बुरशी, अपुऱ्या पोषणामुळे होणाऱ्या फळगळवरील उपाययोजना

वातावरणातील बदलामुळे वनस्पती अंतर्गत घडामोडीमध्ये अडथळा निर्माण होऊन फळगळ वाढते. फळगळतीच्या कारणांमध्ये अपुरे पोषण, रोग व कीड इ. घटकांचा समावेश असतो.
Colletotricum stem end rot and fruit rot symptoms in citrus fruit
Colletotricum stem end rot and fruit rot symptoms in citrus fruit

वातावरणातील बदलामुळे वनस्पती अंतर्गत घडामोडीमध्ये अडथळा निर्माण होऊन फळगळ वाढते. फळगळतीच्या कारणांमध्ये अपुरे पोषण, रोग व कीड इ. घटकांचा समावेश असतो.  ​ संत्रा फळपिकामध्ये आंबिया बहार नैसर्गिकरीत्या येतो. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांचा कल हा आंबिया बहार घेण्याकडे असला तरी फळांची वाढ विषम परिस्थितीत होत असते. उदा. थंडीमध्ये फुलांचे फळात रूपांतर होते, त्यानंतर वाढीच्या अवस्थेत कडक उन्हाळा त्यानंतर पावसाळा अशा विपरीत अवस्थेतून फळे झाडावर आकार घेतात. वातावरणातील बदलामुळे वनस्पती अंतर्गत घडामोडीमध्ये अडथळा निर्माण होऊन फळगळ वाढते. फळगळतीच्या कारणांमध्ये अपुरे पोषण, रोग व कीड इ. घटकांचा समावेश असतो.   बुरशीजन्य रोगामुळे होणाऱ्या फळगळसाठी उपाययोजना 

  • सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तशीच राहिल्यास रोगांचा प्रसार व तीव्रता वाढते. वाफे स्वच्छ ठेवावेत.
  • बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे. पाणी साठून राहणाऱ्या भागात फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव अधिक होतो.
  • फायटोप्थोरा फळावरील तपकिरी रॉटमुळे होणाऱ्या फळगळसाठी संपूर्ण झाडावर फवारणी प्रति लिटर पाणी फोसेटिल एएल २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्लूपी) २.५ ग्रॅम.
  • कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉटमुळे होणाऱ्या फळगळसाठी फवारणी प्रति लिटर पाणी बोर्डो मिश्रण ०.६ टक्के, किवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्लूपी)* २.५ ग्रॅम किवा कार्बेन्डाझीम (५० डब्लूपी)* १ ग्रॅम.
  • फळावरील कूज असल्यास याकरिता बेंझिमिडाझोल या वर्गातील बुरशीनाशके यांची फवारणी करावी. उदा. थायोफिनेट मिथाईल* २.५ ग्रॅम प्रति लिटर. 
  • ग्रीनिंग रोगामुळे होणारी फळगळ ग्रीनिंग रोग हा जिवाणूजन्य असून या रोगाचा प्रसार ''सिट्रस सायला'' किडीद्वारे होतो. प्रथम लक्षणे पानांवर दिसून येतात. पानाचा शिरांमधील भाग पिवळा होण्यास सुरुवात होते. हा पिवळेपणासुद्धा मध्य शिरेच्या दोन्ही बाजूस सारखा नसतो. शेवटी संपूर्णपणे पाने पिवळी होतात. रोगट पाने आकाराने लहान राहून ती फांद्यावर उभट सरळ होतात. फळे आकाराने लहान राहून त्यांची वाढ असमतोल होते. फळातील बिया काळ्या पडून  सुरकुतलेल्या चपट्या राहतात. फळातील रसाची चव कडू होते. रोगग्रस्त झाडावरील फळांचा उन्हाकडील भाग पिवळा व सावलीतील किंवा पानात झाकलेला भाग गडद हिरवा राहतो. अर्धी पिवळी, अर्धी हिरवी असलेली ही फळे गळून पडतात.  ग्रीनिंग रोगामुळे होणारी फळगळ रोखण्यासाठी उपाययोजना 

  • सिट्रस सायला कीडीचे आंतरप्रवाही कीटकनाशक वापरून बंदोबस्त करावा. फुले येतेवेळी सिट्रस सिला या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी डायमेथोएट २ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड ०.५ मिली. १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
  • स्फुरदयुक्त खतांची मात्रा जमिनीतून वाढवून द्यावी. सहा वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडासाठी ४०० ग्रॅम प्रति झाड द्यावे.  खतासोबत झिंक सल्फेट २०० ग्रॅम, फेरस सल्फेट २०० ग्रॅम व बोरॅक्स २०० ग्रॅम मातीत मिसळून द्यावे.
  • बुरशीजन्य फळगळ  संत्रा फळझाडांमध्ये फळगळ प्रामुख्याने कोलेटोट्रीकम, डिप्लोडिआ, फायटोप्थोरा व अल्टरनेरिया या बुरशींमुळे होते. पावसाळ्यात या बुरशींचे संक्रमण फळांच्या देठांस विशेषतः फळांची साल व देठ यांचे जोडावर होऊन काळपट तपकिरी डाग पडतात. तो भाग कुजून फळांची गळ होते. झाडांवर जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असतील तर बुरशींची बीजफळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतात, परिणामी आर्थिक नुकसानकारक फळगळ आढळून येते.  फायटोप्थोरा फळावरील तपकिरी रॉट किंवा फळावरील कूज लक्षणे जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी किंवा करडे डाग पडतात. फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते. फळाच्या हिरव्या कातडीस संक्रमण होऊन पूर्ण फळ हे तपकिरी-काळ्या रंगाचे होते. फळे सडून गळतात. फळ सडीच्या अवस्थेस ''ब्राऊन रॉट'' किंवा तपकिरी रॉट असे संबोधतात. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. अधिक आर्द्रता, कमी तापमान, अपुरा सूर्यप्रकाश व पावसाची झड या कारणांमुळे हा रोग अधिक प्रमाणात फोफावतो.    कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉट किंवा देठ सुकणे  कोलेटोट्रीकम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊन तो भाग काळा पडतो. पुढे त्याचे प्रमाण वाढत जाऊन संपूर्ण फळ सडते. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे, वाळणे ही या रोगाची सुरुवातीचे लक्षण आहे. बरेचदा उशिरा झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी व कडक होतात. दीर्घ काळापर्यंत देठांना लटकत राहतात.  डिप्लोडिआ फळावरील कूज डिप्लोडिआ बुरशीमुळे फळाच्या देठाजवळ हलक्या पिवळ्या रंगाचा चट्टा पडतो. चट्ट्याचा भागावर दाब दिला असता तो मऊ जाणवतो. पिवळा असलेला भाग नंतर करड्या किंवा तपकिरी रंगाचा होतो. कोरड्या उष्ण वातावरणात व झाडावर सल असलेल्या बागेत या बुरशीचा प्रकोप अधिक होतो. या वर्षी बऱ्याच ठिकाणी होणारी फळगळ डिप्लोडिआ बुरशीमुळे होत असल्याचे दिसते.   अपुऱ्या पोषणामुळे होणारी फळगळ

  • झाडाच्या जडणघडणीमध्ये पानांचे अनन्य साधारण महत्त्व असून, ती झाडांच्या विविध जैविक क्रियांसाठी आवश्यक ती ऊर्जा तयार करून पुरवतात. झाडास पुरेशी पालवी नसल्यास अन्नद्रव्ये न साठल्यामुळे नवतीच फुटते किंवा फळे आली तरी गळून पडतात. पालवीनुसार फळे झाडास ठेवावीत. पालवी भरपूर असावी यासाठी शिफारशीनुसार खतांचा वापर करावा.
  • झाड सशक्त व निरोगी राहण्यासाठी फळांची तोडणी झाल्यानंतर वाळलेल्या फांद्यांची छाटणी करावी. त्यामुळे त्यावरील सुप्तावस्थेतील रोगकारक निघून जातात. सल काढताना फांदीचा हिरवा भाग ५ सेंमी पर्यंत घेऊन सल काढावी. प्रत्येक वेळी सल काढणाऱ्या अवजाराचे निर्जंतुकीकरण करावे. सल काढलेल्या झाडावर बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे त्याचा पुढील हंगामावर होणारा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी होतो. 
  • फळधारणा होण्याच्या कालावधीत बागेची खोल मशागत करू नये. खोल मशागतीमुळे झाडांची मुळे तुटतात, जमिनीची जलधारण शक्ती वाढून निचरा होत नाही व फळगळ वाढते. 
  • बागेस संतुलित पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त व प्रमाणापेक्षा कमी पाणी देणे टाळावे. यामुळेसुद्धा फळगळ दिसून येते. पावसाळ्यात बागेत पाणी साचू न देता पाण्याचा निचरा करण्याची काळजी घ्यावी. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात बागेत पाणी साचून राहिल्यास व पाण्याचा निचरा न झाल्यास फळांची गळ होते. पाणी साचून राहत असल्यास दोन किंवा तीन ओळींत एक याप्रमाणे उताराच्या दिशेने चर काढावेत. 
  • गळलेल्या फळांची खोल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावावी. फळबागेत फळांचे ढीग कुठेही ठेवू नयेत. ते कीड व रोगाचे प्रसार करण्याचे काम करतात.
  • सतत पावसाचे पाणी साचून राहिल्यास तसेच उष्ण वातावरणात बागेमध्ये तणनाशकाचा वापर टाळावा.
  • अधिक व दर्जेदार उत्पादनाकरिता झाडाच्या वयानुसार खतांची शिफारशीत मात्रा द्यावी. दहा वर्षावरील झाडाकरिता ५० किलो शेणखत, ७.५ किलो निंबोळी ढेप, ८०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद,  ६०० ग्रॅम पालाश प्रती झाड यासह ५०० ग्रॅम व्हॅम, १०० ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जिवाणू, १०० ग्रॅम ॲझोस्पीरीलम, १०० ग्रॅम, ट्रायकोडर्मा, १०० ग्रॅम सुडोमोनास प्रति झाड द्यावे. नत्र हा अमोनियम सल्फेट स्वरूपात  द्यावा.
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे द्यावयाची असल्यास झिंक सल्फेट ५ ग्रॅम, फेरस सल्फेट १ ग्रॅम व बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन अंबिया फळांकरिता जुलै-ऑगस्ट महिन्यात तसेच मृगाच्या फळाकरिता ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये फवारणी करावी.
  • नॅप्थील ॲसेटिक ॲसीड (एनएनए)* १ ग्रॅम किंवा जिबरेलिक ॲसिड* १.५ ग्रॅम किवा २-४ डी* १.५ ग्रॅम अधिक युरिया १ किलो अधिक कार्बेन्डाझीम (५० डब्लूपी) १०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी घेऊन या द्रावणाची फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांने घ्यावी.  
  •  झाडावर पानांची संख्या कमी व पाने पिवळट हिरव्या रंगाची असल्यास कॅल्शिअम अमोनियम नायट्रेट १ किलो अधिक जिबरेलिक ॲसिड १.५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम* १०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी ही फवारणी करावी.
  • (नोंद: * संशोधनावर आधारित ॲग्रेस्को शिफारस; लेबल क्लेम नाही.] संपर्क- डॉ. योगेश इंगळे, ९४२२७६६४३७ डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२ (अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com