नगर दक्षिणमध्ये १९९१ ची पुनरावृत्ती होईल ः शरद पवार

नगर दक्षिणमध्ये १९९१ ची पुनरावृत्ती होईल ः शरद पवार
नगर दक्षिणमध्ये १९९१ ची पुनरावृत्ती होईल ः शरद पवार

नगर ः नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष राहील. यात कार्यकर्त्यांना निवडणुकीत व निवडणुकीनंतरही लढत राहावे लागेल. यापूर्वीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. १९९१च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल. नगरचा मतदार स्वाभिमान गहाण ठेवत नाही, असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. नगरमध्ये सहकारशक्‍ती व संपत्ती निवडणुकीत उतरते, त्या वेळी जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देते, असेही पवार म्हणाले. 

सध्या राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या पाश्वरभूमीवर राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी सायंकाळी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नगरमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील पवार यांच्या समवेत होते. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ही व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. 

पवार म्हणाले, ‘‘सर्वसामान्य लोक विरुद्ध सहकारशक्‍तीचा लाभ घेऊन बलवान झालेले, यांच्यातील ही निवडणूक आहे. मला आठवते, एका निवडणुकीत आव्हानात्मक परिस्थिती होती. त्या वेळी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव गांधी यांनी मला बोलावून सांगितले होते, की नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्याला ताकद द्या आणि पक्षाची जागा निवडून आणा. त्या वेळी त्यांनी यशवंतराव गडाख यांना उमेदवारी दिली. ती गाजलेली निवडणूक होती. धनसंपत्ती आणि सहकाराच्या शक्‍तीला नगर जिल्ह्यातील मतदारांनी पराभूत केले. या वेळीही तशीच स्थिती आहे.’’

राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे काही सहकाऱ्यांनी तिकिटाची मागणी केली होती. पक्षातील उमेदवाराला संधी द्यायची की पक्षाबाहेरील उमेदवाराला? याबाबत चर्चा झाली. यात पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत नेणाऱ्या पक्षातीलच कार्यकर्त्याला संधी द्यावी, असे निश्‍चित केले. त्यामुळे जाणीवपूर्वक हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवला. या मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’चे दोन आमदार आहेत. एका ठिकाणी आपण थोडक्‍यात पराभूत झालो होतो. कॉँग्रेसपेक्षा येथे ‘राष्ट्रवादी’ची ताकद जास्त आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा व मतदारांचा आदर ठेवणारा निर्णय घेतला, असे पवार यांनी स्पष्ट केले. 

काही लोक आपल्या साधनांच्या माध्यमातूनच निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत होते. त्यांना कोठून उभे राहायचे याची चिंता नव्हती. यशवंतराव गडाखांच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्ता व मतदार त्यांच्या मागे उभा राहिला होता. त्याचीच आता पुनरावृत्ती होईल. ही निवडणूक जिंकायचीच, या दृष्टीने तयारीला लागा, असे आवाहनही पवार यांनी केले. या वेळी काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनीच नगरमधून लढावे, असे आवाहन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com