मोसंबीच्या फळगळीने उत्पादन घटणार 

मराठवाड्यातील मोसंबीला यंदा फळगळीचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे हंगाम मध्यम राहण्याची शक्‍यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत ही फळगळ थोडी जास्तच असल्याने उत्पादनात २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत घटीचा अंदाज जाणकार व्यक्‍त करीत आहेत.
Citrus fruits will reduce production
Citrus fruits will reduce production

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोसंबीला यंदा फळगळीचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे हंगाम मध्यम राहण्याची शक्‍यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत ही फळगळ थोडी जास्तच असल्याने उत्पादनात २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत घटीचा अंदाज जाणकार व्यक्‍त करीत आहेत. अर्थात, उत्पादन घटल्यास त्यानंतर दर काय पदरात पडतात यावर मोसंबी उत्पादकांचं अर्थकारण अवलंबून राहणार आहे. 

मराठवाड्याचं प्रमुख फळपीक म्हणून मोसंबीकडे पाहिलं जात. जवळपास ४० हजार हेक्‍टरवर मराठवाड्यात मोसंबीचे क्षेत्र विस्तारले आहे. जालना जिल्ह्यातील मोसंबीला तर जीआय मानांकनही प्राप्त आहे. आपल्या रंग, गुण, चवीमुळे ग्राहकांना भुरळ घालणाऱ्या मोसंबीच्या खासकरून औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील आगाराला यंदा पुन्हा एकदा फळगळीने ग्रासले आहे. मार्च महिन्यात आताच्या तुलनेत तापमान थोडे कमी असले, तरी फळगळ मात्र ४० ते ६० टक्‍क्‍यांपर्यंत झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शिवाय लांबलेल्या व अवेळी पावसाने काही बागांमधील ताणाचे तंत्रही बिघडविले आहे. ताण व्यवस्थित न बसण्यासोबतच थंडीचा अत्यल्प कालावधी दोन बहरांचा अट्टहास, त्यामुळे अनेक बागा अपेक्षेनुरूप फुटल्याच नसल्याचे चित्र आहे. आताच्या तुलनेत मार्च महिन्यात तापमान कमी होते. तरीही मोसंबीची फळगळ जास्त झाली. गुंडी ते बोराच्या आकारापर्यंतच्या फळांची गळ मोठ्या प्रमाणात झाली. अर्थात उशिराने फुटलेल्या बागांमध्ये ही गळ जास्त आहे. 

गुंडीत असताना ६० ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत असलेली गळ आता कमी झाली. ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. फळे चिकूच्या आकाराची झालीत. पण वाढलेलं तापमान आणखी काय करतं कोण जाणे.  - भास्कर पालवे,  मोसंबी उत्पादक, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद 

२५० झाडं उत्पादनक्षम, तर ६०० अलीकडे नव्याने लावलेली. आताशी हरभऱ्यासारखी फळ लागली. वाढत्या तापमानाने मोठ्या प्रमाणात गळ होते आहे.  - भाऊसाहेब पठाडे,  मोसंबी उत्पादक, पिंपळगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद 

मागच्या महिन्यात ५० टक्‍के गळ झाली. आता ती ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. लांबलेला पाऊसकाळ, तापमान कमी जास्त, वातावरणातील बदल यामुळे गळ वाढली असावी. शिवाय बुरशीचाही ॲटॅक वाढून पानाचा आकार थोडा छोटा झालाय.  - नंदकिशोर तळेकर,  मोसंबी उत्पादक, शहापूर, ता. अंबड, जि. जालना 

वाढलेलं तापमान अन् प्रतिकूल स्थिती यामुळे यंदा मोसंबीची गळ वाढली आहे. बागांची फूटही कमीच आहे. लांबलेल्या पावसाने ताणात घोळ केला. आता पुन्हा वाढत्या तापमानाचे संकट आहेच.  - गणेश किडे,  मोसंबी उत्पादक, बोधलापुरी, ता. घनसावंगी, जि. जालना 

२५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत घट मराठवाड्यात मोसंबीचे सरासरी एकरी उत्पादन ५ टन आहे. किमान ७ टन एकरी उत्पादन येणे अपेक्षित आहे. परंतु यंदा मिळणाऱ्या सरासरी उत्पादकतेत किमान २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत घट येणे अपेक्षित आहे. शिवाय तेलंगाणातील मोसंबीची स्थिती काय आहे यावर दराचं गणित अवलंबून असणार आहे. 

तज्ज्ञांच्या माहितीनुसार फळगळीची कारणे 

  • - पूरक खताच्या मात्रा न देणे 
  • - नत्रयुक्‍त खताच्या मात्रा कमी देणे 
  • - पाण्याची गरज ओळखून पाणी योग्य प्रमाणात न देणे. 
  • - वातावरण बदलातील चढ-उतार 
  • - पाण्यातील दोन पाळ्यांतील अंतर कमी जास्त असणे. 
  • - फळबाग तज्ज्ञ डॉ. एम. बी. पाटील यांच्या सल्ल्यानुसार गळ थांबण्यासाठी युरिया ५०० ग्रॅम प्रति झाड, एप्रिलमध्ये ७० लिटर, तर मे मध्ये ८० लिटर प्रतिझाड पाणी द्यावे. गळ थांबण्यासाठी युरिया १ किलोग्रॅम, बोरिक ॲसिड ३०० ग्रॅम, प्लॅनोफिक्‍स ३० मिली १०० लिटर पाण्यात मिसळून एप्रिलमध्ये फवारणी करावी. तर मेमध्ये १.५ किलोग्रॅम पोटॅशिअम नायट्रेट आणि २-३ ग्रॅम जीए ३ शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून स्प्रे घ्यावा. 
  • जिल्हानिहाय मोसंबी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)  औरंगाबाद...२१४७५  बीड ...२००२.२१  हिंगोली ....१७०  जालना....१४३२५  लातूर ....२५  नांदेड......११६०  उस्मानाबाद...९०  परभणी...१०१७.३०   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com