हवामान बदलांमुळे दारिद्र्य वाढण्याचा धोका : माजा लुंडे

हवामान बदलांमुळे दारिद्र्य वाढण्याचा धोका
हवामान बदलांमुळे दारिद्र्य वाढण्याचा धोका

नवी दिल्ली : हवामानबदलांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. हवामानबदलांमुळे निर्माण होणारी संभाव्य आपत्ती आणि तापमानवाढ १.५ अंशांवर रोखण्यासाठी आपल्याकडे फक्त अकरा वर्षांचा कालावधी आहे, असा इशारा संयुक्तराष्ट्रांनी (यूएन) दिला आहे. यापेक्षा एका अंशानेही तापमानात वाढ झाली तर पूर, अतिउष्णता आणि दुष्काळाचे संकट अधिक गंभीर होण्याचा धोका आहे. परिणामी, जगभरातील लक्षावधी नागरिकांना दारिद्य्राचे चटके सहन करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या अतिशय गंभीर संकटाकडे तेवढ्याच गांभीर्याने पाहावे लागेल, असा स्पष्ट इशारा नॉर्वेतील पर्यावरणविषयक जगप्रसिद्ध लेखिका माजा लुंडे यांनी मंगळवारी (ता.२२) दिला. लुंडे म्हणाल्या, की हवामान बदलांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका अतिशय बेजबाबदारपणाची असून, त्याची किंमत जगाला चुकवावी लागणार आहे, असे मतही लुंडे यांनी व्यक्त केले. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे निर्माण होणारे संकट टाळण्यासाठी जागतिक नेत्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याच्या मुद्यावरही त्यांनी भर दिला. कोण आहेत माजा लुंडे? माजा लुंडे या नॉर्वेतील प्रतिथयश लेखिका आहेत. पर्यावरणांच्या संदर्भात लेखन करणाऱ्या लुंडे यांनी २०१५ मध्ये लिहिलेली ‘द हिस्ट्री ऑफ बीज्‌’ ही पहिलीच कादंबरी जगभर गाजली. चार कादंबऱ्यांच्या मालिकेतील लुंडे यांची दुसरी कादंबरी ‘ब्लू’ ही मागील वर्षी प्रकाशित झाली आहे. या वर्षीच्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये (जेएलएफ) सहभागी होण्यासाठी लुंडे या सध्या भारतात आल्या आहेत. ‘जेएलएफ’ला गुरुवारपासून सुरवात होत आहे. ‘द हिस्ट्री ऑफ बीज्‌’ मधमाश्‍यांच्या शिवाय पृथ्वीवरील परिस्थितीचा आढावा लुंडे यांनी या कादंबरीत घेतला आहे. पृथ्वीवरून मधमाश्‍या नष्ट झाल्या तर मानवाला हाताने परागीभवनाची प्रक्रिया पार पाडावी लागेल आणि अखेरीस त्याच्यावर सर्वनाशाला ओढावेल, अशी मध्यवर्ती कल्पना असलेली २०१५मध्ये आलेली ही कादंबरी जागतिक पातळीवर ‘बेस्ट सेलर’ ठरली. त्यानंतर पाण्याची कमतरता आणि दुष्काळाच्या प्रश्नाला मध्यवर्ती ठेवून लिहिलेली ‘ब्लू’ ही दुसरी कादंबरीत मागील वर्षी प्रकाशित झाली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com