corona
corona

ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छताग्रहींची नियुक्ती करणार

राज्यातील २७ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छताग्रहींची नियुक्ती करण्यात येत असून त्यांची कार्य पद्धती निश्चित करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

मुंबई: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच गावपातळीवर स्वच्छता रहावी. याकरिता राज्यातील २७ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छताग्रहींची नियुक्ती करण्यात येत असून त्यांची कार्य पद्धती निश्चित करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.  श्री. पाटील पुढे म्हणाले, कि कोरोनाचा संसर्ग झालेल्या अथवा होण्याचा धोका असणाऱ्या ग्रामपंचायती तसेच या गावांच्या नजिकच्या ग्रामपंचायती वा जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छताग्रहींची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायत निवडीचा अधिकार हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना राहणार आहे. साधारणपणे २०० कुटुंबांमागे एक अशाप्रकारे गावात स्वच्छताग्रहींची निवड करण्यात येणार असून गावातील सरपंच व ग्रामसेवकाच्या संयुक्त स्वाक्षरीने याचा प्रस्ताव तयार करून गटविकास अधिकाऱ्यांच्या संमतीने याची नियुक्ती होणार आहे. या नियुक्तीला ग्रामसभेची संमती आवश्यक असणार आहे. स्वच्छताग्रही हा संबंधित गावातील स्थानिक रहिवासी असावा. हा व्यक्ती साक्षर असून त्याला सामाजिक कामाची आवड असावी. कोविड प्रादुर्भावाच्या स्थितीत कामास असणारा व यासाठी वेळ देण्यास तयार असणाऱ्यांची स्वच्छताग्रही म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. स्वयंप्रेरणेने स्वच्छता कामांमध्ये सहभागी व्यक्ती व महिला यांना यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. या स्वच्छाग्रहीला त्याच्या अखत्यारीत असणाऱ्या कुटुंबांमध्ये स्वच्छतेचा प्रसार करणे, त्यांना शौचालयाचे महत्त्व पटवून देणे, हात-धुणे, खोकणे-शिंकणे आदींबाबतच्या सवयी व मास्क लावण्याचे प्रशिक्षण देणे, परिसरातील पाणी स्त्रोतांचे नमूने जमा करण्यासाठी जलसुरक्षांना मदत करणे, कुणी उघड्यावर शौचास जातो का ? याबाबतची माहिती जमा करून ग्रामसेवकाला देणे व स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आदी कामे त्याला करावी लागणार आहेत.  स्वच्छताग्रही आपल्या कामाचा मासिक अहवाल १० तारखेच्या आत तालुका सनियंत्रण समितीकडे जमा करेल. त्याच्यावर सरपंच आणि ग्रामसेवकाचे स्थानिक पातळीवर नियंत्रण असेल. तालुका पातळीवर गटविकास अधिकारी तर जिल्हा पातळीवर स्वच्छता कक्षाकडे नियंत्रणाची जबाबदारी असणार आहे. प्रत्येक स्वच्छताग्रहीला दरमहा एक हजार रूपये इतका प्रोत्साहन भत्ता प्रदान करण्यात येणार आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छताग्रहींची आधीच नियुक्ती झालेली असल्यास ती देखील मान्य केली जाणार असून इतरांनी नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या स्वच्छाग्रहींची नियुक्ती ३० मार्च, २०२१ पर्यंत राहणार असल्याचेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील जळगावसह नगर, बीड, बुलढाणा, धुळे, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ, औरंगाबाद, अमरावती, अकोला, लातूर व सोलापूर या २७ जिल्ह्यांमध्ये स्वच्छताग्रहींची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.

कोरोनाविरुध्दच्या लढाईला वेग कोविड-१९ विषाणू अर्थात कोरोनाच्या लढाईत स्वच्छता हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पाणी पुरवठा व स्वच्छताविभागामार्फत आधीच याच्या प्रतिकारासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. आता स्वच्छताग्रहींच्या माध्यमातून या लढाईला वेग येणार आहे. ग्रामीण भागातील जनता, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून स्वच्छताग्रही काम करतील अशी अपेक्षा देखील मंत्री पाटील यांनी व्यक्त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com