नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
ताज्या घडामोडी
...त्या तिघींनी पापड उद्योगातून जपली मैत्री !
त्या तिघींनी मात्र समस्या, प्रश्न एकमेकींना ‘शेअर‘ करीत मनावरचा ताण हलका केला. एकत्र येत पापड उद्योग तर सुरू केलाच. पण त्या चांगल्या मैत्रिणीही बनल्या.
कोल्हापूर : ‘त्या‘ तिघी एकमेकाला सावरणाऱ्या. नकारात्मक गोष्टी बाजूला सारत एकमेकीला आधार देणाऱ्या. आज अनेकांना मनातील समस्या, अडीअडचणी, सुख दु:खाची देवाण कुठं तरी व्यक्त करावीशी वाटते. पण करायची कुठे असा प्रश्न निर्माण होतो. त्याचा विपरीत परिणाम आयुष्यावर होतो. त्या तिघींनी मात्र समस्या, प्रश्न एकमेकींना ‘शेअर‘ करीत मनावरचा ताण हलका केला. एकत्र येत पापड उद्योग तर सुरू केलाच. पण त्या चांगल्या मैत्रिणीही बनल्या. कुठलीही गोष्ट असेल तर पहिल्यांदा एकमेकांनी सांगितल्या शिवाय त्यांना चैनच पडत नाही. सुख: दुख सांगून मन मोकळे करीत वर्षाला हजारो रुपयांची पापड विक्री करून त्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगाव (ता. कागल) येथील स्वप्नाली उपाध्ये, शिल्पा पाटील, संगीता पाटील या तिघी मैत्रिणी अल्पभूधारक कुटुंबातील. बचत गटाच्या माध्यमातून तीन वर्षांपूर्वी त्यांना कर्ज मिळाले. पण कर्ज घेऊन त्याचा इतर कामासाठी विनियोग न करता त्यांनी काही तरी उद्योग उभारावा, असा विचार केला. काही नाही मिळाले तरी पोळपाट घेऊन पापड तयार करण्याची त्यांनी जिद्द दाखविली. त्यांच्या प्रयत्नाला घरच्यांचा पाठिंबा मिळाला आणि तीस हजार रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी पापड विक्रीचा श्रीगणेशा केला. आता पापड करण्याचे छोटे मशिन घेत त्यांनी पापड निर्मिती सुरू केली आहे.
घरोघरी जाऊन विक्रीसाठी प्रयत्न
पापड तयार केले पण विकायचे कसे, हा प्रश्न त्यांना पडला. पण त्या हरल्या नाहीत. अगदी कसबा सांगावमधील घराघरांत जाऊन त्यांनी पापड वाटले. पापडाची टेस्ट तर बघा, अशी साद ग्राहकांना घातली. एवढेच नव्हे तर शेजारी असणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यांसमोर जाऊन कामगार येण्या जाण्याच्या वेळी त्यांना पापड टेस्ट करायला दिले. याचा सकारात्मक परिणाम ग्राहक वाढीवर झाला आणि बघता बघता गेल्या दोन वर्षांत पापड व्यवसायाने व्यस्त बनविले.
अनुभवातून फुलविला व्यवसाय
साधारणतः: फेब्रुवारी ते जूनपर्यंत विविध पापडांची निर्मिती केली जाते. प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या नफ्यातून त्यांनी आधुनिक यंत्र खरेदी केले आहे. यंदा पावणे दोन लाख रुपयांचे अद्ययावत मशिनही त्यांनी खरेदी केले आहे. ‘कौशल्या फूड्स या बँडनेम खाली पापडांची विक्री केली जाते. सकाळी सातला सुरू झालेली विविध पदार्थांची निर्मिती सायंकाळी उशिरापर्यत सुरू असते. कोणतेही प्रशिक्षण न घेता केवळ अनुभवातून त्यांनी ही कला साध्य केली. उडीद पापड, बटाटा पापड, नाचणी पापड, कुरडई, मसाला मिरची, गर्लिक पापड, शाबू सांडगे या व्हरायटीसह यंदा त्यांनी शेवयानिर्मितीही सुरू केली आहे.
ग्रामीण भागांबरोबर शहरातही विक्री
दररोज सुमारे पंचवीस किलोचे पापड व अन्य पदार्थ तयार केले जातात. त्यांची विक्री परिसरातील गावांबरोबर कागल, इचलकरंजी या मोठया बाजारपेठांमध्येही होते. घरगुती ग्राहकांबरोबर व्यावसायिक ही त्यांच्या पापडांची खरेदी करतात. उडीद पापडाची विक्री २३० ते २५० रुपये प्रति किलोच्या आसपास होते. इतर पदार्थ १३० ते १४० रुपये दराने विकले जातात. वर्षाला सुमारे ६० ते ६५ हजार रुपयांची विक्री होते. खर्च वजा जाता सरासरी ५० हजार रुपये शिल्लक राहतात. तिघींनीही हे पैसे स्वतः न वापरता व्यवसायातच गुंतविले आहे. मिळणाऱ्या नफ्यातून प्रत्येक वर्षी एक यंत्र आणून यात आधुनिकता आणली आहे.
विविध संस्थांची साथ
हा उद्योग उभा करताना कागल पंचायत समिती, कणेरी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे आदींसह अनेकांनी तिघींना साथ दिली. विविध महोत्सवामध्ये त्यांना विक्रीची संधी उपलब्ध करुन दिली. यामुळे त्यांचा विश्वास दुणावला. एकीने केलेला हा व्यवसाय सध्या वाढतोय. यामध्ये तिघींचा एकमेकांशी असणारा समन्वय हा खूपच महत्त्वाचा ठरत असल्याचे तिघींनीही सांगितले. याचा फायदा आम्हाला दैनंदिन आयुष्यात होत असल्याचे त्या सांगतात.
संपर्क : शिल्पा पाटील- ७३८५३२३४२७
- 1 of 1096
- ››