हवामान बदलाचा धोका ओळखून संशोधन गरजेचे ः देऊळगावकर

हवामान बदलाचा धोका ओळखून संशोधन गरजेचे ः देऊळगावकर
हवामान बदलाचा धोका ओळखून संशोधन गरजेचे ः देऊळगावकर

वसमत, जि. हिंगोली ः जगामध्ये २०१० पासून उष्णतेची लाट सुरू झाली आहे. त्‍यामुळे अकाली महापूर, चक्रीवादळ, गारपीट, आग अशा अनैसर्गिक संकटांचे प्रमाण वाढले आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रगत राष्ट्रांमध्ये संशोधक आहेत. भारतात मात्र संशोधक नाहीत अन संशोधनही होत नाही ही खेदाची बाब आहे. हवामान बदलाचा जगाला धोका आहे. तो ओळखून संशोधन होणे गरजेचे आहे. हवामानाचे अंदाज कधीच अचूक ठरत नसल्‍याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे, असे प्रतिपादन पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगांवकर यांनी केले आहे. 

शब्‍दसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे रविवारी (ता. ७) चैत्रफुलोरा कार्यक्रमांतर्गत ‘जागतिक हवामान बदल आणि शेतीसमोरील आव्‍हाने’ या विषयावर श्री. देऊळगांवकर यांचे व्‍याख्यान हुतात्‍मा बहिर्जी स्‍मारक विद्यालयात आयोजित करण्यात आले होते. या वेळी माजी राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगांवकर, माजी आमदार पंडितराव देशमुख, डी. जी. हेर्लेकर, पत्रकार उत्तमराव दगडू, डॉ. नागनाथ काळे, ॲड. रामचंद्र बागल, खेडकर बाबा, प्राचार्य सखाराम बागल आदींची उपस्‍थिती होती. 

श्री. देऊळगांवकर पुढे म्हणाले, ‘‘भारताचे जलधोरण हे शेतकरीविरोधी आहे. शेतीसाठी कमी आणि उद्योजक, कारखानदारांच्या फायद्यासाठी तयार केले जाते. जगातील अनेक देशात शेती आणि पर्यावरणावर विविध प्रकारचे संशोधन होत आहे. खाऱ्या पाण्यावर येणारा तांदूळ बांग्लादेशातील संशोधकांनी विकसित केला. युरोपमध्ये ५१ अंश सेल्सिअस तापमानात टिकेल असा गहू निर्माण केला आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढल्याने वातावरणात कार्बन उत्‍सर्जन वाढले आहे. परिणामी जीवसृष्टीच धोक्‍यात आली आहे. मानवाच्या अनैसर्गिक मृत्‍यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काळाची पावले ओळखत नवनवीन संशोधक तयार झाले पाहिजेत. पर्यावरणाच्‍या समतोलासाठी संशोधन व्हावे. प्रत्‍येकाने झाडे, पाणी वाचवले पाहिजेत, अन्यथा येत्या काळात माणसाला जिवंत राहण्यासाठी पाण्याच्‍या बाटलीबरोबर ऑक्‍सिजनचे सिलिंडरही ठेवावे लागेल.’’

प्रास्‍ताविक शब्‍दसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. राजा कदम यांनी केले. सूत्रसंचालन शिवदास पोटे यांनी केले. तर संगीता देशमुख यांनी आभार मानले. संजय माचेवार, विलास जाधव, संदीप सूर्यवंशी, मंगेश तनपुरे, गजानन ढोरे, पंडित तिडके, ॲड. प्रदीप देशमुख, अनिल कमळू, पुरभाजी हरबळे आदींनी पुढाकार घेतला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com