेऊ शकते. मात्र, त्यामुळे तेथेही पूरस्थिती तयार होऊ शकते. मात्र, आम्ही त्यांना किमान साडेचार लाख क्युसेकपर्यंत विसर्ग नेण्याचे सांगतो आहोत. त्यांनी आता एक लाख क्युसेकने विसर्ग वाढविला आहे. अतिवृष्टी व काठोकाठ धरणे भरल्यामुळे पाणी सोडण्याशिवाय पर्यायच राहिलेला नव्हता. यातून अनेक भागांत पूर परिस्थिती तयार झाली. कोल्हापूरला ‘पॅनिक’ स्थिती तयार झाली.

हे चित्र अभूतपूर्व असून, यापूर्वी अशी स्थिती उद्‍भवलेली नव्हती. रेस्क्यू करण्यासाठी विविध भागांमधून सतत मागणी होत आहे. मात्र, रेस्क्यू टीम उपलब्ध असूनदेखील पुरामुळे रस्ते बंद असल्यामुळे मदत करण्यात अडचणी येत आहेत. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्यानंतर शिबिरांमध्ये दहा किलो तांदूळ व दहा किलो गहू दिला जात आहे. मात्र, त्यांना शिजवलेले अन्न प्रथम हवे आहे, ते आम्ही पुरवत आहोत. याशिवाय मेणबत्त्या, केरोसिन, बिस्किटांची पाकिटे पुरविली जात आहेत,’’ असे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

पुणे विभागातील ५८ तालुक्यांपैकी ३० तालुक्यांत अतिवृष्टी झालेली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर भागांत अजूनही अतिवृष्टीचा इशारा आहे. उजनीतून पाणी सोडले होते, त्याचा प्रभाव पंढरपूरमध्ये दिसून आला असून, तेथील सात हजार लोकांना हलविले आहे. माळशिरस, मंगळवेढा व पंढरपूर प्रभावित झालेले आहेत. सध्या कुकडी, पवना, मुळा, मुठा नदीवरील धरणे काठोकाठ भरली आहेत. अजूनही पाऊस सुरू राहिल्यास पाणी सोडावे लागेल, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. 

पुण्यात ४० पूल पाण्याखाली होते. त्यातील सात पुलांवरील पाणी आता कमी झाले आहे. साताऱ्यात सात, सांगलीत सहा पूल पाण्याखाली आहेत. कोल्हापुरातील अनेक भागांत छोटे-मोठे पूल पाण्याखाली आहेत. बेळगाव मार्गावर आठ फूट पाणी आहे. बंगलोर रस्तादेखील बंद आहे. सांगली ते कोल्हापूर हा मार्ग बंद असून कोल्हापूरशी आता रस्ता संपर्क तुटला आहे. ‘एनडीआरएफ’च्या तीन टीम तेथे आहेत. नौदलाच्या चार टीम कोल्हापूरला गुरुवारी जातील. आमच्या अहवालानुसार, पुरामुळे कोल्हापुरातील १२९ गावे संकटात आहेत.   वृद्ध, रुग्ण, गर्भवतींना मदतीसाठी प्राधान्य पुरामुळे वीजपुरवठा करणारे दहा हजार ट्रान्सफॉर्मर्स बंद पडले आहेत, त्याचा फटका दोन लाख ७५६ हजार नागरिकांना बसला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या मोटर्स पाण्याखाली गेल्या असून, अनेक ग्रामीण पाणीपुरवठा योजना ठप्प झालेल्या आहेत. सध्या कोल्हापूरमधील ३९० गावे, सांगली ११३ गावे, सातारा १८९ गावांमध्ये पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. तेथील जिल्हा परिषदांच्या संपर्कात आम्ही आहोत.

जनावरांनादेखील स्थलांतरित केले जात आहे. सांगलीत १७ हजार, कोल्हापुरात ९ हजार जनावरे सुरक्षित हलविण्यात आली आहेत. कोल्हापूर भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पूरग्रस्तांना लगेच बाहेर काढता येणार नाही. कारण, ४० ते ५० हजार लोकांना बाहेर काढणे शक्य नाही. कितीही बोटी आणल्या तरी त्यांना बाहेर काढता येणार नाही. मात्र, रुग्ण तसेच गर्भवती महिला, वृद्धांना मदतीसाठी प्राधान्य दिले जात आहे, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com